सध्या इंधनतेलाचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे तेलाचा दुसरा कुठला तरी अवांतर स्रोत शोधण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, शेवाळाचा उपयोग या कामासाठी होऊ शकतो. सूक्ष्म शेवाळे प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड व पाणी वापरून इतकी कबरेदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने तयार करतात की त्यावर त्यांचे व समुद्रातील सर्व प्राण्यांचे पोट भरते. अगदी पृथ्वीवरच्या वनस्पतीप्रमाणे!
१९४२ पासून सूक्ष्म शेवाळे मोठय़ा प्रमाणावर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आतापर्यंत जवळ जवळ ३००० शेवाळाच्या जातींचे परीक्षण करण्यात आले असून त्यांमधील स्निग्धतेचा अंश कसा वाढवता येईल यावर काम सुरू आहे. पाण्याचे तापमान, त्यातील क्षार, रसायने, त्यात वाढणारे जीवजंतू व इतर सूक्ष्म गोष्टींवर त्यांची वाढ अवलंबून असते. शेवाळापासून किती व कशा प्रतीचे तेल मिळेल हे त्या शेवाळाच्या जातीवर, त्यांच्यामधील जनुकांवर व वातावरणाच्या परिणामावर अवलंबून असते. शेवाळे कुठेही वाढतात. त्यांना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सहसा शेवाळांची वाढ लहान-लहान तलावांत करतात. तलावांत विशिष्ट शेवाळाच्या जाती (उदा. Scenedesmus dimorphus, Dunaliella tertiolecta, Bacilliarophyta (diatom) वाढवतात. यातील काही शेवाळांमध्ये तर अनुकूल वातावरणात ३७ टक्क्यांपर्यंत तेल तयार होऊ शकते. असे म्हणतात की काही शेवाळांच्या जातीपासून दर वर्षांला एकरी ५००० ते १५००० हजार गॅलन इतके उत्पादन मिळू शकते. हे तेलबियापासून मिळणाऱ्या तेलापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. शेवाळांना नेमके कोणते क्षार किती प्रमाणात घालावे की त्याची चांगली वाढ होईल ते शोधून काढावे लागते. काही शेवाळांना कबरेदके घालावी लागतात, तर काहींना सिलिकॉनची गरज असते. काही शेवाळे नायट्रोजनचा पुरवठा कमी केला की जास्त मेदाम्ले बनवितात. शेवाळांची वाढ झाली की पाण्यामधून निथरून मगच त्यापासून तेल काढावे लागते. तेल काढल्यानंतर राहिलेल्या ढेपेत खूप प्रथिने असतात व ती पूरक खाद्य म्हणून वापरता येतात. हे तलाव उघडे असतात. त्यामुळे त्यावरील वातावरणावर अंकुश ठेवणे व वाढ होणाऱ्या शेवाळाच्या प्रतीची शुद्धता ठेवणे कठीण जाते. सध्या तर शेवाळाची जनुके बदलण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न चालू आहे.
डॉ. जयश्री सनिस (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा