प्रा. चिन्मय थिटे
रत्न म्हणजे खूप दुर्मीळ, पराकोटीची आकर्षक आणि अत्यंत टिकाऊ वस्तू. रत्नांचा वापर लोक आभूषणामध्ये किंवा अन्य काही वस्तू सजवण्यासाठी करत असतात. दुर्मीळ असूनही रत्नांना बाजारात खूप मागणी असते. त्यामुळे रत्ने खूप महाग असतात. रत्नांचा परिचय आपल्या पूर्वजांना नक्की कधी झाला, हे सांगता येणे कठीण आहे. पण अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान वस्तू म्हणून रत्ने फार पूर्वीपासून वापरली जात होती, हे मात्र नक्की. अगदी सिंधू संस्कृती आणि इजिप्तच्या संस्कृतीतही रत्नांचा वापर राजपरिवारांच्या दागिन्यांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये केला जात होता. रत्नांबद्दलचे आकर्षण आजही टिकून असल्याचे आपण पाहतो.
काही अपवाद वगळता बहुसंख्य रत्ने म्हणजे पाषाणांमध्ये आढळणारी खनिजे आहेत. आपला सहजासहजी विश्वास बसणार नाही, पण रत्ने खाणीतून जशी निघाली तशी पाहिली, तर ती अत्यंत बेढब आणि अनाकर्षक दिसतात. तथापि त्याच रत्नांना पैलू पाडले की इंद्रधनुषी रंगांनी ती झळाळू लागतात. आणि डोळ्यांचे पारणे फेडतील इतकी सुंदर दिसतात. याचे कारण त्या रत्नखनिजांमधल्या रेणूंची रचना. त्या रचनेमुळे खनिजांना पारदर्शक स्फटिकांचे रूप मिळते; त्यांना वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशीय गुणधर्म प्राप्त होतात आणि पलीकडच्या बाजूने रत्नावर पडणारा पांढरा प्रकाश रत्नातून बाहेर पडताना निरनिराळ्या मोहक रंगछटा धारण करून बाहेर पडतो.
साधारणत: अठराव्या शतकात युरोपमधल्या ज्ञानाच्या पुनरुत्थानाच्या चळवळीतून (रेनेसाँ मूव्हमेंट) अनेक विज्ञानशाखा विकसित झाल्या, त्याच सुमाराला रत्नविज्ञानाचाही (जेमॉलॉजी) उदय झाला. पूर्वी हिरे आणि इतर मौल्यवान रत्ने फक्त भारतीय उपखंड आणि त्याच्या परिसरातच सापडतात असे मानले जात असे. मात्र जसजसा भूविज्ञानाचा अभ्यास वाढत गेला, तसतसे देशोदेशी भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि संशोधन होऊ लागले. त्यातून हळूहळू इतरही अनेक देशांमध्ये रत्नांचे समृद्ध साठे आढळले. रत्नांविषयीच्या पारंपरिक धारणांना छेद मिळाला आणि जागतिक बाजारात निरनिराळ्या देशांमधील रत्नांचा प्रवेश झाला.
नाना तऱ्हेची खनिजे मानवाला विविध प्रकारे उपयोगी पडत असतात. त्यामुळे खनिजविज्ञानाला जशी शैक्षणिक (अकॅडेमिक) बाजू आहे, तशी उपयोजित (अॅप्लाइड) बाजूही आहे. खनिजांचे जे अनेक उपयोग होतात, त्यात रत्न म्हणूनही आपण खनिजांचा वापर करतो; म्हणून रत्नविज्ञान ही खनिजविज्ञानाची उपयोजित शाखा आहे. व्यवहारात वापरली जाणारी सर्वच रत्ने खनिजे नसतात. अपवाद म्हणून जैव पदार्थांपासून निर्माण झालेले काही पदार्थ रत्ने म्हणून वापरली जातात. त्यातली नेहमी वापरली जाणारी रत्ने म्हणजे मोती, पोवळे आणि तृणमणी (अँबर)!
प्रा. चिन्मय थिटे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org