अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या युरेनियम या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या खनिजाचे नाव आहे युरेनिनाइट. भारतात या महात्त्वाच्या खनिजाचा शोध १९५१ मधे झारखंडमधल्या जदुगोडा येथे लागला. तेथील खनिजाच्या शोधापासून ते प्रायोगिक खाणकाम यशस्वी करण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारे भूवैज्ञानिक डॉ. गजानन राजाराम उदास यांचा जन्म २८ जानेवारी, १९२१ रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) येथे झाला. घरातले वातावरण देशभक्तीने भारलेले असल्याने महाविद्यालयीन शिक्षण सोडून उदास यांनी १९४२च्या आंदोलनात उडी घेतली. त्यात त्यांना चार महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षाही भोगावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९४४ मध्ये त्यांनी भूविज्ञान विषय घेऊन स्नातकोत्तर पदवी मिळवली. पदवी मिळाल्यावर आता पाकिस्तानात असणाऱ्या पेशावरजवळच्या चित्राल इथे ते खाण व्यवस्थापक (माइन्स मॅनेजर) म्हणून रुजू झाले. मात्र फाळणी झाल्यानंतर त्यांना पठाणाचा वेश करून लपत-छपत स्वतंत्र भारतात परत यावे लागले. १९५० साली नव्याने स्थापन झालेल्या केंद्र शासनाच्या परमाणू खनिज विभागात त्यांची नियुक्ती झाली.

१९६१ साली त्यांनी अमेरिकेला भेट दिली. तिथे भूजलात आणि विशेषत: नदीपात्रातल्या रेतीतही युरेनिनाइट सापडू शकते, ही नवीन माहिती त्यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी हिरिरीने हिमाचल प्रदेश, मेघालय, आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये युरेनियमच्या खनिजांच्या साठ्यांचा शोध लावला. १९६५ मधे त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयाचे प्रा. रतन नादिरशॉ सुखेशवाला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट प्राप्त केली. गुजरातमधील छोटा उदेपूर जिल्ह्यातल्या अंबाडोंगरजवळ सापडलेले फ्ल्युओराइट नावाचे महत्त्वाचे खनिज, तिथले कार्बोनटाइट नावाचे खडक, आणि त्यांच्या जोडीने आढळणारी अन्य काही दुर्मीळ मूलद्रव्यांची खनिजे यांच्यावर त्यांनी संशोधन केले. ते पुढे सुरू ठेवण्यासाठी काही काळ मध्य प्रदेशातल्या सागर विद्यापीठात अतिथी संशोधक म्हणून काम केले.

१९६७ मध्ये ते आण्विक खनिज विभागात परतले. १९७४ मध्ये त्यांची संचालकपदी नियुक्ती झाली. त्याच वर्षी भारताने पोखरण येथे अणुचाचणी घेतली. त्यानंतर जगाने भारताला आण्विक खनिजांचा पुरवठा बंद केल्याने अणुऊर्जा प्रकल्प चालवणे ही एक समस्याच होऊन बसली. तथापि त्या समस्येला डॉ. उदास यांनी सक्षमपणे तोंड दिले,

मराठी विज्ञान परिषदेच्या १९८२ साली कोल्हापूर येथे भरलेल्या सतराव्या वार्षिक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरजवळच्या अब्दुललाट या गावी जाऊन मीठफुटी जमिनींची पाहाणी केली होती, आणि त्याबाबत शेतकऱ्यांशी संवादही साधला होता. डॉ. उदास यांचा मृत्यू १८ जानेवारी, १९९५ रोजी पुणे येथे झाला.

अ. पां. देशपांडे 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org