फळझाडांना सुरुवातीच्या काळात फारच कमी पाणी लागते. आंबा, काजू यांना तर प्रतिदिन एक लीटर पाणी पुरेसे होते.
एक एकरात ८० फळझाडे लावतात असे समजल्यास, पावसाळा सोडून प्रतिदिन एक लीटर प्रमाणे ८० ७ १ ७ २४० = १९,२०० लीटर पाणी लागेल. ज्या झाडांना प्रतिदिन २ लीटर पाणी लागते, अशा झाडांना प्रती एकर अंदाजे ४०,००० लीटर पाणी लागेल. अशा प्रकारे एका एकरातील फळझाडांना किती पाण्याचा साठा लागतो, ते काढता येईल. झाडांना पाणी देण्यासाठी मातीचा डिफ्युजर, बांबूचा कळक, भोके असलेली प्लास्टिकची दोन लीटरची बाटली, जीवनवाहिनी इत्यादीचा वापर केल्यास पाणी कमी लागते. ५००मीमी सरासरी पाऊस ज्या ठिकाणी पडतो, त्या ठिकाणी प्रती एकर पाण्याची उपलब्धता ४००० ७ ०.५ = २००० घनमीटर म्हणजे सुमारे २० लाख लीटर एवढी आहे. तसेच ज्या ठिकाणी ४००० मीमी पाऊस पडतो, तिथे प्रती एकर पाण्याची उपलब्धता ४००० ७ ४ = १६,००० घनमीटर म्हणजे १६० लाख लीटर एवढी आहे. फळझाडांना लागणारे पाणी यापेक्षा बरेच कमी असल्याने ते साठवून ठेवणे शक्य आहे.
कोकण जलकुंड, बंकर कुंड, जीओमेंब्रेनचे तळे, नारळाचा काथ्या, केळीचे धागे, अंबाडीचे धागे, तागाचे धागे इत्यादी वापरून केलेले जलकुंड, फेरोसिमेंटची जमिनीखाली वा जमिनीवर बांधलेली टाकी, सांगाडा वापरून वा न वापरता बांधलेली १००० लीटर फेरोसिमेंटची टाकी यांमध्ये पाणी साठवता येते.
टाक्यांमधील पाणी बाष्पीभवनाने उडून जाऊ नये यासाठी बांबूची चौकट करून भाताचा पेंढा किंवा सुके गवत, कशेळी पसरून किंवा नारळाच्या झावळ्यांनी झाकण बनवावे. पाण्याने जलकुंड भरल्यावर उंडी तेल/नीम तेल टाकावे. त्याने बाष्पीभवन कमी होते व उग्र वासामुळे मोकाट जनावरे, उंदीर, िवचू, सरडा जलकुंडाजवळ जात नाहीत व जलकुंड सुरक्षित राहाते. एक एकरावरील झाडांना लागणारे पाणी एके ठिकाणी न साठवता जर पाच किंवा सहा ठिकाणी साठवले तर प्रत्येक जलकुंड झाकून ठेवणे सोपे जाईल. अशा प्रकारे साठवलेले पाणी पुढील पावसापर्यंत वापरता येईल.
– उल्हास परांजपे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा