शेती क्षेत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण उत्पादनापकी २० ते २५ टक्के उत्पादन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायातून मिळते. आजही ८० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच जिरायत भागातील शेतकऱ्यांचा प्रपंच या व्यवसायांवर अवलंबून आहे. देशामध्ये २०१०-११ मध्ये पशुसंवर्धनातून सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांपर्यंत हा आकडा पाच लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
पूर्वी पशुधनाच्या गणनेनुसार राज्यांची श्रीमंती किंवा वैभव ठरविले जात असे. आज आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात पशुधन आहे. परंतु त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला आहे. मोठय़ा संख्येने उपलब्ध असलेल्या पशुधनासाठी आणि एकूण उत्पादनाच्या २० ते २५ टक्के उत्पादन देणाऱ्या या व्यवसायासाठी आज आपण एकूण लागवड क्षेत्राच्या दोन ते तीन टक्केच जमीन चारा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे पशुधनाला आवश्यक असलेल्या अन्नघटकांपकी ५०ते ६० टक्के ओला चारा व २० ते २५ टक्के कोरडय़ा चाऱ्याची कमतरता आहे. तसेच ३० ते ३५ टक्के खाद्याची कमतरता आहे.
खरे तर दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पीक वाया गेले किंवा उत्पादन मिळाले नाही तर हमखास उत्पादन मिळवून देऊन शेतकऱ्यांचा प्रपंच चालविणाऱ्या पशुधनाला शेतकऱ्यांचे कवचकुंडल म्हटले तरी चालेल. असे असूनही जनावरांचे आहार व्यवस्थापन करण्याकडे सर्वाचेच दुर्लक्ष होते. जमिनीतून पिकविलेल्या विविध पिकांच्या अवशेषांवर चालणारा हा पशुसंवर्धन व्यवसाय, दुधातून पसा आणि विष्ठेतून जमिनीचे खत असा दुहेरी फायदा देतो.
परंतु या पशुधनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शेतकरी चांगले पाऊस-पाणी असतानाही जनावरांच्या चाऱ्यासाठी जमीन आणि पाणी यांचा विचार करीत नाही. अन्नधान्य आणि नगदी पिके यांची लागवड केल्यानंतर शेतकरी चारा पिकांचा विचार करतो. म्हणजे दुग्धव्यवसायात कच्च्या मालाची उपलब्धता नसतानाही पक्क्या मालाची शाश्वती आहे. अर्थात यामध्ये जोपर्यंत नियोजन होत नाही, बदल होत नाही, तोपर्यंत किफायतशीर दुग्धव्यवसाय शक्य नाही.
-डॉ. भास्कर गायकवाड (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा