ध्रुवीय महासागराच्या गोठलेल्या पृष्ठभागावर हिवाळय़ात अनेकदा शुभ्रधवल पुष्पांचे असंख्य ताटवे पसरले असल्याचे विहंगम दृश्य दिसून येते. ही सुंदर पुष्पे म्हणजे फुलांसारखे दिसणारे हिमस्फटिक असतात. या फुलांना इंग्रजीत ‘फ्रॉस्ट फ्लॉवर्स’ म्हणतात.
हिमपुष्पे तयार होण्याच्या घटना उत्तर ध्रुवावरील आक्र्टिक महासागरात जास्त घडून येतात. येथील तापमान नेहमी शून्य किंवा शून्याच्या खाली असून हा महासागर नेहमी बर्फाने झाकलेला असतो. या प्रदेशात अतिथंड कोरडे वारे वाहू लागले की जेथे बर्फ नुकतेच तयार झालेले असते अशा ठिकाणी जमिनीतून कोंब फुटावेत तशी ही हिमपुष्पे गोठलेल्या समुद्राच्या पृष्ठभागावर उमलू लागतात. ती का?
हेही वाचा >>> कुतूहल : राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो
ज्या वेळी हवेचे तापमान समुद्रपृष्ठावरील बर्फाच्या तापमानापेक्षा किमान १५ ते २० अंश सेल्सिअसने कमी झालेले असते व बर्फाचा थर भोवतालच्या हवेच्या मानाने उबदार असतो अशा वेळी बाष्पीभवनाची क्रिया घडून येते. पृष्ठभागाजवळील हवा बाष्पाने संपृक्त बनते आणि ते बाष्प पुन्हा गोठून त्याचे हिमस्फटिकांत रूपांतर होते.
या स्फटिकांचा आकार कधी पिसासारखा, कधी सुयांप्रमाणे तर कधी नेचे ह्या वनस्पतीच्या पानाप्रमाणे दिसतो. हिमपुष्पे अल्पजीवी असून साधारण काही तास ते आठवडाभर टिकतात, कारण बर्फाचा थर जाड होऊ लागतो तेव्हा त्याचा वरचा पृष्ठभाग थंड होतो आणि हिमपुष्पे नंतर वाढत नाहीत. हिमपुष्पे ही नव्याने तयार झालेल्या पातळ व ठिसूळ बर्फावर निर्माण होतात त्यामुळे त्यांच्याजवळ जाऊन निरीक्षण व अभ्यास करण्यावर मर्यादा येतात.
हेही वाचा >>> कुतूहल : ग्वानोची बेटे
प्रत्येक हिमपुष्पात सुमारे १० ते २० दशलक्ष इतके सूक्ष्म जिवाणू असतात. ही हिमपुष्पे समुद्राच्या पाण्यातील क्षार आणि सूक्ष्म जिवाणू शोषून घेत असल्याने समुद्राच्या पाण्याच्या तिप्पट खारटपणा त्यात असतो. या फुलांमध्ये पाऱ्याचे प्रमाण आढळून आले असून भविष्यातील हॅलोजन गटातील अधातू मूलद्रव्यांचे संभाव्य स्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सुमारे तीन ते चार इंचांपर्यंत वाढणारी ही पुष्पे नाजूक असून दिसण्यास अत्यंत मनोहारी असली तरी भोवतालच्या वातावरणावर विपरीत परिणाम करतात. त्यांच्यावरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की ब्रोमिन मोनॉक्साइड हे ओझोनच्या थराचा ऱ्हास करणारे संयुग या फुलांतून वातावरणात सोडले जाते.
– डॉ. सीमा खोत
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org