२६ जानेवारी २००१ रोजी भारताचा ५२ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी गुजरात राज्यातल्या कच्छ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांना भूकंपाच्या धक्क्याने जबरदस्त हादरे बसले. ९० सेकंद कालावधीच्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर प्रणालीप्रमाणे ७.७ होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू भूजपासून पूर्वेला सुमारे ८५ किमी अंतरावर, कच्छच्या रणालगत होता. तो चोबरी गावाच्या र्नैऋत्येला ९ किमी अंतरावर होता; तर भूकंपाची नाभी भूपृष्ठाखाली १७.४ किमी खोल होती. एकूण २१ जिल्हे या भूकंपाने बाधित झाले होते. कच्छ, अहमदाबाद, पाटण, बनासकांठा, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर आणि सुरत या आठ जिल्ह्यांना भूकंपाची तीव्र झळ बसली. गांधीनगर आणि वडोदरा या जिल्ह्यांमध्येही बरेच नुकसान झाले. खुद्द कच्छ जिल्ह्यातल्या भूज, अंजार, भचाउ, गांधीधाम या गावांमध्ये अतोनात नुकसान झाले.

लगतच्या राजस्थानमधला काही भाग, विशेषत: मारवाड विभागातला; आणि सीमेपलीकडचा पाकिस्तानचा सिंध प्रांतातला काही भाग, इथपर्यंत पोहोचून या भूकंपाने हाहाकार मांडला. या भूकंपात २०,०२३ लोक मृत्युमुखी पडले होते, १,६६,००० जखमी झाले होते, तर सहा लाख बेघर झाले होते. पाकिस्तानातल्या ३,४०,००० इमारतीही जमीनदोस्त झाल्या होत्या. पडझड झालेल्या एकूण घरांची आणि इमारतींची संख्या जवळजवळ ७,८३,००० होती. यात खेडेगावांमधली घरे जास्त होती. धरणे आणि बंदरे यांचेही अपरिमित नुकसान झाले. एकट्या भूज शहरात २,३७० लोक मृत्युमुखी पडले होते, ३,१८७ जण जखमी झाले होते, ११,००० घरे जमीनदोस्त झाली होती आणि २८,००० घरांची पडझड झाली होती. शाळा, दवाखाने, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, दळणवळण यांसारख्या नागरी सुविधा कोलमडल्या होत्या. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात १९ जण मृत्यू पावले.

गुजरातमध्ये गेल्या २०० वर्षांमध्ये अनेक भूकंप झाले असून त्यातील नऊ तीव्र क्षमतेचे होते. २६ जानेवारी २००१ रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता तिसऱ्या क्रमांकावर, तर विध्वंसकता दुसऱ्या क्रमांकावर होती.

प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या गोंडवनलँड महाखंडाचे वेळोवेळी जे तुकडे झाले, त्यातला एक तुकडा भारतीय भूभाग होता. त्याला आपण आज भारतीय द्वीपकल्प (इंडियन पेनिन्शुला) म्हणतो. मादागास्करपासून आणि आफ्रिकेपासून ज्युरासिक कालखंडाच्या सुरुवातीला तो अलग झाला (सुमारे २० कोटी वर्षांपूर्वी), तेव्हा अरबी समुद्र निर्माण झाला. आणि तेव्हापासून कच्छचा भूभाग सांरचनिकदृष्ट्या सदैव अस्थिरच राहिला आहे. त्यामुळेच तो भूकंपप्रवण आहे. भूकंपप्रवण क्षेत्रांच्या नकाशानुसार गुजरात राज्य धोकादायक क्षेत्रात असून कच्छ जिल्हा हा अतितीव्र भूकंपाच्या क्षेत्रात येतो.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader