२९ डिसेंबर १९५९ या दिवशी अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या मीटिंगमध्ये कॅल्टेक इथे सुप्रसिद्ध संशोधक रिचर्ड फाईनमन यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याख्यानाचा विषय होता, ‘देअर इज प्लेन्टी ऑफ रूम अॅट दी बॉटम.’ या व्याख्यानात त्यांनी पदार्थाच्या थेट अणूंची हाताळणी करण्याची शक्यता वर्तवली. एका अर्थाने ही नॅनो तंत्रज्ञानाचीच शक्यता फाईनमन यांनी व्यक्त केली होती.
‘नॅनो टेक्नॉलॉजी’ ही संज्ञा नोरिओ तानिगुची यांनी १९७४ साली सर्वप्रथम वापरली. अर्थातच त्या वेळी ही संज्ञा फारशी प्रचारात नव्हती. पण, १९८६ साली रिचर्ड फाईनमन यांच्या कल्पनेने प्रेरित झालेल्या अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील एरिक डेक्सलर या युवा संशोधकाने ‘इंजिन्स ऑफ क्रिएशन’ हे नॅनो तंत्रज्ञानावरचं जगातलं पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं. या पुस्तकात त्यांनी जीवशास्त्रीय प्रतिकृतींच्या आधारावर चक्क पदार्थाच्या रेणूंनी तयार झालेली सूक्ष्म यंत्रं कशी तयार करता येतील, याचं विवेचन केलं.
एरिक डेक्सलर केवळ पुस्तक लिहून थांबले नाहीत, तर नॅनो संकल्पना आणि या तंत्रज्ञानाचा प्रभाव यासंबंधी जनजागृती व समज वाढविण्याच्या हेतूने त्यांनी ‘दी फोरसाईट इन्स्टिटय़ूट’ या संस्थेची स्थापना करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. रासायनिक क्रियांच्या माध्यमातून अतिशय क्लिष्ट प्रतिकृती तयार करणं सोपं होईल, असं डेक्सलर यांचं म्हणणं होतं.
याच सुमारास म्हणजे १९८५ साली राईस विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञ रिचर्ड सॅली, रॉबर्ट क्लर्क या शास्त्रज्ञांनी हॅरि क्रोटो या खगोलशास्त्रज्ञांबरोबर २० षटकोन व १२ पंचकोनात कार्बनचे ६० अणू असलेला फुटबॉलसारखा दिसणारा रेणू तयार करण्यात यश मिळविले. त्याला नाव देण्यात आले ‘बकमिन्स्टर फुलेरिन.’ पुढे हा रेणू बकीबॉल म्हणून ओळखला जाऊ लागला. बकीबॉलचा शोध ही नॅनो तंत्रज्ञानाची नांदी होती. पुढे १९८९ मध्ये ‘स्कॅिनग टनेिलग सूक्ष्मदर्शक’ यंत्राचा वापर एकेक अणू हाताळण्यासाठी यशस्वीरीत्या करण्यात आला.
अशा प्रकारे एरिक डेक्सलर यांचे सद्धांतिक कार्य आणि तत्कालीन प्रायोगिक विकास यांतून एक संशोधन क्षेत्र म्हणून नॅनो तंत्रज्ञानाचा उदय झाला.
हेमंत लागवणकर (डोंबिवली) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा