नैसर्गिक पद्धतीत खुड कोंबडी १० ते १२ पिल्लांची जोपासना करते. कृत्रिम पद्धतीत पिल्लांना ऊब कृत्रिम दाई(ब्रूडर) द्वारे दिली जाते. ही ब्रूडर पत्र्याची गोलाकार असून त्यामध्ये साधारणत: चार विद्युतबल्ब असतात. एका ब्रूडरखाली २५० ते ३०० पिल्लांना लागणारी ऊब निर्माण होते. हे ब्रूडर जमिनीपासून वर टांगतात. त्याखाली योग्य अंतरावर जमिनीवर पत्रा, जाड पुठ्ठा किंवा कार्डबोर्ड बसवतात. यास चिकगार्ड म्हणतात. चिकगार्डमुळे पिल्ले उष्णतेपासून दूर जात नाहीत व एकमेकांवर पडून गुदमरत नाहीत.
पिल्ले येण्यापूर्वी पिल्लाच्या घरांची (ब्रूडर हाऊस) तयारी करावी. घरे स्वच्छ धुवून र्निजतुकीकरण करावे. खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, ब्रूडर व इतर उपकरणे बाहेर काढून, स्वच्छ धुवून त्यांचे र्निजतुकीकरण करावे. पिल्लांच्या घरातील भिंती, जमीन स्वच्छ धुवून त्यावर चुन्याची निवळी लावावी. जमीन कोरडी झाल्यास चार ते सहा इंच जाडीची गादी तयार करावी. त्यासाठी लाकडाचा भुस्सा, साळीचा भुस्सा, भुईमुगाचे टरफल इत्यादींचा वापर करावा.
पक्ष्यांची गादी नेहमी कोरडी राखावी. ओली झाल्यास त्यावर जंतू वाढतात. पक्षी रोगाला बळी पडतात. गादीवर वर्तमानपत्राचे कागद अंथरावे. यामुळे पिल्लांना गादीवर नीट चालता येते. त्यांच्या नाजूक पायांना जखमा होत नाहीत. पिल्ले लंगडी होत नाहीत. कागदावर खाद्याची व पाण्याची भांडी चाकाच्या आरीप्रमाणे रचना करून ठेवावीत. त्यामुळे पिल्लांना खाद्य, पाणी व ऊब सुलभरीत्या मिळते. सुरुवातीस कागदावर खाद्य द्यावे व नंतर खाद्याची भांडी ठेवावीत. आवश्यकतेनुसार वाढणाऱ्या पिल्लांना लागणारी अतिरिक्त जागा द्यावी. चिकगार्डचा उपयोग फक्त पहिल्या आठवडय़ात करावा.
पिल्ले जन्मल्यानंतर कृत्रिम दाईमध्ये पहिल्या आठवडय़ात ९५अंश फॅरेनहाइट तापमान (ऊब) लागते. त्यानंतर प्रत्येक आठवडय़ास तापमान पाच-पाच अंशाने कमी करावे. चार आठवडय़ांनंतर कृत्रिम उष्णता देणे बंद करावे. ब्रूडरमधील पिल्लांना प्रथम ग्लुकोज किंवा मीठ-साखरेचे पाणी पाजावे. त्यामुळे वाहतुकीतही ती जिवंत राहतात. तसेच ताणविरहाची औषधे उदा. व्हायमेरॉल, व्हेनलाईट दिल्यास ताण कमी होऊन मरतुक रोखता येते. पक्ष्यामधील विविध रोगांपासून रक्षणासाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबवणे अत्यावश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा