डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर, अल्बर्ट हार्वर्ड, मासानोबू फुकुओका आणि कोल्हापूरचे श्रीपाद अच्युत दाभोळकर यांनी शेतीकडे समग्रतेने पाहिले. शेती विषयावर चिंतन करून, त्यानुसार विविध प्रयोग करून सर्वाना समजेल, पचेल असे शेतीचे तंत्रज्ञान विकसित केले. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्यांचे प्रयोग इंदूरच्या आमच्या रंगवासा जैविक ग्राम संस्थेत आम्ही करून बघितले.
फुकुओका यांनी गव्हावर केलेला प्रयोग आम्ही करून बघितला. त्यांनी बियाणांना मातीत कालवून त्याच्या गोळ्या (पॅलेट) करून त्यांना शेतात एक-एक फूट अंतरावर (रोपांमधील तसेच रांगांमधील अंतर) लावायला सांगितले होते. आम्ही आमच्या अध्र्या एकर शेतातील पाच घमेली माती घेऊन ती कुटून बारीक केली. त्यात पाच घमेलं कुजलेलं शेणखत घातलं. त्यात ५०० ग्रॅम गव्हाचं बी (मुंडा पिस्सी जात), २०० ग्रॅम हरभरा, ५० ग्रॅम मेथी, ५० ग्रॅम तीळ व ५० ग्रॅम मोहरी यांचं बियाणं मिसळलं. यात हळूहळू गोमूत्र शिंपडत त्याचा आटय़ासारखा गोळा तयार केला. पुन्हा त्याच्या लहान-लहान गोळ्या केल्या. शेतात एक-एक फुटावर मूठभर गांडूळ खत ठेवून त्यावर गोळ्या ठेवत गेलो. यावर पुन्हा मूठभर गांडूळ खत ठेवलं. झारीने या गोळ्यांच्या वर पाणी सोडलं. नंतर पंधरा दिवसांच्या अंतराने चार वेळा याला पाणी दिलं. रोपं उगवल्यावर गहू व काही ठिकाणी मोहरी सोडून मेथी, तीळ व हरभऱ्याची रोपं काढून टाकली. फुटवा जोमदार आला. टोकलेल्या प्रत्येक ठिकाणी कमीतकमी २० व जास्तीतजास्त ४५ फुटवे (टिलर्स) आले. पीक जोमदार होते. पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात केली होती. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात कापणी केली. साडेपाच क्विंटल गहू व ५० किलो मोहरी मिळाली. म्हणजे, एकरी ११ क्विंटल गहू व १ क्विंटल मोहरी मिळाली.
या प्रयोगात फुकुओकाची गोळी पेरणी व दाभोळकरांची सूर्यशेती या दोन्हींचा अंतर्भाव होता. रोपांमध्ये एक-एक फूट अंतर सोडल्याने पानांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाला. यामुळे उत्पादन वाढले. निविष्ठा न वापरल्याने मजूर खर्च सोडता इतर खर्च आला नाही.
– अरुण डिके (इंदूर) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा