गॅलिलिओ गॅलिली या निर्भीड वृत्तीच्या इटालियन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाचा जन्म १५६४ साली पिसा येथे झाला. एका रविवारी चर्चमधील हलणारे झुंबर पाहून त्याने स्वत:च्या हाताच्या नाडीवरून लंबकाच्या दोलनाच्या वेळेसंबंधी विविध प्रयोग केले. त्यावरून त्याने हे सिद्ध केले की, लंबकाचे दोलन त्याच्या दोरीच्या लांबीवर अवलंबून असते. यानंतर गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक बॅलन्स बनविला. घरच्या वाईट आíथक परिस्थितीमुळे गॅलिलिओला विद्यापीठीय शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पुढे उदरनिर्वाहासाठी गॅलिलिओने शिकवण्या सुरू केल्या. त्याच्या विद्वत्तेमुळे पाटुआ विद्यापीठात त्याला नोकरी मिळाली. त्या काळात अॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला. पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बणिीमुळे लागले. अॅरिस्टॉटलच्या सिद्धांतांच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बणिीतून पाहू लागल्यामुळे तो काही तरी जादूटोणा करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला. त्याच्या शोधांमुळे अॅरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धांतांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या ७८ व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची पाच वष्रे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा