इसवीसन १५८३, स्थळ : पिसा येथील कॅथ्रेडल चर्च. १७-१८ वर्षांचा मुलगा अगदी नाइलाजाने धर्मगुरूंचे कंटाळवाणं प्रवचन ऐकत होता. एका क्षणी त्याची भिरभिरणारी नजर हेलकावे घेत असलेल्या झुंबरांकडे स्थिरावली आणि त्याच्या ओठावर स्मितहास्य पसरलं.
घरी आल्यावरदेखील झुंबरांचाच विचार! स्वारी उलटसुलट प्रयोगात मग्न झाली. त्यातून त्याने काढलेला निष्कर्ष असा की, लंबक आकाराने कसाही असो, जड असो, हलका असो, त्याला झोका कमी द्या, मोठा द्या; पण लंबकाच्या आंदोलनाला सारखाच वेळ लागतो. त्याचा आंदोलनकाल बदलत नाही. मात्र लंबकाची लांबी कमी-जास्त झाली तर मात्र त्याच्या आंदोलनकालात फरक पडतो. हा मुलगा म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली! याच लंबकाचा वापर गॅलिलिओंनी पुढे त्यांचे ‘गतीचे नियम’ मांडण्यासाठी केला.
पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने वस्तू खाली खेचल्या जातात. पडताना त्यांचा वेग वाढत जातो, पण वेगातील ही वाढ त्या वस्तूंच्या आकारावर किंवा वस्तुमानावर अवलंबून नसते; हे साध्या प्रयोगाने गॅलिलिओंनी सिद्ध केलं. जी दुर्बीण दूरवरच्या बोटी पाहण्यासाठी वापरली जायची, तिला गॅलिलिओंनी आकाशाकडे वळवलं नि आतापर्यंत न दिसलेल्या अनेक गोष्टी जगानं पाहिल्या. चंद्रावरचे डोंगर-विवरं, दूरवरचे ग्रह तारे, गुरूचे चार चंद्र (जे आज गॅलिलिओचे चंद्र म्हणून ओळखले जातात), शुक्राच्या कला आणि अशा किती तरी गोष्टी!
गॅलिलिओंनी त्वरण (प्रवेग) आणि प्रक्षेपिकी यावर बरंच संशोधन केलं. गुरुत्वीय त्वरणाचं गॅलिलिओ हे एकक त्यांच्या नावावरून दिलं गेलं आहे. मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो. गॅलिलिओंनी हायड्रोस्टॅटिक तराजूही बनविला होता.
कोपíनकसचा सिद्धांत बरोबर असून पृथ्वीचं स्थान विश्वाच्या केंद्रस्थानी असल्याचा समज चुकीचा आहे, हे गॅलिलिओंनी गणिताने सिद्ध केलं.
त्या काळात. एखादा सिद्धान्त केवळ वादविवाद करून प्रस्थापित करण्याची परंपरा होती. गॅलिलिओंनी मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीन पायंडा पाडला.
अॅरिस्टॉटलचे अनेक सिद्धांत चुकीचे असल्याचे गॅलिलिओंनी सिद्ध केले; पण पाखंडी असल्याचा आरोप ठेवून त्यांना कैदेत ठेवलं गेलं. बंदिवासात असतानाच त्यांनी ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहून गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केलं. बंदिवासातच ८ जानेवारी १६४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
–चारुशीला सतीश जुईकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
‘माटीमटाल’ : गद्याचा अभिनव आविष्कार
गोपीनाथ माहान्ति यांच्या ‘माटीमटाल’ या कादंबरीला १९७३चा ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे. उडिसाच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी ही कादंबरी सुमारे १००० पृष्ठांची आहे. . विस्तृत कथानक, नानाविध पात्रे, त्यांच्या अंतरंगातील द्वंद्वे, निसर्गाची बदलती रूपे- या साऱ्यातून ‘माटीमटाल’ हा गद्याचा एक अभिनव आविष्कार माहान्ति यांनी घडवला आहे. ‘माटीमटाल’ म्हणजे जणूकाही एक गद्यकाव्यच आहे. बट माहान्ति हे सरंजामशाहीचे प्रतीक असून, आरतपंडा हा स्वातंत्र्यपूर्व काळातील नि:स्पृहतेचे प्रतीक आहे.भारतातील ओरिसा प्रांत, त्यातील छोटी छोटी गावे. अशाच एका बन्धमूल खेडय़ातील ही गोष्ट. तालेवार घराण्यातील बट माहान्ति ही व्यक्ती. परंपरागत चालीरीती, रूढी यांचे पालन करावे, देशसेवा वगैरे सारे झूठ- अशा आत्मकेंद्रित, स्वार्थी विचारांचा हा माणूस.
यांना दोन मुले. एक कवी. हा गाव सोडून शहरात स्थायिक झालेला. दुसरा मुलगा रवी बी.ए. झाला. त्याला आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान तसेच दोन दलित, अन्यायपीडित लोकांबद्दल अपार करुणा. सरंजामदारांकडून या लोकांची होणारी पिळवणूक, व्यापाऱ्यांची कूटनीती, राजकारण्यांचा स्वार्थ- हे सारे पाहून त्याच्या मनात खळबळ माजली होती. त्याला गावातच राहायचे होते. पण वडिलांच्या आग्रहामुळे तो नोकरीच्या शोधात शहरात येतो. पण तिथले वातावरण पाहून तो परत गावी यायला निघतो. वाटेत त्याला जोगी, डोम, आहिर अनेक वस्त्या असलेली पाटेली गाव लागते.
या पाटेली गावात सिंधू चौधरींचे एकेकाळचे संपन्न कुटुंब राहत होते. पण आता उतरती कळा लागली होती. गांधीवादाचे आचरण म्हणून सूतकताई, खादी वापर करणारे, संयमी, शांत, परोपकारी सिंधू चौधरींची जिद्दी स्वभावाची एकुलती एक मुलगी छबी. या रवी-छबीच्या लग्नाला रवीच्या वडिलांचा विरोध, कारण त्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती. या कथानकामुळे ‘माटीमटाल’ ही रवी-छबीची प्रेमकथा आहे असे वाटत असले तरी के अर्धसत्य आहे. ‘माटीमटाल’ची खरी कथा आहे, मानवी जीवनाचे, नूतन सहकाराचे, सामाजिकतेचे, सामाईकतेचे रवीने पाहिलेल स्वप्न. पक्क्या मातीच्या पायावर उभारलेली ‘सामलातीची’ (सहकाराची) कल्पना हीच मुख्यत: कादंबरीला व्यापून उरणारी आहे.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com