तामिळनाडूतील चेन्नईपासून ११५ कि.मी.वर असलेले वेल्लोर जिल्ह्य़ातील अरकाट येथे पूर्वी नवाबाचे राज्य होते. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला हा प्रदेश विजयनगरच्या साम्राज्यात अंतर्भूत होता. सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे मांडलिक असलेल्या मदुरा, तांजोर आणि कांची या राज्यांनी गोवळकोंडा आणि विजापूर या राज्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. पुढे मोगल बादशाह औरंगजेब याने हा प्रदेश घेऊन १६९२ साली झुल्पिकार अली याला मोगलांचा सुभेदार नवाब या पदावर नियुक्त करून अरकाट येथे त्याचे मुख्यालय आणि राजधानी केली. तत्पूर्वी तांजोर ऊर्फ तंजावरचा काही भाग नायकांच्या ताब्यात होता. तो १६७४ मध्ये व्यंकोजी भोसले याने घेऊन तंजावरला भोसले घराण्याचे राज्य स्थापन केले. अरकाट नवाब झुल्पिकार अली हा मूळ दुसरा खलिफा उमर बिन अल खताब यांचा वंशज असल्यामुळे मुस्लीम लोकांमध्ये नवाबाला महत्त्व होते. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल सत्ता उतरणीला लागली. तत्कालीन अरकाट नवाब सादत अल्लाह (१७१०-१७३२) याने अरकाटच्या स्वतंत्र राज्याची घोषणा केली. नवाब सादत आणि त्याच्या नंतरचा नवाब दोस्त अली यांनी अरकाट राज्यक्षेत्राचा विस्तार केला. १७३६ साली त्यांनी मदुराचे राज्य घेऊन अरकाटमध्ये सामील केले. पुढे १७४० साली मराठय़ांनी अरकाट राज्यातील दमालचेरी येथे नवाबावर आक्रमण केले. दमालचेरीच्या िखडीत मराठे आणि अरकाटच्या फौजांमध्ये झालेल्या युद्धात नवाब दोस्त अली आणि त्याचा मुलगा हसन अली मारले जाऊन त्यांचा पराभव झाला. दमालचेरीनंतर मराठय़ांनी अरकाटवर विनासायास कब्जा केला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा