एखाद्या जागेत जेव्हा रोपटी, झुडपे, वेली, काष्ठवेली, लहानमोठे वृक्ष असे सर्व प्रकार समूहाने नैसर्गिकरीत्या वाढतात त्या जागेला ‘जंगल’ म्हणतात. या जंगलांमध्ये सर्व क्रिया जेव्हा नैसर्गिकरीत्या चालू असतात तोपर्यंत जंगलाचे स्वास्थ्य चांगले असते. कुठल्याही प्रकारच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे जंगलाच्या विनाशाची सुरुवात होते.
अति प्राचीन काळातील हवामानामध्ये आणि वनस्पतींमध्ये कालांतराने संपूर्ण जगात मोठा बदल घडून आला. जीवाश्माच्या अभ्यासाद्वारे असे लक्षात येते की ‘पॅलिओझोइक’ कालखंडात वनांमध्ये ‘डँड्रॉईड’ प्रकारच्या नेच्याचे प्राबल्य होते. ‘मिसोझोइक’ कालखंडात जंगल सूचिपर्णी वृक्षांनी आच्छादलेले होते. नंतर टर्शरीच्या कालखंडात सपुष्प वनस्पतींचे वर्चस्व होते. ‘सिनोझोनिक’ म्हणजे सध्याच्या कालखंडात जगातील हवामानात आमूलाग्र बदल झाल्याने जंगले जास्त उंचीच्या प्रदेशाकडून कमी उंचीच्या प्रदेशाकडे सरकू लागली. आज जंगले समशीतोष्ण प्रदेशात आणि उष्णकटिबंधात विखुरली आहेत.
उत्तम जंगलनिर्मितीसाठी संपूर्ण वर्षभर ओलसरपणा मिळत राहाणं आवश्यक आहे. बीज रुजण्याच्या वेळी तापमान १०० से.पेक्षा कमी चालत नाही.
सर्वसाधारणपणे वनांचे वर्गीकरण हवामान, वृक्षांचे आकारमान, विविधता आणि विपुलता यांच्या आधारे केले जाते. एखाद्या वनामध्ये आढळणाऱ्या वनस्पतींचे स्वरूप त्या ठिकाणचे हवामान, पर्जन्य आणि आद्र्रता यावर अवलंबून असते. त्या वनांच्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या प्राण्यांचा तो आपोआपच अधिवास बनतो.
फायटोजॉग्रफी : जगातील विविध भौगोलिक परिस्थितीत आढळणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्याच्या शास्त्रास ‘फायटोजॉग्रफी’ असे म्हणतात. या शास्त्रात वनस्पतीमधील विविधतेसाठी भौगोलिक वातावरण कसे कारणीभूत आहे हे अभ्यासले जाते. पृथ्वीचा कुठलाही भाग अगदी वाळवंटसुद्धा पूर्णाशाने ओसाड नसतो. प्रत्येक भूभागावर वनस्पतींचा कुठला तरी प्रकार त्या भागाच्या गुणवत्तेनुसार/ वातावरणानुसार आढळतो. पर्जन्य वने, खुरटी वने, गवताळ वने आणि इतर प्रकाराची वने तयार होण्यामागे त्या प्रदेशाचे हवामान आणि जमिनीचा पोत हे प्रमुख घटक असतात. त्याचप्रमाणे विशेष परिस्थितीत ढगाळ हवामान, सतत येणारी वादळे आणि होणारे भूकंप यांचा वननिर्मितीत लक्षणीय सहभाग असतो.
निर्सगातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्या एकत्रीकरणामुळे जगातील लक्षणीय हवामान ठरत असते आणि त्यानुसार वनस्पतींचे वितरण झालेले असते.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल : वनविविधता
अति प्राचीन काळातील हवामानामध्ये आणि वनस्पतींमध्ये कालांतराने संपूर्ण जगात मोठा बदल घडून आला.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-02-2016 at 00:12 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest diversity