अनेक आदिवासी समाजांमध्ये अगदी सुरुवातीपासून फिरती शेती किंवा स्थानांतरित शेतीपद्धती आढळते. हिमालयातील आदिवासी जमातींपासून बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दक्षिणेतील केरळ, तमीळनाडूतील जमातींपर्यंत ही पद्धत रूढ होती. झूम, दहिया, बेवोर, पेंदा या नावांनी ही पद्धत ओळखली जाते. गडचिरोली जिल्ह्य़ातील बडा माडिया जमातीत लाहेरीपासून कुवाकोडीपर्यंतच्या भागात ही शेतीपद्धती पेंदा या नावाने अस्तित्वात होती.
आदिवासींचा एखादा समूह अरण्यातील एखाद्या भागात विशेषत: डोंगरउतारावर विशिष्ट जागेवरील सर्व झाडे तोडतो. उन्हाळ्यामध्ये ती झाडे वाळल्यानंतर जागच्याजागीच पेटवतात. झालेली राख पावसाच्या सरीबरोबर मातीत मिसळून दलदल तयार होते. नंतर त्यावर बियाणे फेकून देतात. म्हणून या पेरणीला हवेतून प्रसारण म्हणजे ‘ब्रॉडकास्ट पद्धती’ असेही म्हणतात. जमिनीत राख मिसळल्यामुळे तिचा कस उत्तम असतो. त्यामुळे पीक चांगले येते.
हे आदिवासी सुमारे दोन-तीन वर्षे एकाच जागी शेती करतात. मग थोडे पुढे जाऊन पुन्हा अशीच जंगलतोड करून शेती करतात. असेच फिरत फिरत बारा ते पंधरा वर्षांनी ते पुन्हा पहिल्या जागी येतात. म्हणून त्यास ‘ब्रॉडकास्ट पद्धती’ वा ‘वर्तुळाकार झूम शेती’ असेही म्हणतात. कोदो, कुटकी अशी कनिष्ठ तृणधान्ये यात घेतात. भात पिकेही घेतात. भूमातेला नांगरायचे नाही, तिला कष्ट होतील ही परंपरागत कल्पना या पद्धतीच्या मुळाशी आहे.
प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ प्रो. फ्यूरर हायमेन्डार्फ यांनी म्हंटल्याप्रमाणे या शेतीसाठी कमीत कमी श्रम व साधने लागतात. त्या तुलनेत उत्पादन मात्र जास्त होते. त्यामुळे जेव्हा जमीन मुबलक होती, माणसे कमी होती, तेव्हा ही पद्धत उपयुक्त ठरली असावी. आता मात्र हे प्रमाण उलट झाल्यामुळे शासनाला ही शेतीपद्धत थांबवावी लागली.
१९५९ ते १९६५ या काळात शासनाने या आदिवासींना सपाट प्रदेशात आणून झोपडय़ा व शेतीसाठी जमीन व बलजोडय़ा दिले. काही गावांना पुनस्र्थापित केले. तरी अजूनही दुर्गम भागात हा प्रकार तुरळक आढळतो.
आज स्थिरवस्ती करून राहाणारे आदिवासी स्थिरशेती करू लागले आहेत. यासाठी परंपरागत अवजारांच्या सोबतच आधुनिक ट्रॅक्टरादी अवजारांचा वापरदेखील ते करत आहेत.
– डॉ. प्रशांत अमृतकर (औरंगाबाद)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा