एव्हिसेनिएसी कुलात महाराष्ट्रात एव्हिसेनिया मरिना आणि एव्हिसेनिया ऑफिसीनालिस या दोन प्रजाती आढळतात. याला राखाडी मॅन्ग्रोव्हदेखील म्हटले जाते, तर किनारी भागात याला तिवर या नावाने ओळखले जाते. ते साधारणपणे १५-२५ मीटर उंच वाढतात आणि त्यांची साल हलकी राखाडी असते. एव्हिसेनिया मरिना या प्रजातीची पाने जाड, चकचकीत, टोकदार आणि वरच्या बाजूला चमकदार हिरवी आणि खालच्या बाजूला लहान केसांसह राखाडी किंवा चंदेरी पांढरी असतात. एव्हिसेनिया ऑफिसीनालिसच्या पानांचा आकार लंबगोलाकार असून त्यांचा रंग वरच्या बाजूस काळपट हिरवा व खालच्या बाजूस राखाडी असतो. भरतीच्या वेळी मातीमध्ये पाणी साचल्यामुळे या प्रजातींना ऑक्सिजनची कमतरता जाणवते, त्या वेळेस अशा वनस्पतीच्या मुळांमध्ये परिवर्तन दिसून येते, यांना ‘श्वसनमुळे’ म्हणतात. ही श्वसनमुळे वल्करंध्रांच्या (लेंटिसेल) मदतीने हवेतील ऑक्सिजनची देवाणघेवाण करतात व त्यांच्या मुळांपर्यंत पोहोचवतात. या मुळांची वाढ होऊन ती चिखलातून वर येतात. त्यांचा आकार पेन्सिलसारखा दिसतो. त्यामुळे त्यांना ‘पेन्सिल रूट्स’ (न्युमॅटोफोर) असे म्हणतात.
खारफुटीच्या भागात वाढणाऱ्या या प्रबळ प्रजाती असून या कुलातील सर्व प्रजाती उच्च क्षारता सहन करणाऱ्या खारफुटींपैकी आहेत. खारट पाण्यात वाढत असताना त्यांना क्षाराचे नियमन करावे लागते. पानांमध्ये असलेल्या क्षारग्रंथींमधून जास्तीचे मीठ स्फटिकाच्या रूपात बाहेर टाकले जाते. खारफुटीमध्ये पुनरुत्पादनासाठी विविध पद्धती अवलंबल्या जातात. एव्हिसेनिया प्रजातीमध्ये अदृश्य अपत्यजनन (क्रिप्टो व्हिव्हिपॅरी) पद्धत आढळते, ज्यामध्ये बियांच्या आवरणातून अंकुर बाहेर येतो. पण मूळ वनस्पतीपासून वेगळे पडण्यापूर्वी फळामध्ये राहतो. पाण्याच्या मदतीने ही विखुरली जातात तसेच मुळांशिवाय खाऱ्या पाण्यात एक वर्षांपर्यंत राहू शकतात.
एव्हिसेनिया या प्रजातीचे अनेक उपयोग आहेत. किनारी भागातील रहिवाशांकडून या वनस्पतीचे लाकूड सामान्यत: इंधन म्हणून आणि बांधकामासाठी वापरले जाते. तसेच पाने चारा म्हणून गुरांना दिली जातात. स्थानिक लोक याची पाने, फळे, झाडाची साल त्वचारोग व पचन विकारांवरील उपचारांत वापरतात. खारफुटीच्या सर्व प्रजातींप्रमाणेच एव्हिसेनियाच्या प्रजाती अनेक प्रकारे परिसंस्थेला लाभदायक आहेत. किनारपट्टीची धूप रोखण्यास मदत करते. शिवाय, किनाऱ्यावरील मासे आणि शेलफिशच्या अनेक प्रजाती प्रजनन व अंडी उबवणुकीचे ठिकाण म्हणून खारफुटीवर अवलंबून असतात.
– डॉ. तरन्नुम मुल्ला
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org