भारतीय उपखंडातील लहरी हवामानाशी आपला परिचय आहेच. पूर ही एक भूवैज्ञानिक आपत्ती आहे. अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे उन्हाचा कहर, पावसाचा अतिरेक, वादळे, गारपीट अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. कमी वेळात जास्त प्रमाणात पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणी पूर येताना दिसतो. आकस्मिक पुराच्या (फ्लॅश फ्लड) घटनांमुळे जीविताचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते; त्याचप्रमाणे जमिनीचेही मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी पूर व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते.
पूर व्यवस्थापनात जलविज्ञान आणि भूविज्ञान कळीची भूमिका बजावतात. पूर व्यवस्थापन करताना त्या ठिकाणची भूवैज्ञानिक संरचना, खडकांचे प्रकार, त्या खडकांचे जलवैज्ञानिक गुणधर्म, मातीचा प्रकार व पोत, जमिनीचा उतार, पावसाचे प्रमाण, वन क्षेत्राचे आच्छादन इत्यादी अनेक बाबी लक्षात घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे त्यांचा परस्परसंबंधदेखील विचारात घ्यावा लागतो. पडणाऱ्या पावसाचे प्रमाण व मातीची पाणी शोषून घेण्याची क्षमता यावर भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह (रनऑफ) किती असणार हे ठरते. झाडाची मुळे पाणी धरून ठेवतात, पण त्यासाठी सरसकट झाडे लावण्याचा उपयोग होत नाही; तर जमिनीचा पोत आणि त्यानुसार पाण्याचा जमिनीत झिरपण्याचा वेग लक्षात घेऊन योग्य ठिकाणी योग्य ती झाडे लावणे आवश्यक असते.
जिथे पाणी साठून राहू शकते पण जमिनीखाली पाणी झिरपण्याचा वेग अतिशय कमी असतो, अशा ठिकाणी झाडे लावल्यास त्याचा योग्य परिणाम दिसून येतो. याशिवाय परिसराच्या भूवैज्ञानिक स्थितीचा विचार करून योग्य तिथे कृत्रिम जलाशय बांधणे किंवा पाण्याच्या प्रवाहाचा काही भाग दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळवणे, शक्य तिथे बांध बांधणे असे काही उपाय केले जातात.
नदीपात्रातला वाळूचा उपसा रोखणे, नद्यांच्या प्रवाहातले अडथळे काढून टाकणे, याबरोबरच पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा प्रभावी असणे, त्याची कार्यक्षमता वेळोवेळी तपासणे आणि सुधारणे, हे उपाय महत्त्वाचे ठरतात. नदीपात्रात होणारी अवैध बांधकामे, नदीत भराव टाकणे, नैसर्गिक ओढे- नाले बुजवणे यामुळे पुराची तीव्रता वाढते. हे रोखण्यासाठी जनजागृती तर करायला हवीच, पण कायद्याची अंमलबजावणीही झाली पाहिजे. ते भूवैज्ञानिक उपायांइतकेच महत्त्वाचे आहे. जमिनीची धूप रोखणे आणि पूर प्रभाव क्षेत्राचे सीमांकन करणे (फ्लड झोनिंग), पूररेषेपेक्षा उंचावर घरे बांधणे, पुराचा योग्य अंदाज आणि इशारा देणारी यंत्रणा विकसित करणे असे अनेक उपाय करून पुरामुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळता येऊ शकते.
– डॉ. योगिता पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org