पृथ्वीच्या उबदार आणि समशीतोष्ण कटिबंधातील भागात ५०० ते १३०० मिलिमीटर पाऊस पडतो. ६ ते ८ महिन्यांत पडणाऱ्या पावसामुळे सच्छिद्र जमिनीवर गवताळ प्रदेश तयार होतात. पृथ्वीच्या सुमारे २५ टक्के जमिनीवर असणाऱ्या गवताळ प्रदेशाचे हवामानाप्रमाणे दोन प्रकार आहेत – उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील. उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशात १ ते २ मीटर उंचीचे गवत आणि तेवढय़ाच उंचीची झुडपे असतात. सोबत, खुरटी झाडेही विखुरलेली असल्यास त्याला सव्हाना म्हणतात. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि भारताच्या काही भागांत गवताळ भाग असून त्यात खूर असणाऱ्या चतुष्पादांच्या प्रजाती – काळवीट, रानरेडे, झेब्रा, हरणे, सांबर हे तृणभक्ष्यी आणि त्यांना खाऊन जगणारे वाघ-सिंह, लांडगे, तरस असे मांसभक्ष्यी प्राणी – मोठय़ा संख्येने असतात. केनिया, टांझानिया येथील सव्हाना यासाठी प्रसिद्ध आहेत.
पर्जन्यवने आणि वैराण प्रदेश यांच्यादरम्यान गवताळ प्रदेश समजले जातात. जास्त पाऊस आणि जमिनीत पाणी टिकले तर तेथे वने निर्माण होतील असे समजतात. भारतासारख्या मोसमी पावसाच्या हवामानात नसíगक गवताळ प्रदेश क्वचितच. कच्छमधील गवताळ भागात रानटी गाढव, गीरमध्ये सिंह, राजस्थानात रणथंबोरमध्ये अनेक वन्यजीव आढळतात. सौराष्ट्र-काठेवाडमधील शेर (युफोर्बयिा) आणि साल्व्हाडोरा झुडपांच्या २-३ मीटर उंच आणि ७-८ मीटर परिघाच्या जाळीत चिंकारा राहतात. हे सर्व भाग संरक्षित क्षेत्रे आहेत.
भारतात पाळलेल्या गुरांना खाद्य म्हणून खेडय़ांच्या परिसरात चराऊ कुरणे, गायराने राखण्याची पद्धत आहे. त्यात गुरांना खाण्यायोग्य गवताच्या प्रजाती लावल्या जातात. अशा अर्ध-नसíगक कुरणात चरणे जास्त प्रमाणात झाले तर गवताचे प्रमाण कमी होऊन उघडय़ा पडलेल्या जमिनीची धूप होते; ताग, शरपंखीसारखे तण फोफावतात, कुरणाचा ऱ्हास होतो.
पूर्व आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात मानव-प्राण्याचा जन्म झाला असे मानले जाते. महत्त्वाची अन्नधान्ये या गवताच्या जाती आहेत. धान्यांच्या मूळ जाती आफ्रिका-आशिया-युरोप येथल्या चंद्राकृती सुपीक गवताळ प्रदेशात निर्माण झाल्या असे मानतात. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य मिळावे यासाठी मूळ धान्यजातींचे रक्षण करून, त्यापासून जनुकीय अभियांत्रिकीच्या साहाय्याने शाश्वत अन्ननिर्मितीचे प्रयत्न युनेस्कोतर्फे केले जात आहेत. यासाठी मूळ गवताळ प्रदेशांचे संरक्षण व जपणूक महत्त्वाची ठरली आहे.
– प्रा. शरद चाफेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
अलेक्झांड्रियाचा यूक्लिड
भूमितीशास्त्राचा जनक, अशी ओळख असलेला उलदिस ऊर्फ यूक्लिड हा ‘यूक्लिड ऑफ अलेक्झांड्रिया’ या नावानेही ओळखला जातो. इ.स.पूर्व काळातील ग्रीक विद्वानांपकी विख्यात गणितज्ञ यूक्लिडचा जन्म इ.स.पूर्व ३३० ला झाला. यूक्लिडचे शिक्षण झाल्यावर त्याने भूमिती या विषयाच्या संशोधनाला स्वत:ला वाहून घेतले. त्या काळात अलेक्झांड्रिया, ग्रीक टोलेमींच्या राज्य क्षेत्रातले महत्त्वाचे शहर होते. यूक्लिडने भूमितीतले अनेक सिद्धांत मांडले, त्यावरील ग्रंथ लिहिले आणि अलेक्झांड्रियात त्याने गणिताची शाळाही चालवून पुढच्या काळात अनेक नामांकित गणिती तयार केले. यूक्लिडने पायथॅगोरस, प्लेटो वगरेंच्या संशोधनातील त्रुटी दुरुस्त करून, त्यात स्वत:चे संशोधन मिळवून ‘एलिमेंट्स ऑफ जॉमेट्री’ हा भूमितीवरील जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला व १३ खंडांमध्ये प्रसिद्ध केला. या जगप्रसिद्ध ग्रंथाच्या पहिल्या चार खंडांत रेषा, कोन आणि एकाच पातळीत असणाऱ्या विविध रेषाकृतींचे गुणधर्म कथन केले आहेत. पाचव्या खंडात गुणोत्तर आणि प्रमाण यांचे काही गुणधर्म सांगून त्यांचा उपयोग सहाव्या खंडात सांगितला आहे. चार खंडांमध्ये अंक सिद्धान्ताचे विवरण केले आहे आणि शेवटच्या तीन खंडांमध्ये नियमित घनाकृतींचा ऊहापोह केला आहे. त्यांमध्ये क्यूब, टेट्रहैड्रान आणि ऑक्टॅहैड्रानसारख्या पाच नियमित घनाकृतींविषयी विशेष माहिती दिली. याच ग्रंथात यूक्लिडने अविभाज्य अंक अमर्याद असतात हेही सिद्ध केले आहे. यूक्लिडने लिहिलेल्या ग्रंथांपकी ९४ प्रमेये असलेला ‘डाटा’, कोणत्याही आकृतीचे समभाग करण्याच्या पद्धती असलेले ‘डिव्हिजन’, ग्रहताऱ्यांची भूमितीविषयक माहिती ‘फेनॉमिना’ या ग्रंथांमध्ये आहे. त्याने संशोधन करून प्रस्थापित केलेल्या भूमितीच्या सिद्धांतांना ग्रीकमध्ये ‘यूक्लिडीय ज्यामिती’ असे संबोधले जाते. आजपर्यंत जगातील अन्य गणितज्ञांनी भूमितीशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली, परंतु यूक्लिडचे या विषयावरचे ग्रंथ अजूनही सर्वोत्तम समजले जातात. अगदी विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ‘एलिमेन्ट्स ऑफ जॉमेट्री’ हा त्याचा ग्रंथ भूमितीशास्त्राचे क्रमिक पुस्तक म्हणून अभ्यासले गेले!
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com