शेती क्षेत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण उत्पादनापकी २० ते २५ टक्के उत्पादन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायातून मिळते. आजही ८० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच जिरायत भागातील शेतकऱ्यांचा प्रपंच या व्यवसायांवर अवलंबून आहे. देशामध्ये २०१०-११ मध्ये पशुसंवर्धनातून सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांपर्यंत हा आकडा पाच लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
पूर्वी पशुधनाच्या गणनेनुसार राज्यांची श्रीमंती किंवा वैभव ठरविले जात असे. आज आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात पशुधन आहे. परंतु त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला आहे. मोठय़ा संख्येने उपलब्ध असलेल्या पशुधनासाठी आणि एकूण उत्पादनाच्या २० ते २५ टक्के उत्पादन देणाऱ्या या व्यवसायासाठी आज आपण एकूण लागवड क्षेत्राच्या दोन ते तीन टक्केच जमीन चारा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे पशुधनाला आवश्यक असलेल्या अन्नघटकांपकी ५०ते ६० टक्के ओला चारा व २० ते २५ टक्के कोरडय़ा चाऱ्याची कमतरता आहे. तसेच ३० ते ३५ टक्के खाद्याची कमतरता आहे.
खरे तर दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पीक वाया गेले किंवा उत्पादन मिळाले नाही तर हमखास उत्पादन मिळवून देऊन शेतकऱ्यांचा प्रपंच चालविणाऱ्या पशुधनाला शेतकऱ्यांचे कवचकुंडल म्हटले तरी चालेल. असे असूनही जनावरांचे आहार व्यवस्थापन करण्याकडे सर्वाचेच दुर्लक्ष होते. जमिनीतून पिकविलेल्या विविध पिकांच्या अवशेषांवर चालणारा हा पशुसंवर्धन व्यवसाय, दुधातून पसा आणि विष्ठेतून जमिनीचे खत असा दुहेरी फायदा देतो.
परंतु या पशुधनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शेतकरी चांगले पाऊस-पाणी असतानाही जनावरांच्या चाऱ्यासाठी जमीन आणि पाणी यांचा विचार करीत नाही. अन्नधान्य आणि नगदी पिके यांची लागवड केल्यानंतर शेतकरी चारा पिकांचा विचार करतो. म्हणजे दुग्धव्यवसायात कच्च्या मालाची उपलब्धता नसतानाही पक्क्या मालाची शाश्वती आहे. अर्थात यामध्ये जोपर्यंत नियोजन होत नाही, बदल होत नाही, तोपर्यंत किफायतशीर दुग्धव्यवसाय शक्य नाही.
-डॉ. भास्कर गायकवाड (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
वॉर अँड पीस : नागीण : धावरे : २
माझ्या वैद्यकीय व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात अनेक साथीचे, सांसर्गिक कारणांमुळे उत्पन्न झालेले; विविध ऋतुमानातील हवाबदलामुळे; त्रस्त रुग्ण पाहिले. गोवर, कांजिण्या, फ्लू, कावीळ, मलेरिया, कॉलरा इ. इ. काही वेळेस नागीण विकाराने खूप अस्वस्थ असणारे मोठय़ा संख्येने रुग्ण पाहिले. हे नागिणीचे रुग्ण सामान्यपणे बहुतेक पित्तप्रधान व थोडे कफप्रधान होते. पण एक दिवस एका एच.आय.व्ही.ग्रस्त-एड्स रुग्णाने माझ्या ज्ञानात नवीन भर टाकली. आपल्या एच.आय.व्ही.ची लक्षणे सांगताना त्याने ‘डोळय़ात नागीण आहे; ती आपण बघा’ असा सांगावा दिला. तेव्हापासून मी नागीणग्रस्तांकरिता हा तिसऱ्या प्रकारचा नागीण रुग्ण नाही ना याचा मागोवा घेत आलो. एचआयव्हीग्रस्त, डोळय़ातील नागीण असणारे रुग्ण अपवादात्मक असतात. अशा रुग्णांचे उपचार, पित्तप्रधान नागिणीच्या रुग्णासारखे करावेत. सत्वर यश मिळते.
पित्तप्रधान नागीण- लक्षणे- अंगावर जानव्यासारखे, गोलाकार आकाराचे, अंतरा अंतराने लाल, पिवळसर फोड येणे. त्या फोडांमुळे अत्यंत असहय़ अशी आग होणे, कपडय़ाचाही स्पर्श सहन न होणे. सर्व शरीराचा दिवसरात्र दाह होणे, त्यामुळे झोप न लागणे. एकदम तीव्र ताप येणे; वर्तुळामधले फोड झपाटय़ाने वाढणे.
कारणे- अन्य नागीणग्रस्ताचा संपर्क. शरीरात खूप पित्त वाढेल असे खाणेपिणे, वागणे उदा., लोणची, पापड, मिरच्या, चहा, तंबाखू, मद्यपान, जागरण, उन्हात हिंडणे. रक्ती मूळव्याध, रक्तप्रदर, तीव्र ताप, पांडू विकार बळावणे. विषारी वायू वा खराब हवेशी संपर्क.
कफप्रधान नागीण- लक्षणे- अंगावर पांढरट, काळसर जाड फोड येणे. त्या फोडांमुळे विलक्षण खाज येणे, खाजवल्याशिवाय चैन न पडणे, फोड सावकाश वाढणे, फोडांमध्ये पू होणे, ताप आल्यास तो ताप कमी प्रमाणात असूनही दीर्घकाळ राहणे. कारणे- कफप्रधान- आंबट, खारट, शिळे अन्न, जेवणावर जेवण, अजीर्ण होईल असे भोजन. दमा, खोकला, उलटी, उदरविकार, फ्लूसारखा ताप, फाजील झोप, मैथुनाचा अतिरेक इत्यादी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी..: महाराष्ट्र माझा, आपला..
१९६७ साली माझे केईएममधले बिऱ्हाड हलले कारण टिळक रुग्णालयात सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे साहाय्यक प्राध्यापकांच्या जागा भरण्याचा क्रम सुरू झाला. मला तिथे एका सहायक प्राध्यापकाची जागा मिळाली तेव्हा एक स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले. एकेकाळी धड इंग्रजी बोलता येत नाही असा मी, आता मुंबई शहरात एका महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक झालो. माझा गणवेश (अस्र्१ल्ल)आता लांब बाह्य़ांचा झाला. डॉक्टरांच्या मिरवणुकीत मी आता मागे चालण्याऐवजी माझ्या मागे निवासी डॉक्टर्स चालू लागले. पण यात एक राजकीय गोम होती, हे मी तेव्हाही ओळखले होते.
संयुक्त महाराष्ट्र स्थिरावला होता. मराठी माणसे आता मोक्याच्या जागेवर बसू लागली होती आणि एकंदरच माहोल मराठी माणसांना धार्जिणा होता आणि त्यामुळे अनेक मराठी माणसांना न्याय मिळाला, असे माझे स्पष्ट मत आहे. मराठी माणसांचा न्यूनगंड संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर पार गेला नाही; परंतु बऱ्याच प्रमाणात कमी झाला हे नक्की. आजमितीला सगळीच शहरे बहुभाषिक होत आहेत हे खरे असेलही; परंतु संयुक्त महाराष्ट्र झाला नसता तर मराठी माणसे आणि मराठी भाषा यांची काय परवड झाली असती याची कल्पनाही करवत नाही. एवढा महाराष्ट्र मिळाला, पण मराठी माणसांनी काय दिवे लावले? असे विचारणे सोपे आहे, पण महाराष्ट्र झालाच नसता तर काय अंधार झाला असता हे कोणीही बघत नाही हे तेवढेच खरे.
बिहार आणि उत्तर प्रदेशातली माणसे किती कष्टाळू आहेत, असे कौतुकाने म्हटले जाते; परंतु मग ते दोन प्रांत एवढे मागासलेले कसे याचे उत्तर मिळत नाही. मारवाडी माणसांनी त्यांच्या उद्यमशील कृतीने देश जिंकला हे खरेच आहे, पण मग मला मारवाड आणि राजस्थानमध्ये एवढा अंध:कार का याचे उत्तर कोणी तरी द्यावे, तसेच दाक्षिणात्यांबद्दल. तिथली माणसे हुशार म्हणून प्रसिद्ध असतीलही, पण मग तिथल्या राज्यांमध्ये चित्रपटातल्या नायक-नायिकांवर लोक बिनडोकपणे प्रेम करतात आणि त्यांना राज्यांवर का बसवितात याचे उत्तर कोण देणार?
माणसे महाराष्ट्रात आपले गाव सोडून येतात आणि इथे वास्तव्य करून चार पैसे मिळवितात यात महाराष्ट्रात खोलवर रुतलेल्या उदार परंपरा आहेत आणि हे आपण लोकांना सांगण्याची गरज आहे. ‘भारतात लोकशाही टिकली याचे श्रेय हिंदूंना!’ असे सोनिया गांधी एकदा चुकून बोलून गेल्या ते जसे सत्य होते, तसेच मराठी माणसांच्या समतोल वृत्तीबद्दल म्हणता येईल. इतर कोणी भाषिक हा देश सगळ्यांचा आहे, असे शिकवू लागला तर त्याला ताडकन ‘मराठी माणसांना कोणीही देशप्रेम शिकवू नये’ असे सुनावणे ओघानेच आले.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत : २६ एप्रिल
१९०३ > साहित्यिक व गांधीवादी विचारवंत आचार्य सखाराम जगन्नाथ भागवत यांचा जन्म. गांधीवादी असूनही साहित्याबाबत आचार्यानी बोधवादी भूमिका न घेता जीवनवादी भूमिाक घेतली, याची प्रचीती त्यांच्या ‘जीवनचिंतन’, ‘जीवन व साहित्य’ आदी पुस्तकांतून येते. त्यांच्या संकलित वाङ्मयाचे दोन खंड पुढे राज्य साहित्य- संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केले.
१९२४ > रमाबाई रानडे यांचे निधन. एकच पुस्तक त्यांनी लिहिले, त्याचे नाव ‘आमच्या आयुष्यातील कांही आठवणी’.. हे आत्मवृत्त पिढय़ान्पिढय़ा टिकले आहे. प्रांजळ आत्मकथनाचा नमुना ठरले आहे. ‘पत्नीने पतीबद्दल अशा प्रकारे लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ’ असे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे त्यांच्या लिखाणातून, भाषणांतून समाजाला परिचित असताना, घरातील त्यांचे आचारविचार आणि मते यांचा धांडोळा घेणारे हे पुस्तक ठरले. एका अर्थी, मराठीत घरात व घराबाहेरच्या भूमिकांची चर्चा होण्यासही या पुस्तकाने मोठा आधार दिला. गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेल्या चित्रवाणी मालिकेला प्रामुख्याने याच पुस्तकाचा आधार आहे.
– संजय वझरेकर