शेळ्या आपली भूक ६०-७० टक्के झाडपाल्यावर आणि २५-३० टक्के गवतावर भागवतात. शेळीच्या गाभण काळातील सुरुवातीचे तीन महिने गर्भाची वाढ सावकाश होते. गर्भाची जवळजवळ ६०-७० टक्के वाढ शेवटच्या दोन महिन्यांत होते. गर्भवाढीसाठी जास्तीचा खुराक, सकस व पचनास हलका चारा देणे आवश्यक असते. खुराकामध्ये प्रथिने, कबरेदके (मका, ज्वारी इत्यादी), स्निग्ध पदार्थ (शेंगदाणा पेंड), क्षार व जीवनसत्त्वे मिश्रण पूरक प्रमाणात दिल्यास करडांच्या हाडे वाढीसाठी, वजनवाढीसाठी, सुलभ प्रसूतीसाठी व निरोगी पदाशीसाठी मदत होते.
गाभण शेळी विण्याच्या एक आठवडय़ापूर्वी हिरव्या चाऱ्याचे प्रमाण थोडे कमी करून वाळलेल्या व द्विदल चाऱ्याचे प्रमाण वाढवावे. गोठय़ात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. लांब अंतरावर चरायला नेऊ नये. शेळ्यांना पळवू नये. मारामारी करणाऱ्या शेळ्यांना वेगळे करावे. गर्भाची पूर्ण वाढ झालेल्या शेळ्यांचे पोट मोठे दिसते. शरीरावर चमक दिसते. कासेचा आकार वाढलेला दिसतो. शेळ्यांना फिरण्याचा हलका व्यायाम द्यावा.
करडू जन्माला आल्याबरोबर अध्र्या तासाने त्याला पहिले दूध म्हणजे चीक त्याच्या वजनाच्या दहा टक्के प्रमाणात विभागून २-३ वेळा द्यावे. यात रोगप्रतिकारक प्रथिने, प्रतिजैविके असतात. त्यामुळे ते करडांसाठी कवचकुंडलेच असतात. करडांना दररोज ४-५ वेळा दूध पिण्यास सोडावे. करडे आईसोबत राहात असल्यास ते त्यांच्या गरजेनुसार दूध पितात. अशा करडांचे आरोग्य उत्तम असते. १५-२० दिवसांची करडे हिरवा चारा चघळायला सुरुवात करतात. एक महिन्यानंतर ३०-५० ग्रॅम खुराक चालू करावा. खुराकामध्ये मकाभरडा, गव्हाचा कोंडा, दाळचुनी, भुईमूग पेंड, क्षारमिश्रण, मीठ यांचा समावेश असावा. वजनवाढ होत जाईल तसतसे खुराकात वाढ करून २५०-३०० ग्रॅमपर्यंत वाढवता येते. या काळात करडांना कडुिनबाचा झाडपाला सुरू करावा. यामुळे हगवण व जंतांचे प्रमाण आटोक्यात येते. करडे एक महिन्याचे असताना त्यांचे जंतनाशक औषधाने जंतनिर्मूलन करून घ्यावे. तीन महिने वयानंतर करडांचे आंत्रविकार व सांसíगक आंत्रदाह रोगांविरुद्ध लसीकरण करून घ्यावे.
जे देखे रवी.. – अहिंसा
अहिंसेवर व्याख्यान देण्याची वाट बिकट आहे असे ज्ञानेश्वर स्वत:च कबूल करतात. शेवटी सजीव सृष्टीतले उष्मांक (calories) गिळणारे आपण हत्या करूनच जगत असतो. ह्य़ाला ‘जीवो जीवस्य जीवन’ असे म्हणतात. कंद काढावे खणून, मुळे मिळवावी उपटून, साल सोलून गाळावे रस, मग हे सारे उकडावे, प्राण्याचे पित्तही काढावे ही आयुर्वेदाची व्यवस्था, अहिंसेसाठी हिंसा अशा ओव्या सांगताना ज्ञानेश्वर त्यांच्या समोरची अडचण दाखवतात. बोलायचे गीतेवर ज्यात,
‘आता बस झाले हत्या करणे अपिहार्य ठरले,
तेव्हा मन चित्त शांत ठेऊन शत्रुला मार’
असाच निरोप आहे. हे झाले युद्धाबद्दल परंतु नेहमीच्या आयुष्यातही पैशाच्या व्यवहारात हेच चालते.
घरे उधळली, बांधली देवळे,
व्याजाने शोषले आणि मांडली अन्न छत्रे
ही ओवी हिंसात्मक शोषणाबद्दलच आहे. लहानपणी माझ्या हूड आणि व्रात्यपणामुळे मी आईचा भरपूर मार खाल्ला आहे. (आई मला अतोनात मारायची हे वाक्य जास्त हिंसात्मक आहे) ‘रविन, रक्त आटवतोस तू माझ, अभ्यास का करत नाहीस?’ हे तिचे पालुपद होते. तिचे हात दुखले आणि लाल झाले की मग वर्तमानपत्रांचे भेंडोळे शस्त्र म्हणून वापरायची. पुढे शाळेत एक थोडे स्थूल पण चिरक्या आवाजाचे शिक्षक लेझीम शिकवत होते मला काय आवदसा आठवली कोणास ठाऊक. मी त्याची हुबेहुब नक्कल केली आणि त्यांना राग आवरेना तेव्हा माझ्या हातातली लेझीम घेऊन त्यांनी लेझीमनेच माझ्या कुल्ल्यांवर सपासप रपाटे हाणले. सगळा वर्ग आवाक झाला. वर्ग संपल्यावर त्यांनी मला पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलच्या समोर जेजूरीकर डॉक्टरांचा दवाखाना होता तिथे नेले आणि मला खरचटले होते तिथे डॉक्टरांच्या मदतीने टिंक्चर बेन्झाईन नावाचे झोंबणारे औषधही लावले. मी माझ्या त्या ठोंबरे मास्तरांना म्हटले ‘माझे चुकले’. तेव्हा त्यांनी मला जवळ घेतले. पुढे शाळेत जळती लेझीम खेळण्याचे ठरले त्यात लेझीमला जळते पलिते लावतात. मुलं टरकली, पालक काकू करू लागले तेव्हा त्याच ठोंबरे मास्तरांनी थत्तेला बोलवा तो करून दाखवेल अशी हमी घेतली. आणि खेळ यशस्वी झाला. माझी आई आणि ठोंबरे मास्तर काय हिंसा करत होते का? हल्ली असे मारले तर वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी छापून येईल. त्या काळात जे झाले ते दोन्ही योग्यच होते. अहिंसा हा शब्दच मुळी कृत्रिम आहे. गर्व लोभ, स्वार्थ हेच शब्द नैसर्गिक. त्यातून पुढे निगर्वी, र्निलोभी, निस्वार्थी असे शब्द तयार होतात. त्याला मानव जातीचे सुसंस्कृतिकरण म्हणतात. योग्य अयोग्याबद्दल उद्या परवा, अहिंसेची बिकट वाट पुढे चालू ठेऊ या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – फुप्फुसाचा कॅन्सर : भाग-४
दर क्षणाला आपल्याला पुरेसा प्राणवायू बाहेरून मिळतो; तो घेऊन फुप्फुसात वापरून दूषित वायू बाहेर टाकण्याचे उत्तम योगदान आपले फुप्फुस न कंटाळता करत असते. फुप्फुसाच्या रचनेत द्राक्षासारखे घोस, ब्रॉन्किया नावाने ओळखले जातात. आपल्या नकळत दर क्षणाला प्राणवायूचे संचरण, बाहेरच्या जगतातून फुप्फुसात होते. ते घोस मोकळेपणाने प्राणवायूला खेळू देतात. त्यामुळे शुद्ध रक्ताचे अभिसरण चांगले होते. फुप्फुसात फाजील कफ होत नाही. काही कारणाने ब्रॉन्कियामध्ये प्राणवायूच्या संचरणाला; द्राक्षासारख्या घोसात कफ साठल्यामुळे अडथळा येतो. मग सर्दी, पडसे, कफ, खोकला, दमा, ब्रॉन्कायटिस, राजयक्ष्मा, प्लुरसी, न्यूमोनिया अशा विकारांना रुग्ण कंटाळतात. या विविध रोगलक्षणांचे रूपांतर क्वचितच फुप्फुसाच्या कॅन्सर विकारात होते. प्राणवह स्रोतसाच्या वरील लक्षणातल्या दहा हजार रुग्णांपैकी एखाद्यालाच फुप्फुसाच्या कॅन्सरची बाधा झालेली आढळते. अशा रुग्णांना थुंकीतून रक्त पडणे, आवाज पूर्णपणे बसणे, वजन घटणे, कोणतेही चालण्या-बोलण्याचे श्रम केले तरी धाप लागणे, अशा एकादशरूप राजयक्ष्म्याची बाधा झालेली दिसते. क्ष-किरण, एमआरआय अशा रिपोर्ट्समध्ये रुग्णाला वॉर्निग दिलेलीच असते. इथे कॅन्सर या शब्दाने अजिबात न घाबरता रुग्णाने ज्या कारणांनी हा फुप्फुस कॅन्सर झाला आहे, ती कारणे पूर्णपणे टाळावीत. ‘रिव्हर्स प्रोसेस’ सुरू करावी. धूम्रपान, मशेरी, तंबाखू, तपकीर शंभर टक्के बंद करावी. सायंकाळी लवकर, कमी, सूर्यास्तापूर्वी जेवावे, दीर्घश्वसन, प्राणायाम करावा. मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्या. पुदिना, आले-लसूण, ओली हळद, तुळशी पाने, मिरेपूड अशी चटणी तारतम्याने घ्यावी. लक्ष्मीनारायण, दमागोळी, ज्वरांकुश, लवंगादी गुग्गुळ, अभ्रक मिश्रण, रजन्यादिवटी सकाळ-सायंकाळ; जेवणानंतर नागरादिकषाय; चघळण्याकरिता एलादिवटी; मुखशुद्धीकरिता खोकलाचूर्ण अशी औषधयोजना फुप्फुसाच्या कर्करोगावर निश्चितपणे मात करते!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २४ सप्टेंबर
१८८७ – मराठी ख्रिस्ती साहित्य सेवा मंडळाचे संस्थापक लेखक, कवी भास्कर कृष्ण उजगरे यांचा जन्म. त्यांच्या प्रयत्नानेच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनास सुरुवात. ‘मराठी-ख्रिस्ती वाङ्मयाचा इतिहास’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.
१९२२ – कथा-कादंबरीकार आणि सोबत साप्ताहिकाचे संपादक गणपत वासुदेव बेहरे यांचा जन्म. ‘ओली आठवण, कामदेवाच्या कथा’ हे कथासंग्रह, तर ‘अखेरचा प्रयोग’ हे नाटक, ‘मोरपिसारा’ हे काव्य आणि ‘वाकडी वळणे, दिशाहीन, कापुरुष, झुंज’ मिळून २० कादंबऱ्या प्रसिद्ध. शृंगार आणि विवाहबाह्य़ संबंध हा त्यांच्या कादंबऱ्याचा विषय असे. ‘आनंदयात्रा’ हे आत्मचरित्र लिहिले.
१९३० – आहारविषयक ग्रंथाचे लेखक गंगाधर बाळकृष्ण परांजपे यांचे निधन. ‘आहारमीमांसा’तून आहारशास्त्राचे सविस्तर विवेचन तसेच ‘रोग्याची शुश्रूषा, आरोग्यशास्त्र’ असे ग्रंथ त्यांनी लिहिले.
२००२ – शब्दकोश रचनाकार, अनुवादक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचे निधन. ‘मराठी -हिंदुस्थानी शब्दकोश, हिंदी मराठी’, ‘अभिनव शब्दकोश’, ‘मराठी शब्दकोश’ मिळून १० शब्दकोश त्यांनी तयार केले. तसेच विविध भाषांतील पुस्तके त्यांनी मराठीत अनुवादित केली. २००च्या वर पुस्तके त्यांची प्रकाशित.
– संजय वझरेकर