जिओत्तो डी बोंदोने (इ.स. १२६६-१३३७) हा फ्लोरेन्सजवळच्या खेडय़ात जन्मलेला एक महान चित्रकार आणि वास्तुरचनातज्ज्ञ होता. युरोपातील प्रबोधन काळात युरोपातील कला, साहित्य, संस्कृती आणि वास्तुकला यात आमूलाग्र बदल करून एका उंचीवर नेण्याचे कार्य करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये जिओत्तो हा सुरुवातीचा आणि ज्येष्ठ जिओत्तो या लोहाराच्या मुलाने चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर रोममधील कलाकृतींचा अभ्यास केला. पुढील आयुष्यात पडुआ, असिसी, रोम, फ्लोरेन्स येथे त्याने फ्रेस्को आणि म्युरल्स या कलाप्रकारांमध्ये आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीने कला क्षेत्रात नवयुग सुरू केले. पारंपरिक बायझन्टाइन चित्रशैलीत त्याने आमूलाग्र बदल करून त्यातील व्यक्तिरेखा वास्तववादी, नसर्गिक हावभाव असलेल्या चितारल्या. देवदेवतांना सोनेरी रंग न देता सर्वसामान्य माणसांच्या रंगात चितारल्यामुळे जिओत्तोने काही धर्मगुरूंचा रोषही ओढवून घेतला होता. जिओत्तो काही वष्रे नेपल्स येथे दरबारी चित्रकाराच्या नोकरीत होता आणि पुढे १३३४ साली त्याची नियुक्ती फ्लोरेन्सचा नगररचनातज्ज्ञ म्हणून झाली. या काळात त्याने फ्लोरेन्सचे रस्ते, प्रासाद यांचे आराखडे तयार करून तेथील प्रसिद्ध कॅथ्रेडलच्या बेल टॉवरचे बांधकाम सुरू केले. जिओत्तोने निर्मिलेल्या विख्यात कलाकृतींमध्ये असिझी येथील सॅनफ्रान्सिस्को चर्चच्या िभतींवरील सेंटर फ्रान्सिसच्या आख्यायिकांचे फ्रेस्को, पडुआ येथील अरेना चर्चमधील मेडोनाचे चित्र, लास्ट जजमेंट हे म्युरल्स, द लॅमेंटेशन, द फाइट इन टू इजिप्त, द ब्रिटेअल ऑफ ख्राइस्ट, द मीटिंग अ‍ॅट द गोल्डन गेट यांचा समावेश होतो. जिओत्तोच्या चित्रकारितेचे वैशिष्टय़ म्हणजे त्याने त्याच्या व्यक्तिरेखांमध्ये आनंद-दु:खाचे स्वाभाविक सूक्ष्म हावभाव ओतून आपल्या कलाकृतीत जिवंतपणा आणला. दान्ते हा फ्लोरेन्सचा साहित्यिक ज्याप्रमाणे साहित्य क्षेत्रातील प्रबोधन काळाचा जनक समजला जातो त्याचप्रमाणे जिओत्तो हा त्याचा समवयस्क कला क्षेत्रातील प्रबोधन काळाचा जनक होय.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
झाडाची मुळे
कुठल्याही वृक्षाचे देखणेपण त्याचे खोड, फांद्या आणि पर्णसंभार या बरोबरच जमिनीखालील मुळांमध्येसुद्धा असते जेवढी मुळे खोल आणि दहा दिशांना पसरलेली असतात. तेवढा तो वृक्ष डेरेदार आणि सुंदर दिसतो. रस्त्यावरून जाताना आपण कितीतरी वृक्षांना वेडय़ावाकडय़ा अवस्थेत पाहतो. वृक्षाची ही अवस्था त्याच्या मुळांची वाढ आणि त्याच्यावरील आघात दर्शवते. मुळे आणि वृक्षाचा जमिनीवरील भाग यांचे प्रमाण १:५ असे दिसते. वड, िपपळ यांसारख्या मोठय़ा वृक्षांत हे प्रमाण नेहमीच जास्त असते. डेरेदार वृक्षाची सावली जेथे पोहचते तीथपर्यंत मुळे पोहचलेली असतात. जमिनीमध्ये साधारण १ मीटर खोलीपर्यंत मुळाचा पसारा ९०% असतो. कुठलाही वृक्ष जेव्हा रोपटे या अवस्थेत असतो तेव्हा त्याच्या मुळाची वाढ गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होते. नंतर जसजसा वृक्ष मोठा होऊ लागतो तसतशी मुळे जागा आणि संधी शोधत मिळेल तशी वाढत जातात. जमिनीत उपलब्ध पाणी, ऑक्सिजन, खनिजे, आधारस्थाने आणि ऊबदारपणा यावरून मुळाची खोल जाण्याची क्षमता ठरते. नदीकाठच्या वृक्षांची मुळे जास्त खोल जात नाहीत, मात्र वाळवंटातील झुडपांची मुळे वाळूमध्ये कित्येक मीटर खाली जातात. भूगर्भातील पाणी मुळांची खोली दर्शवते, त्याचप्रमाणे ऑक्सिजन वायूसुद्धा मुळांची समांतर वाढ आणि खोलीचा दर्शक आहे. मुळे सरळ खोल गेली की वृक्ष डेरेदार होतो. मात्र त्याच्या प्रवासात अडथळा आला की मूळ दिशा बदलते. झाड वाकडे होऊन अपघातास कारण होते. वृक्षाची आधार देणारी मुळे जमिनीमध्ये चार साडेचार मीटपर्यंत खोल जाऊ शकतात. मात्र पाणी आणि खनिजे शोषणारी मुळे जमिनीखाली अध्र्या मीटपर्यंतच गर्दी करतात. बांधकाम आणि रस्ता रुंदीकरणामध्ये मुळांना नेहमीच नुकसान पोहोचते.
मुळांची वाढ सुदृढ हवी असेल तर वृक्षाभोवतीची एक मीटर त्रिज्येची मोकळी जागा हवी. वृक्षारोपण करताना छान वाढ झालेली वृक्षबाळे १ मीटर बाय १ मीटर बाय १ मीटर खड्डय़ात लावायची असतात, ती केवळ त्यांची मुळे खोल जावीत म्हणूनच. वृक्ष आणि त्याचे मूळ यांचे नाते समजून घेतल्यास वृक्षारोपण यशस्वी होण्यास मदत होईल.
डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा