ग्राइप वॉटरच्या जाहिरातींमधील गोंडस व गुबगुबीत बालके पाहून बऱ्याच लोकांना असे वाटते की, ग्राइप वॉटरमुळे या सुधारणा होतात. बाळाच्या पोटात जमलेली हवा ढेकराच्या माग्रे वा गुदद्वारामाग्रे बाहेर काढण्याचे काम ग्राइप वॉटरने होऊ शकते.
ग्राइप वॉटरविषयी शास्त्रोक्त माहिती घेऊ या. सर्वप्रथम एका इंग्रजी औषध निर्मात्याने इंग्लंडमध्ये १८५१ साली ग्राइप वॉटरचा शोध लावला. १८४० साली पूर्व इंग्लंडमध्ये लहान मुलांमध्ये ‘फेन फिव्हर’ची लागण होत होती. त्याच वेळी तेथे हिवतापाचीही साथ होती. या दोन्ही रोगांवरील उपचारांतून प्रेरणा घेऊन वुडवर्डने ग्राइप वॉटरची निर्मिती केली. फेन फिव्हरसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाने बालकांमधील पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होतात असे त्याचे निरीक्षण होते. वुडवर्डच्या मूळ ग्राइप वॉटरमध्ये ३.६ टक्के अल्कोहोल, बडीशेपचे तेल, सोडिअम बायकाबरेनेट, साखर तसेच पाणी हे घटक होते. १८७६ मध्ये वुडवर्डने ग्राइप वॉटर या ट्रेडमार्कची नोंदणी केली.
पोटदुखी, दात येतानाची वेदना, पोट बिघडणे, गरळी येणे तसेच पचनसंस्थेच्या इतर तक्रारींसाठी लहान बालकांमध्ये ग्राइप वॉटर दिले जाते. प्रत्येक देशानुसार यातील घटक बदलताना दिसले तरी त्यातील सोडिअम बायकाबरेनेट, बडीशेप/ बाळंतशेप यांचे तेल हे घटक मात्र सर्वत्र आढळून येतात. मोठी माणसेही पोटाच्या तक्रारींसाठी ग्राइप वॉटर घेतात. परंतु विविध रोगांवर ‘ग्राइप वॉटर’ हा परिणामकारक उपचार आहे, असे चिकित्सालयीन संशोधनाद्वारे सिद्ध झालेले नाही. याच कारणासाठी अमेरिकेमध्ये १९९३ मध्ये ग्राइप वॉटरवर बंदी घालण्यात आली. आता अमेरिकेत ग्राइप वॉटर एक औषध म्हणून नव्हे तर पूरक आहार घटक या स्वरूपात विकले जाते. जर्नल ऑफ रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनमध्ये २००० साली प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार वुडवर्डच्या ग्राइप वॉटरमुळे लहान बाळांच्या पोटदुखीवर होणारे परिणाम हे बाळाला कोणताही द्रवपदार्थ दिला तरी तसेच आढळून येतात.
थोडक्यात सांगायचे तर दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन थोपटल्यास त्याच्या पोटातील हवा बाहेर पडते. असे ढेकर येऊन गेल्याने पोटातील हवेच्या दाबामुळे होणारी पोटदुखी होत नाही. त्यासाठी इतर कोणत्याही बाह्य उपचारांची गरज नाही.
डॉ. जगन्नाथ दीक्षित (औरंगाबाद) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – शुक्रिया गुलछडी
फुलांना ठाऊक आहे की नाही, माहिती नाही; पण त्यांना स्वभाव असतो, त्यांचा स्वतंत्र मूड असतो. सगळीच फुलं सुंदर असतात. आपल्या मन:स्थितीप्रमाणे आपण त्यांच्या रंगरूपाला वेगवेगळं नाव देतो; आणि गंमत म्हणजे त्या फुलांकडे बघून आपले मूड नि मन:स्थिती बदलत असते, हे आपल्या लक्षात येत नाही.
याबाबतीत काही फुलांना समाजमानसात आणि साहित्यात फार विशेष स्थान मिळालंय. गुलाब हा सदैव टवटवीत, त्याचा गुच्छ बनवला तर श्रीमंत सौंदर्य, एकटा गुलाब कळा छोटय़ा फुलदाणीत ठेवला तरी खानदानी दिसतो. कमलपुष्पाचा राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त रुबाब. कमळाच्या उत्फुल्लतेबद्दल काय बोलावं?
मोगरीची फुलं मात्र बहुढंगी. साधा आकार, शुभ्र काहीतरी मनाजोगे! मोगरीच्या फुलांची गम्मत अशी आहे की ती जिथं असतात, तिथे आपलं रूप आणि रूपक बदलतात.
म्हणजे मोगरीचा गजरा मनगटावर गुंफला तर पुरुषी रुंद मनगटावर रसिकतेची छाप पाडतो. तीच फुलं गजरा म्हणून सैलसर आंबाडय़ावर माळली की त्या केशसंभाराला मुग्ध प्रणयाचा साज ठरतात; आणि तीच मोगरीचं फुलं शेजघरातल्या उशीवर कोमेजलेली दिसली की रात्रीच्या शृंगाराच्या उरलेल्या खुणा ठरतात. त्या फुलांचा मोठा हार केला की प्रखर दिव्यांच्या प्रकाशात उजळलेला नाटकाचा पडदा डोळ्यांसमोर येतो.
