मोती, पोवळे यांच्यासारखी जैव, म्हणजे सजीवांच्या शरीरात तयार होणारी मोजकी रत्ने सोडली, तर बाकीची रत्ने निसर्गात खनिज रूपातच आढळतात. याचा अर्थ सर्वच खनिजांचा उपयोग रत्न म्हणून करता येतो असा नाही. कारण रत्न म्हणजे अत्यंत दुर्मीळ, नेत्रदीपक सौंदर्य असणारी आणि टिकाऊ अशी नैसर्गिक वस्तू होय. ज्या खनिजांमध्ये हे गुणधर्म दिसून येतात, अशा निवडक खनिजांना मानवाने रत्न म्हणून मान्यता दिली आहे. त्या खनिजांची संख्या नव्वदच्या आसपास जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधुनिक विज्ञानाची प्रगती होण्याच्या खूप आधीपासून मानव रत्ने वापरत आला आहे. त्या काळीही मानवाला रत्नांचे अप्रूप होतेच. पण त्यांच्याविषयी असणारी माहिती मात्र परिपूर्ण नव्हती. खनिजविज्ञान जसजसे विकसित झाले, तसतशी आपल्याला रत्नांविषयी अधिकाधिक माहिती मिळू लागली. काही खनिजांमध्ये बहुरूपता दिसून येते याचाही शोध लागला. त्यातून रत्नांचा राजा म्हणून मान्यता असणारा हिरा हा जगातला सर्वात कठीण असणारा पदार्थ आणि शिसपेन्सिलीमध्ये वापरले जाणारे अत्यंत मऊ असणारे ग्रॅफाइट हे खनिज, दोन्ही कार्बनचीच रूपे आहेत अशी आश्चर्यकारक माहिती पुढे आली.

बहुरूपता दाखवणारी खनिजे निसर्गात निरनिराळय़ा प्रकारच्या स्फटिक रूपांमध्ये, इतकेच नव्हे तर वेगवेगळय़ा रंगांमध्येसुद्धा आढळू शकतात. उदाहरणार्थ, पारदर्शी रंगहीन स्फटिकमणी (रॉक क्रिस्टल), पिवळसर छटा असणारा सुनहेला (सिट्रिन) आणि जांभळट छटा असणारा जामुनिआ (अमेथिस्ट), ही क्वाट्र्झ नावाच्या खनिजाचीच तीन रूपे आहेत. त्याचप्रमाणे लाल रंगाचे माणिक (रुबी) आणि निळय़ा रंगाचे नीलम (सफायर) ही रत्ने कुरुंद (कोरंडम) नावाच्या खनिजाचीच रूपे आहेत; शिवाय नीलम (सफायर) क्वचित पिवळय़ा रंगाचा अथवा हिरव्या रंगाचाही असू शकतो.

याउलट काही वेगवेगळी खनिजे एकसारख्या रंगाचीही असतात आणि ती एकाच नावाने ओळखली जाऊ शकतात, याचीही माहिती झाली. जर एखाद्या व्यक्तीला पुष्कराज (टोपाझ) नावाचा पिवळय़ा रंगाचा खडा हवा असेल, तर पिवळय़ा रंगाच्या सफायरलाही काही जण पुष्कराजच म्हणत असल्याने खरेदी करताना कदाचित् गफलत होऊ शकते. तसेच खरे तर हेसोनाइट नावाच्या खनिजाला गोमेद म्हणतात. पण काही जण ओनिक्स नावाच्या खनिजाला, तर काही जण टूर्मलीन नावाच्या खनिजालाही गोमेदच म्हणतात.

रत्ने खूप महाग असल्याने नेमके हवे तेच रत्न आपल्याला मिळत आहे ना, याची खात्री करून घ्यायला हवी. रत्नांची ओळख अचूकपणे पटायची असेल तर त्याचे विशिष्ट गुरुत्व आणि वक्रीभवनांक शोधणे हा हमखास उपाय आहे.

– डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gems and their colours facts about gems zws