भूजलाची उपलब्धता अनेक घटकांवर अवलंबून असते. पर्यावरण हा त्यापैकी एक मुख्य घटक आहे. भूपृष्ठावरून होणारा पाण्याचा व्यय म्हणजेच बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन (इव्हॅपोट्रॅन्स्पिरेशन). भूपृष्ठावरील पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे वाफेच्या स्वरूपात वातावरणात मिसळते. या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. पण पाण्याचा व्यय केवळ बाष्पीभवनाद्वारेच होत नाही. तर वनस्पतींच्या पर्णरंध्रातूनसुद्धा बाष्पाच्या स्वरूपात पाणी वातावरणात जात असते, या क्रियेला बाष्पोत्सर्जन म्हणतात. बाष्पीभवनाची क्रिया आणि तिचा वेग यांचा स्थानिक हवामानावर आणि जलचक्रावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे कृषी, सिंचन व जलव्यवस्थापनात बाष्पीभवनाची भूमिका महत्त्वाची असते. बाष्पीभवनाचा आणि बाष्पोत्सर्जनाचा वेग वातावरणीय घटक नियंत्रित करतात. तापमान व वाऱ्याचा वेग जास्त असेल तर या दोन्ही क्रियांचा वेग वाढतो. सापेक्ष आर्द्रता वाढल्यास हा वेग कमी होतो. तर जमिनीतील ओलावा कमी झाल्यास बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन या दोहोंचा वेग कमी होतो. कारण या दोन्ही क्रियांसाठी ओलाव्याच्या अभावामुळे पाणी उपलब्ध होत नाही. उन्हाळ्यात हा वेग सर्वाधिक असतो.

या घटकांशिवाय वनस्पतीचा प्रकार हा बाष्पोत्सर्जनाचा वेग नियंत्रित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. वाळवंटी आणि कमी पावसाच्या प्रदेशात वाढणारी कोरफड, कॅक्टस यांसारख्या वनस्पतींची पाने उपलब्ध पाण्याचा बाष्पोत्सर्जनाद्वारे व्यय होऊ नये म्हणून मांसल झालेली दिसून येतात. त्यामुळे त्यांची जलधारण क्षमता वाढते. तर जास्त पावसाच्या प्रदेशातील झाडांची पाने पातळ असतात.

बाष्पीभवनाच्या विरुद्ध प्रक्रिया म्हणजे अंत:सरण (इन्फिल्ट्रेशन). या प्रक्रियेत जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी हळूहळू जमिनीत मुरते व कालांतराने भूजलाचा भाग बनते. गुरुत्वाकर्षण व केशकीय बल हे घटक ही प्रक्रिया नियंत्रित करतात. विशिष्ट प्रकारच्या मातीची सिंचनाद्वारे आणि पावसाद्वारे मिळणारे पाणी शोषून घेण्याची क्षमता व वेग म्हणजेच अंत:सरण होय. हा अंत:सरणाचा वेग ‘प्रति तास मिलिमीटर’ मध्ये मोजला जातो. जेव्हा पाणी शोषून घेऊन माती संपृक्त होते तेव्हा अंत:सरणाचा वेग मंदावतो व पृष्ठवाह म्हणजेच जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी वहू लागते (रन ऑफ). जलस्राोत व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनात तसेच दुष्काळ नियंत्रणासाठी अंत:सरण व त्याचा वेग हे घटक अतिशय महत्त्वाचे असतात. भूजलाचे पुनर्भरण व उपलब्ध साठ्याचे व्यवस्थापन हे अंत:सरणावर अवलंबून असते. जमिनीचा उतार, वाऱ्याचा वेग, तापमान, मातीचा प्रकार, आर्द्रता, पावसाचा वेग व जमिनीवरील झाडांचे आच्छादन हे घटक अंत:सरणाच्या वेगावर निर्णायक परिणाम करतात.

– डॉ. योगिता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader