फ्लोरेन्सच्या टस्कनी राज्यावरील मेदिची घराण्याचे राजेपद, आक्रमण करून लॉरेनचा डय़ूक फ्रान्सिस स्टीफन याने १७३७ साली आपल्याकडे घेतले. फ्रान्सिस स्टीफनची पत्नी मारिया थेरेसा ही ऑस्ट्रियाची राणी होती. पुढे फ्लोरेन्स आणि टस्कनीचा राज्यप्रदेश ऑस्ट्रियाच्या राज्यात सामील केला गेला. १८५९ मध्ये फ्रान्स आणि सार्दिनिया यांच्या युतीने ऑस्ट्रियाचा पराभव केल्यानंतर दोन वष्रे फ्लोरेन्स फ्रेंच सत्तेच्या वर्चस्वाखाली राहिले. दोन वर्षांनी १८६१ मध्ये टस्कनी हा नव्याने तयार झालेल्या संयुक्त इटालीच्या राज्याचा एक प्रांत बनला आणि फ्लोरेन्स बनले टस्कनी प्रांताची राजधानी. संयुक्त इटालियन राज्याची राजधानी प्रथम टय़ुरिन येथे होती. लवकरच १८६५ मध्ये फ्लोरेन्स येथेच ही राजधानी नेण्यात आली. राजधानी झाल्यावर जुनी, मोडकळीस आलेली घरे व इमारती नव्याने बांधण्यात आली, शहराचे नव्याने नियोजन करून रस्ते रुंद करण्यात आले, पिआत्झा डेला रिपब्लिका हा शहरातला प्रमुख चौक विस्तारित करण्यात येऊन सुशोभित केला गेला. इ.स. १८६५ ते १८७१ या काळात फ्लोरेन्समध्ये इटालीची राजधानी राहिल्यावर १८७१ मध्ये रोम ही इटालियन प्रजासत्ताकाची राजधानी झाली. त्यापूर्वीची दहा वष्रे फ्लोरेन्सचे तत्कालीन प्रसिद्ध हॉटेल ‘कॅफे जियुब रॉस’ने आपली राजकीय भूमिका चांगली पार पाडली. या हॉटेलात अनेक राजकारणी लोकांचे अड्डे भरून राजकीय निर्णय घेतले जात. १९व्या शतकात फ्लोरेन्सची लोकसंख्या दुप्पट झाली तर विसाव्या शतकात तिप्पट! या काळात येथे पर्यटन वाढले, व्यापार वाढला, नवीन उद्योग सुरू झाले. या काळात जेम्स आयìवगसारखे प्रसिद्ध लेखक आणि अनेक चित्रकार, शिल्पकार फ्लोरेन्समध्ये स्थायिक झाले. अनेक इंग्लिश सरदारांनी मध्ययुगीन काळात बांधलेले येथील प्रासाद आणि त्यातील कलावस्तूंच्या संग्रहांचे रूपांतर म्युझियममध्ये झाले. स्टीबर्ट म्युझियम, म्युझियम होर्न, विला ला पिएट्रा ही सध्याची प्रसिद्ध म्युझियम्स हे एकेकाळचे सरदारांचे वाडे होते!
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा