भूजलाचा अनिर्बंध उपसा हा एक जटिल प्रश्न होऊन बसलेला असतानाच भूजलाची खालावणारी गुणवत्ता हीदेखील एक गंभीर समस्या ठरत आहे. मानवी हस्तक्षेप हे यामागचे प्रमुख कारण आहे. भूजलाची गुणवत्ता अनेक घटकांवर अवलंबून असते; उदाहरणार्थ पाण्याचा सामू (पीएच), विद्याुत वाहकता, पाण्यात विरघळलेल्या एकूण घन पदार्थांचे प्रमाण (टोटल डिजॉल्व्ड सॉलिड्स), त्याचप्रमाणे पाण्यातील आयनांचे प्रमाण, जैविक घटक – म्हणजेच जिवाणू, विषाणू, अमीबा यांसारखे परजीवींचे व शेवाळाचे प्रमाण, असे सर्व घटक भूजलाची गुणवत्ता निर्धारित करतात. या घटकांचे व आयनांचे प्रमाण निर्धारित मानकांनुसार असल्यास ते भूजल पिण्यासाठी योग्य समजले जाते. वरील घटकांचे भूजलातील वाढलेले प्रमाण भूजलाची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत ठरते. पिण्याच्या वापरासाठी व शेतीच्या वापरासाठी पाण्यात असणाऱ्या वरील घटकांचे प्रमाण व त्यांची मानके ही वेगवेगळी असतात.

प्रक्रिया न करता नदी व ओढ्यांमध्ये सोडलेले सांडपाणी संपूर्ण जलस्राोत दूषित करतेच; त्याचबरोबर त्याचा काही भाग जमिनीत झिरपून भूजल दूषित करण्याचे कारण ठरतो. पीक उत्पादन वाढावे म्हणून रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर केला जातो. त्यांचे अंश पाण्यात मिसळून भूजलापर्यंत पोहोचतात व भूजल प्रदूषित करतात. कचरा डेपो, गटारे, खाणींच्या ठिकाणी तयार होणारी घातक व विषारी संयुगे ही जेव्हा पाण्याबरोबर जमिनीखाली झिरपून भूजलात प्रवेश करतात, तेव्हा ते भूजल प्रदूषित होते.

नैसर्गिक कारणांमुळेदेखील भूजलाचे प्रदूषण होते. माती व खडकांमधील पाण्यात विद्राव्य असणारी रसायने भूजलात मिसळली गेल्याने भूजल प्रदूषित करतात; उदाहरणार्थ सल्फेट्स, लोह, फ्ल्युओराइड, आर्सेनिक इत्यादी मूलद्रव्ये जास्त प्रमाणात पाण्यात मिसळल्यास ती हानीकारक ठरतात. असे प्रदूषित भूजल पिण्यासाठी वापरल्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात. साथीचे आजार होतात. भूजलातील फ्ल्युओराइडच्या अतिप्रमाणामुळे फ्ल्युओरोसिससारखे विकार उद्भवतात. पिकांवरही याचे दुष्परिणाम दिसून येतात.

भूजल जमिनीखाली असल्याने ते एकदा दूषित झाले की त्याचे शुद्धीकरण करणे अवघड असते. त्यामुळे ते दूषित होऊच नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यक असते. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर टाळणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, डिटर्जंट्सचा अतिवापर टाळणे, पाण्याचा गैरवापर टाळणे, रसायने, रंग, पेट्रोलियम पदार्थ पाण्यात मिसळणार नाहीत याची काळजी घेणे भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ठरते.

भूजलाचे प्रदूषण सहजासहजी लक्षात येत नसल्याने त्याबाबत जनजागृती करणे भूजलाची गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक आहे.

डॉ. योगिता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org