मानसिक स्वास्थ्याचा दुसरा निकष म्हणजे परिस्थितीतील तणावांना सामोरे जाताना व्यक्ती स्वत:ला उत्साही आणि सक्रिय ठेवू शकते. ती स्वत:च्या विघातक भावनांना नियंत्रणात ठेवून त्यांचा परिणाम वर्तनावर होऊ देत नाही. औदासीन्य, चिंतारोग, पॅनिकअटॅक, फोबिया, आघातोत्तर तणाव, मंत्रचळ असे त्रास असताना हा निकष धोक्यात आलेला असतो. चिंता, भीती, राग, उदासी या भावना सर्व माणसांना असतात. मात्र त्यांचे प्रमाण वाढले आणि त्याचा माणसाच्या वागण्यावर दुष्परिणाम होऊ लागला, तर मानसोपचार आवश्यक ठरतात. चिंता आणि औदासीन्याशी संबंधित एक आजार परदेशात मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतो. आपल्या देशातही हा आजार आहे, पण त्याचे योग्य निदान न झाल्याने रुग्ण वेदनाशामक किंवा शक्तिवर्धक औषधे वर्षांनुवर्षे घेत राहतात. पण या आजाराचे मूळ औदासीन्यामध्ये असते. अँटीडिप्रेसंट औषधांनी या रुग्णाला काही काळ बरे वाटते. या आजाराला ‘क्रोनिक फटिग सिंड्रोम’ किंवा ‘फायब्रोमायाल्जिया’ असे म्हणतात.
खरे म्हणजे हे दोन वेगवेगळे आजार आहेत, पण त्यांची लक्षणे सारखीच आहेत. सर्व शरीरात स्नायूदुखी आणि खूप काळापासून जाणवणारा थकवा ही दोन प्रमुख लक्षणे त्यामध्ये असतात. म्हणूनच आपल्या येथे त्यांच्यावर वेदनाशामक औषधे आणि टॉनिक्स यांचा भडिमार केला जातो. त्यांच्या पॅथॉलॉजिकल चाचणीमध्ये मात्र कोणतीही विकृती आढळत नाही, म्हणजे हिमोग्लोबिन वगैरेचे प्रमाण योग्य असते. दोन्ही आजारांच्या इतिहासात मात्र फरक असतो.
‘फायब्रोमायाल्जिया’ची सुरुवात कोणत्या तरी भावनिक किंवा शारीरिक आघाताने झालेली असते, तर ‘क्रोनिक फटिग सिंड्रोम’ एखाद्या व्हायरल इन्फेक्शन म्हणजे फ्लू किंवा चिकनगुनियानंतर सुरू होतो. या दोन्ही आजारांचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा चारपटींनी जास्त दिसून येते. दोन्हींमध्ये शांत झोप लागत नाही आणि अस्वस्थता, चिडचिड अशी मानसिक लक्षणे दिसत असतात. या दोन्हीपैकी एका आजाराचे निदान झालेले आहे अशा ५० स्त्री रुग्णांवर साक्षीध्यानाचा परिणाम काय होतो, याचे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. त्यानुसार दहा आठवडय़ांच्या ध्यानवर्गानंतर ध्यान न करणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत ध्यानाचा सराव करणाऱ्या स्त्रियांचा त्रास कमी झालेला दिसून आला. याचे कारण या आजाराचे मूळ कारण रुग्णांच्या मेंदूतील ‘पेन थ्रेशोल्ड’मध्ये असते. साक्षीध्यानाने वेदनांना दिली जाणारी प्रतिक्रिया बदलली जात असते; त्यामुळे वेदना / थकवा यांचा त्रास कमी होतो.
– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com