कुतूहल: बंदुकीची दारू
बंदुकीची दारू म्हणजे अमोनियम नायट्रेट, सल्फर (गंधक) आणि लोणारी कोळशाची भुकटी यांचे मिश्रण. कोळसा हा बहुतांशी शेवगा, विलो, अल्डर अशा वृक्षांच्या लाकडामार्फत बनवला जातो. कारण तो सच्छिद्र असावा अशी अपेक्षा आहे. तो सच्छिद्र असल्याने त्यात पाण्याचे बाष्प सहजपणे शोषले जाते. अशा प्रकारच्या कोळशाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जास्त असते. बंदुकीच्या दारूसाठी अमोनियम नायट्रेट, सल्फर आणि कोळशाची बारीक पूड केली जाते. मग त्याचे योग्य अशा प्रमाणात मिश्रण करतात. सर्वात जास्त प्रमाण अमोनियम नायट्रेटचे असते. हे मिश्रण यांत्रिक पद्धतीने दीर्घकाळ मळावे लागते. अगदी सुरुवातीच्या काळात मिश्रण ब्राँझ (कास्य) अथवा कॉपर (तांबे) या धातूंच्या खलबत्त्यात कुटले जात असे. कारण या धातूंची सहसा ठिणगी पडत नाही. मिश्रण करण्यासाठी आता ‘बॉलमिल’चा उपयोग केला जातोय. साहजिक स्फोट होण्याची शक्यता कमी होते. मिश्रण उत्तम प्रकारे मळल्यामुळे सच्छिद्र कोळशात आतपर्यंत अमोनियम नायट्रेट जातो. अमोनियम नायट्रेट पाण्यात सहज विरघळतो. यासाठी या मिश्रणात अगदी नाममात्र पाणी टाकतात. कधी कधी थोडे अल्कोहोलही मिसळतात. परिणामी अमोनियम नायट्रेट कोळशाच्या आतील अतिसूक्ष्म छिद्रांमध्ये जातो आणि त्यावर सल्फरचा पातळ थर किंवा आवरण पसरते. सर्वात शेवटी त्यात ग्राफाइटची भुकटी मिसळण्यात येते. त्यामुळे मिश्रण विद्युतभारित होऊन त्याच्यात ठिणगी उडत नाही आणि सुरक्षितता वाढते. नंतर हे मिश्रण दाबाखाली ठेवतात आणि त्यातील जलांश कमी करतात. त्याची घनता १.८ ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर झाल्यावर ते दाणेदार बनवले जाते. आवश्यक तेव्हा त्याच्या गोळ्या केल्या जातात. यातील प्रत्येक क्रिया वेगवेगळ्या इमारतींत करतात. कारण जर स्फोट झालाच तर कमीत कमी नुकसान व्हावे, हा हेतू असतो. आधुनिक बंदुकीच्या दारूमध्ये कोळशाच्या भुकटीचे प्रमाण कमी करून एक पायरोडेक्स नामक कृत्रिम रीतीने तयार केलेली पूड मिसळतात. बंदुकीच्या दारूची ही एक सर्वसाधारण पद्धत आहे. यात आता बरीच आधुनिकता आली आहे.
डॉ. अनिल लचके (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
प्रबोधन पर्व
ती भूतदया नसून भूतबाधा आहे!
‘मनुष्याने मनुष्यावर दया करावी हा माणुसकीचाच धर्म आहे. दया ही मनुष्याची अेक अत्युदार अशी नैसर्गिक प्रवृत्ती आहे; अत्युदार अशासाठी की, देशकालपात्रविवेकाने त्या भावनेचा सदुपयोग मनुष्य करीत गेला तर मानवी समाजाचे त्यात कल्याणच आहे; परंतु मनुष्याची दयाशीलता ही मनुष्यापुरतीच मर्यादित नसते. दु:खी मनुष्य तळमळताना पाहून, लेकरू पाळण्यातून पडताना पाहून, मनुष्य जसा दयेने द्रवतो, त्याची समवेदना जागून त्या दु:खिताचे दु:ख त्याला निवारावेसे वाटते, तसेच त्याच समवेदनेच्या जाणिवेसरशी मनुष्येतर प्राण्यांतील अेखादी पाळीव गाय खड्डय़ात पडून दुखावली तर तिचीसुद्धा मनुष्याला सहजीच कीव आल्यावाचून बहुधा रहात नाही. पक्ष्याच्या घरटय़ातून अपघाताने धप्पदिशी खाली पडलेले साळुंकीचे वा पोपटाचे चिमुकले पिलू चिवचिव करू लागताच त्याला चटकन् उचलून पाणी पाजून सुरक्षित अुबेत ठेवल्यावाचून मनुष्याला चैन पडत नाही. ’’
स्वा. वि. दा. सावरकर ‘ही भूतदया कीं भूतबाधा?’ या १९३६ साली लिहिलेल्या लेखात भूतदयेच्या अवाजवी आणि अनाठायी आग्रहाचा समाचार घेताना पुढे म्हणतात –
‘दयेची तळमळ बाधतेच बाधते. पण स्वत:च्या लेकराला रोगापासून वाचविण्यासाठी जेव्हा शस्त्रक्रिया करावी लागते, तेव्हां कासावीस होणाऱ्या आईच्या हृदयाची ती दया जशी अप्रयोजक म्हणून दाबून टाकून लेकरावर शस्त्रक्रिया करावीच लागते, तशीच भूतदयेची ही दुर्बलता, ही मळमळ मनुष्यहितार्थ दडपून टाकलीच पाहिजे. आज आपल्या अिकडे अशा प्रकारची मनुष्यहितघातक भूतदया दाखविणाऱ्यांविषयी अेक प्रकारची पूज्यबुद्धि अुत्पन्न होते, तो जसा काही अेक अलौकिक सद्गुण समजला जातो, साधुत्वाचे लक्षण समजले जाते. पण वास्तविकपणे पहातां ती अेक नृशंस व्याधि आहे. ती भूतदया नसून भूतबाधा आहे!.. जी मनुष्यासच घातक, ती दया ‘दया सर्वेषु भुतेषु’ होईल तरी कशी? कारण सर्व भूतात मनुष्यही आलाच!.. जी मनुष्याच्या हितास पोषक वा निदान अविरोधी तितकीच भूतदया पाळणे अेवढेच काय ते त्याचे कर्तव्य, तोच याविषयींचा खरा सृष्टिविहित मानवधर्म!!
मनमोराचा पिसारा
कोकीळस्वरांचा वसंत..
बदलत्या ऋतुमानाची विशेषत: वसंत ऋतूच्या आगमनाची आणि बहराची प्रतिबिंबं भारतीय चित्रकलेत पाहणं हा हृद्य दृश्य अनुभव असतो. विशेषत: मिनिएचर चित्रांमध्ये सूक्ष्म बारकाव्यांसह वसंतामधील फुलापानांचा संभार रेखाटलेला असतो. चित्रं निसर्गातल्या वसंत ऋतूची असली तरी त्या चित्रांचा नायक बहुश: कृष्ण हाच असतो आणि बघता बघता कृष्णाच्या मुरलीने वसंत बहरात आला की निसर्गामध्ये उत्फुल्ल रंगांनी प्रेरित झालेल्या कृष्णाने बासरी वाजविली, असा संभ्रम पडतो.
भारतीय चित्रांनी जपलेला वसंत ऋतू दुर्गाबाई भागवतांच्या पद्यमय गद्य ऋतुचक्रात मानाचं स्थान मिळवितो. भारतीय अभिजात संगीताने तर ‘ऋतूं’ना आपली मर्मबंधातली ठेव म्हणून जपलं. शास्त्रीय संगीताने बसंत/ वसंत/ बहार अशा रागांनी सुरांच्या मदतीने वसंत ऋतूला स्वरूप बहाल केलं. ही परंपरा हिंदी चित्रपटातल्या (सुवर्णयुग) गाण्याने समर्थपणे जपली. बसंत बहारमध्ये शंकर जयकिशन यांनी पं. भीमसेन जोशी आणि मन्नादांच्या गाण्यातून केतकी गुलाब, जूही फुलांचा बहर स्वरबद्ध केला. लतादीदी आणि रफी यांनी सुवर्णसुंदरीमधील (स. आदिनारायण राव) कुहूकुहू बोले कोयलियामधून ऋतुचक्र सूरसाकार केलं. गंमत अशी आहे की, मराठी गाण्यातली वर्षां ऋतूमधली धुंदी मनाला मोहित करते, तर हिंदी गाण्यात वसंत ऋतूमधल्या प्रियकराच्या विरहानं व्याकूळ झालेल्या नायिकेची व्यथा मनाला भावते. उत्तरेकडे वसंत आपल्या आधी खुलतो आणि सृष्टी विविध रंगांच्या फुलांनी नटून जाते. वसंतामध्ये कोकिळांना कंठ फुटतो आणि पपीहरा ‘पी पी’ म्हणून साद घालतो. गंमत अशी असते की, सारी सृष्टी रंगीन झाली, पण प्रियकर मात्र परदेशी. तो परतणार सावन के झूले पडल्यानंतर. त्यामुळे नायिकेच्या मनात दाटलेली उदासी आणि बाहेर फुललेला निसर्ग असा मनोहर विरोधाभास निर्माण होतो. ही वेदना हिंदी गाण्यांनी अचूक टिपली आणि मुखरित केली.
हिंदी नायिकांना अशा वेळी निसर्गातल्या कोकिळाचा स्वरदेखील नीरस वाटतो. त्याची मंजूळ कुहूकुहू सुस्वर न राहता, नुसताच शोर वाटतो. नेमकी हीच कहाणी शमशाद बेगम ‘काहे कोयल शोर मचाए’मध्ये शंकर जयकिशनच्या संगीतात बांधून ‘आह’ चित्रपटात कथन करतात.
शमशादच्या जव्हारदार आवाजात हे विरहगीत विलक्षण खुलतं. नायिकेचं भांडण कोकिळाशी. एक तर त्याच्या सुरात गोड आर्तता आहे. तो पुकारतो आपल्या प्रेयसीला आणि हिच्या हृदयाच्या तारा छेडल्या जातात. प्रियकराचं नसणं अधिक जखमा करून जातं.
कधी कधी अशी विरहवेदना दाटून येण्यामागे तो ‘पी पी’ करणारा पपीहरा असतो. ‘पी’ म्हणून त्यानं मारलेली हाक नायिकेच्या काळजाचा ठाव घेते. अशी हाक मारण्याचा हक्क माझाय असं ठासून सांगणारीही अनेक गाणी आहेत.
एकूणच हिंदी चित्रपट गीतामधला वसंत ‘वरून बहर आतून विरह’ या स्वरूपात मनाला भावतो. लतादीदी, गीता दत्त, आशाताई या सर्वानी वसंताला फुलवलंय ते विरहाच्या रंगानं.
मग वाटतं, ही करुण गाणी आपल्याला इतकी का बरं मधुर वाटतात? तलत मेहमूद ‘पतिता’मधल्या शैलेंद्रच्या गाण्यातून त्याचं उत्तर देतो- ‘है सब से मधुर वो गीत, जिन्हें हम दर्द के सुर में गाते है..’
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com