पण ‘मोगरा फुलला’ असं लतादीदीनं म्हटलं की सात्त्विक आत्मिक तेजाचं प्रतीक ठरतात..
तुम्ही मात्र अशा विविधतेला मुकलात. म्हणजे फुलांवर फिदा होणाऱ्या कवींनी तुम्हाला दुर्लक्षित ठेवलं. हां, आता रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूंही जीवन में.. असं म्हणून बासू चॅटर्जीनी चित्रपटात कौतुक केलं. अनुराधा पौडवालांनी.. रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली.. असा स्वरसाज चढवून मनाला हळवं केलं. पण साधारणत: तुमची आम्ही आबाळ केली, असंच वाटतं.
रजनीगंधा, निशिगंध अशी संस्कृतप्रचुर नावं परिचित असली तरी आजही फुलबाजारात तुम्हाला ‘गुलछडी’ म्हणतात आणि ते नाव तुम्हाला शोभून दिसतं.
छडीसारख्या शिडशिडीत बांध्याच्या, नव्हे अंगकाठीसारख्या गुलछडीला ‘टय़ूबरोझा’ म्हणतात. पण ते फार गद्य वाटतं. कारण केवळ निमुळत्या देठाचं फूल झालं की पाकळ्या एकदम खुलतात आणि म्हणे ही ‘टय़ूब’ आहे!
गुलछडीच्या छडीची उंची जेमतेम अडीच-तीन फूट. पानं गवतासारखी. छडीचा देठ हिरवा आणि वर फुलांचा गुच्छासारखा फुलोरा. फुलं फुलतात तशी वेगवेगळी होतात आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात. एखादी छडी घेतली तरी चार-पाच फुलं आणि वर हळूहळू फुलणाऱ्या कळ्यांचा बोनस मिळतो. फुलांचा स्वभाव ऋजू. सुगंध किंचित दाट आणि गर्द, फक्त सांजवेळी. मित्रा, गुलछडीच्या फुलांचा गुच्छ घरी आणून ठेवलास आणि संध्याकाळी घरी आलास की ती फुलं उमलून म्हणतात, हा घे आमचा परिमल, विसावा घे, शांत हो, आम्ही संध्याकाळी दरवळतो, फक्त तुझ्यासाठी. खरंच. तुम्हाला शुक्रिया म्हणायचं राहून गेलं..
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – हिंदूंचे धार्मिक तत्त्वज्ञान सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या विरोधी
‘‘.. अधर्मी, निधर्मी, धर्मातीत या शब्दांनी तर ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दातील मूळ कल्पना स्पष्ट होतच नाही, पण इहलोकवादी किंवा इहलौकिक या शब्दांनीही नीटसा अर्थबोध न होता थोडासा गोंधळ माजण्याचा संभव आहे. विशेषत:, ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दालाही दीर्घ इतिहास असल्यामुळे व त्याही कल्पनेचा इतिहासक्रमात विकास होत आल्यामुळे तो शब्द तसाच ठेवणे इष्ट वाटते. अधर्मी, निधर्मी यांसारख्या शब्दप्रयोगांनी राज्यसंस्था स्वत:चा अधिकृत असा कोणताही धर्म मानणार नाही, इतकाच बोध होतो. राज्यसंस्थेने कोणताही धर्म जरी स्वतचा मानला नाही, तरी समाजजीवनात धर्माचे स्थान राहणारच. हा धर्म व्यक्तीच्या मनावर आपले प्रभुत्व गाजवीतच राहणार. राज्यसंस्था या धर्मप्रभावाकडे दुर्लक्ष करणार की काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि इहलोकवादी राज्यसंस्था असे म्हणतानाच सरकार परलोकावर श्रद्धा ठेवण्यास मनाई करणार की काय, असेही वाटू लागते. इतर सर्व तपशिलात न जाता सेक्युलॅरिझमची माझ्या समोरची मुख्य कल्पना ‘‘धर्म ही फक्त पारलौकिक प्रश्नांचा विचार करणारी संस्था आहे,’’ या एका मुद्दय़ातून निष्पन्न होणारी आहे.’’ नरहर कुरुंदकर ‘जागर’ (१९६९) या पुस्तकातील ‘सेक्युलॅरिझम आणि इस्लाम’ या लेखात लिहितात – ‘‘भारतीय सेक्युलॅरिझमचा खरा प्रश्न भारतीय संविधानाच्या चौकटीत मुस्लिम जमात कशी पचवावी, हा नाही. ८५ टक्के असणारा हिंदू समाज मनाने सेक्युलर कसा करावा, हा खरा प्रश्न आहे. हिंदू समाजाची लोकविलक्षण सनातनी मनोवृत्ती हाच भारतातील सेक्युलॅरिझमला सर्वात महत्त्वाचा अडथळा आहे, ही गोष्ट समजून घेतल्याशिवाय या प्रश्नाचे अंतरंग नीटसे उलगडणे कठीण आहे.. सामान्यत्वे हिंदू समाज विचारस्वातंत्र्य असणारा, परमतसहिष्णू आणि उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. ही सगळीच विशेषणे तकलादू आणि वरवरची आहेत. हे सत्य समजून घेण्याची आपण मनाने तयारी केली पाहिजे. हिंदूंचे धार्मिक तत्त्वज्ञान पुनर्जन्मावर श्रद्धा ठेवणारे, म्हणून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या विरोधी आहे.. ’’