ग्राइप वॉटरच्या जाहिरातींमधील गोंडस व गुबगुबीत बालके पाहून बऱ्याच लोकांना असे वाटते की, ग्राइप वॉटरमुळे या सुधारणा होतात. बाळाच्या पोटात जमलेली हवा ढेकराच्या माग्रे वा गुदद्वारामाग्रे बाहेर काढण्याचे काम ग्राइप वॉटरने होऊ शकते.
ग्राइप वॉटरविषयी शास्त्रोक्त माहिती घेऊ या. सर्वप्रथम एका इंग्रजी औषध निर्मात्याने इंग्लंडमध्ये १८५१ साली ग्राइप वॉटरचा शोध लावला. १८४० साली पूर्व इंग्लंडमध्ये लहान मुलांमध्ये ‘फेन फिव्हर’ची लागण होत होती. त्याच वेळी तेथे हिवतापाचीही साथ होती. या दोन्ही रोगांवरील उपचारांतून प्रेरणा घेऊन वुडवर्डने ग्राइप वॉटरची निर्मिती केली. फेन फिव्हरसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाने बालकांमधील पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होतात असे त्याचे निरीक्षण होते. वुडवर्डच्या मूळ ग्राइप वॉटरमध्ये ३.६ टक्के अल्कोहोल, बडीशेपचे तेल, सोडिअम बायकाबरेनेट, साखर तसेच पाणी हे घटक होते. १८७६ मध्ये वुडवर्डने ग्राइप वॉटर या ट्रेडमार्कची नोंदणी केली.
पोटदुखी, दात येतानाची वेदना, पोट बिघडणे, गरळी येणे तसेच पचनसंस्थेच्या इतर तक्रारींसाठी लहान बालकांमध्ये ग्राइप वॉटर दिले जाते. प्रत्येक देशानुसार यातील घटक बदलताना दिसले तरी त्यातील सोडिअम बायकाबरेनेट, बडीशेप/ बाळंतशेप यांचे तेल हे घटक मात्र सर्वत्र आढळून येतात. मोठी माणसेही पोटाच्या तक्रारींसाठी ग्राइप वॉटर घेतात. परंतु विविध रोगांवर ‘ग्राइप वॉटर’ हा परिणामकारक उपचार आहे, असे चिकित्सालयीन संशोधनाद्वारे सिद्ध झालेले नाही. याच कारणासाठी अमेरिकेमध्ये १९९३ मध्ये ग्राइप वॉटरवर बंदी घालण्यात आली. आता अमेरिकेत ग्राइप वॉटर एक औषध म्हणून नव्हे तर पूरक आहार घटक या स्वरूपात विकले जाते. जर्नल ऑफ रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनमध्ये २००० साली प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार वुडवर्डच्या ग्राइप वॉटरमुळे लहान बाळांच्या पोटदुखीवर होणारे परिणाम हे बाळाला कोणताही द्रवपदार्थ दिला तरी तसेच आढळून येतात.
थोडक्यात सांगायचे तर दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन थोपटल्यास त्याच्या पोटातील हवा बाहेर पडते. असे ढेकर येऊन गेल्याने पोटातील हवेच्या दाबामुळे होणारी पोटदुखी होत नाही. त्यासाठी इतर कोणत्याही बाह्य उपचारांची गरज नाही.
डॉ. जगन्नाथ दीक्षित (औरंगाबाद) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा