– डॉ. शिल्पा शरद पाटील
लोकसंख्येत होणारी अफाट वाढ आणि त्याच वेळी वेगाने घटणारे गोड्या पाण्याचे स्राोत या परिस्थितीमुळे लोक आता भूजलाकडे वळले आहेत. भूजलाचा वापर करताना नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येत आहे आणि उपसा मात्र प्रचंड वाढत आहे. त्यातून पाण्याच्या समस्येत भरच पडत आहे. यातून वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे जलसंसाधनांचे संवर्धन करण्याचे आव्हान समाजासमोर उभे ठाकले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागातल्या सात ध्येयवादी प्राध्यापकांनी ते स्वीकारले आणि १९९८ मध्ये अॅक्वाडॅम या गैरशासकीय संस्थेची पुण्यात स्थापना केली.
‘अॅक्वाडॅम’चे पूर्ण नाव आहे ‘अॅडव्हान्स्ड सेंटर ऑफ वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट’; ‘जलसंसाधने विकास आणि व्यवस्थापनविषयक प्रगत केंद्र’. जलसंसाधनांसंदर्भात मूलभूत आणि प्रगत संशोधन करणे हे या संस्थेचे पहिले उद्दिष्ट आहे; तर लोकसहभागातून जलस्राोतांचे पुनर्भरण, विकास आणि व्यवस्थापन करणे हे दुसरे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने अॅक्वाडॅमने गेली २५ वर्षे ठिकठिकाणच्या ग्रामस्थांना जलस्राोतांचे पुनर्भरण, विकास आणि व्यवस्थापन यांच्याविषयी शिक्षण दिले आहे.
संस्था नेपाळसह हिमालयाच्या क्षेत्रात झऱ्यातून मिळणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते. भारतासह नेपाळ, भूतान, पश्चिम आफ्रिकेतले काही देशांतील पाण्याविषयीच्या विविध प्रकल्पांमध्ये संस्थेने मोठे योगदान दिले आहे. नजीकच्या भविष्यकाळासाठी कार्यविस्ताराचे जे नियोजन आहे त्यात शहरी भागांच्या जलसंसाधनाच्या व्यवस्थापनावरही लक्ष केंद्रित करायचे अॅक्वाडॅमने ठरवले आहे.
शहरी भागात पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या बाबतीत परिपूर्ण अभ्यास करावा आणि काही उपाययोजना सुचवता येतील का ते पाहावे, असा संस्थेचा मानस आहे.
गोड्या पाण्याच्या पुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर अॅक्वाडॅमने सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामांमुळे संस्थेला अनेक देशीविदेशी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०२३मध्ये केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने अॅक्वाडॅमला अधिकृत वैज्ञानिक संस्था म्हणून मान्यता दिली आहे. तर अॅक्वाडॅमला २०२४ चा आंतरराष्ट्रीय जलपुरस्कारही जाहीर झाला आहे. अॅक्वाडॅमसारख्या काही संस्थांनी आपल्या कामातून असे दाखवून दिले आहे की, जर स्थानिक लोकांचा सहभाग असेल, तर संपूर्ण जगाला भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्याच्या कामात यश मिळते. उद्याच्या पिढीसाठी हा कित्ता ठिकठिकाणी गिरवला मात्र गेला पाहिजे.
– डॉ. शिल्पा शरद पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org