यास्मिन शेख
प्रकाश दिलीपला म्हणाला, ‘इतके दिवस मी तुला माझा मित्र समजत होतो. आता तू ज्या तऱ्हेने वागतोस, त्यामुळे मी आजन्मात तुझ्याशी संबंध ठेवणार नाही.’ या दोन वाक्यांतील दुसऱ्या वाक्यात एक मोठी चूक आहे- ती म्हणजे ‘आजन्मात’ या शब्दाचा चुकीच्या अर्थाने केलेला वापर. ‘आजन्म’ हे क्रियाविशेषण आहे. या शब्दाचा अर्थ आहे- जन्मापासून, जन्मापर्यंत. या सदोष वाक्यरचनेमुळे नेमका अर्थ व्यक्त होत नाही. आधी मैत्री, पण नंतर संबंध-तोडणे यासाठी ‘आजन्म’ या शब्दाची योजना निर्थक आहे. त्याऐवजी ‘मी यापुढे तुझ्याशी संबंध ठेवणार नाही’ किंवा ‘या जन्मात तुझ्याशी संबंध ठेवणार नाही.’ किंवा ‘मरेपर्यंत तुझ्याशी संबंध ठेवणार नाही.’ अशी वाक्यरचना अर्थपूर्ण होईल.
मराठीत आपण आमरण उपोषण हा शब्द योग्य अर्थानेच वापरतो. ‘महात्मा गांधीजींनी आमरण उपोषण करण्याची प्रतिज्ञा केली.’ ‘आमरण’ या शब्दाचा अर्थ ‘मृत्यू येईपर्यंत’ असा आहे.
०
आणखी एक गमतीदार वाक्यरचना पाहा- पु.ल.देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) यांचा उल्लेख करताना- विशेषत: लेखनात- अनेक नियतकालिकांत असे लिहिलेले आढळते. ‘पु.ल.देशपांडे माझे आवडते लेखक आहेत’. ‘पु.लं. सर्व महाराष्ट्राचेच अत्यंत लोकप्रिय विनोदी साहित्यिक आहेत’. यापैकी दुसऱ्या वाक्यात ल वर अनुस्वार देणे चुकीचे आहे.
‘पु.लं. म्हणाले की..’आणि
‘पु.लं.नी असे म्हटले आहे की..’ या वाक्यांपैकी ‘पु.लं. नी’ हे योग्य आहे. पण ‘पु.लं. म्हणाले’ हे अत्यंत चुकीचे लेखन आहे. जेव्हा आपण व्यक्तीचा उल्लेख करताना वि.स. खांडेकर ऐवजी वि.स. असा करतो, तेव्हा ‘वि.स. महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक आहेत.’ हे वाक्य बरोबर आहे. पण वि.सं. लोकप्रिय लेखक आहेत, या वाक्यात ‘स’ वर अनुस्वार देणे बरोबर नाही. पु. लं.नी, पु. लं.ना, पु. लं.चा, पु.लं.बरोबर इ. रूपे (म्हणजे ल वर अनुस्वार देणे) योग्य आहेत, पण विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय न लावता (पु. लं.म्हणाले..) ‘लं’ असे लिहिणे अयोग्य आहे. उच्चार करून पाहिल्यास वाचकांच्या सहज लक्षात येईल.