जिवाणू, विषाणू आणि अन्य बरेच सजीव आकाराने इतके लहान असतात, की सूक्ष्मदर्शकयंत्राशिवाय आपण ते पाहूच शकत नाही. अशा सजीवांना आपण सूक्ष्मजीव (मायक्रोब्ज्) म्हणतो. सूक्ष्मजीव जसे आज सर्वत्र पसरले आहेत, तसेच ते कोट्यवधी वर्षांपूर्वीही अस्तित्वात होते. अतिप्राचीन काळातल्या सूक्ष्मजीवांचे जीवाश्मही आढळतात. त्या जीवाश्मांना सूक्ष्मजीवाश्म (मायक्रोफॉसिल्स) म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सूक्ष्मजीवांचे अनेक गट आहेत. त्यातल्या एका गटाचे नाव आहे छिद्रधारी संघ (फायलम फोरॅमिनीफेरा). त्यांच्या अन्नग्रहणाची पद्धत अमीबा या सजीवाप्रमाणे असते. जे सजीव प्राणीही नाहीत, वनस्पतीही नाहीत किंवा बुरशीसुद्धा नाहीत; पण ज्यांच्या पेशींमध्ये सुस्पष्ट केंद्रक (न्यूक्लिअस) असते, त्या सजीवांना आदिजीव (प्रोटिस्टा) म्हणतात. छिद्रधारी संघ अशा आदिजीव सजीवांपैकी एक गट आहे.

हेही वाचा :कुतूहल : टुंड्रा प्रदेश

छिद्रधारी संघातल्या बहुसंख्य संजीवांचा अधिवास सागरी पाण्यात असतो. फारच थोड्या प्रजाती गोड्या पाण्यात असतात. छिद्रधारी संघातले सजीव एकपेशीय असतात. आकाराने अत्यंत सूक्ष्म असूनही, शंख आणि शिंपले ज्याप्रमाणे स्वत:च्या शरीराभोवती कवच निर्माण करतात, तसे छिद्रधारीही करतात. त्यातही नवलाईची गोष्ट अशी, की त्यांचे कवच केवळ त्यांच्या पेशीभोवती सीमित नसते; तर त्यामधे अतिसूक्ष्म कप्पे असतात. त्या कप्प्यांना कक्ष (चेंबर्स) म्हणतात. दोन कक्षांच्या मध्ये जो विभाजक पडदा असतो, त्या त्यात छिद्र असते. म्हणून या संघातल्या सजीवांना ‘छिद्रधारी’ असे नाव दिले गेले आहे.

छिद्रधारी संघातील सजीवांचे कवच कोणत्या पदार्थापासून तयार झाले आहे, यामध्ये काहीशी विविधता आहे. बहुसंख्य छिद्रधारी संजीवांचे कवच कॅल्शियम कार्बोनेटचे असते. काहींचे कायटीन नावाच्या पदार्थाचे असते. तर अगदी थोडे छिद्रधारी आपल्या पेशीभोवती सिलिका नावाच्या पदार्थाचे कवच तयार करतात. काही छिद्रधारी मात्र आजूबाजूच्या अवसादातले किंवा पाण्यातील खनिजाचे किंवा खडकांचे जे अतिसूक्ष्म कण असतात, ते कण स्वत:च्या पेशीभोवती चिकटवून घेतात. त्या इवल्याशा एकपेशीय सजीवांच्या पेशीद्रव्यात त्यासाठी खास सोय केलेली असते. असे सूक्ष्मातिसूक्ष्म कण चिकटवून तयार झालेल्या कवचाला संलग्नकणी कवच म्हणतात.

हेही वाचा :कुतूहल : सहारा वाळवंट

ज्या खडकात छिद्रधारी संघातल्या सजीवांचे जीवाश्म सापडतात, तो खडक ज्या कालखंडात निर्माण झाला त्या कालखंडात पुरापर्यावरण (पॅलिओएन्व्हायरॉनमेंट) नेमके कसे होते हे भूवैज्ञानिकांना अगदी अचूकपणे सांगता येते. खनिज तेलाचा शोध घेण्याच्या कामात छिद्रधारी सजीवांचे जीवाश्म मोलाची मदत करतात.

डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fossils of single celled organisms loksatta kutuhal article css