कुतूहल
दूषित पाण्यामुळे होणारे रोग-२
जैविक घटकांप्रमाणेच जर पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळले गेले असतील तर आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. रासायनिक कारखान्यातून सोडलेल्या पाण्यात काही विषारी मूलद्रव्य असण्याची शक्यता असते.
शिसे : शिसंमिश्रित पाणी आपल्या शरीरात गेल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होतो. लहान मुले आणि स्त्रिया यांना या पाण्यापासून जास्त धोका असतो.
फ्लोराइड हे दातांसाठी उपयुक्त मूलद्रव्य पण जास्त प्रमाणात पाण्यात मिसळले गेले असेल तर दात पिवळे पडतात तसेच पाठीच्या कण्यावर परिणाम होतो.
अर्सेनिक जर पाण्यात असेल तर यकृत, मूत्रपिंड, आतडी मज्जासंस्थेवर परिणाम होतो.
रोग होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त चांगलं असते. दूषित पाण्यामुळे होणारे रोग टाळणे हे बऱ्याच प्रमाणात आपल्या हातात असते. नदी, तळे, तलाव, विहिरी हे पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक महत्त्वाचे स्रोत. पाण्याचे साठे सुरक्षित राहावेत यासाठी आपण बऱ्याच लहान लहान गोष्टी करू शकतो.
सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळणार नाही याची काळजी घ्या. बऱ्याच वेळेला पाण्याची पाइप लाइन आणि सांडपाण्याची गटारे एकमेकांच्या हातात हात घालून जातात, त्याची अशी मैत्री असेल तर ती तोडा. आपल्या गावात किंवा शहरात असं चित्र दिसल्यास परिसरातील संबंधित सरकारी यंत्रणेच्या ही गोष्ट लक्षात आणून द्या.
पाण्याच्या साठय़ात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये.
तसेच आपल्या घरातील पाणी आपण सोप्या पद्धतीने शुद्ध करू शकतो.
निवळणे : जर पाणी थोडंसं जरी गढूळ असेल तर त्याला तुरटी लावा. तुरटी पाण्यात मिसळली की मातीतील बारीक कण तळाला बसतात.
गाळणे : तुरटी लावून निवळलेले पाणी नंतर पांढऱ्या, सुती तीन पदरी कापडानं गाळावं.
उकळणे : पाणी साधारणपणे १५ मिनिटं उकळल्यावर पाण्यातील जीवाणू मरतात. उकळलेले पाणी हा एक सुरक्षित पर्याय आहे. त्याशिवाय बाजारात उपलब्ध असलेले क्लोरोवॅट हे औषध मिसळले तर उत्तमच. पाणी उकळवून थंड झाल्यावर कॅण्डल फिल्टने गाळावे. त्याची चव पूर्ववत होते.
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी,मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा