सतराव्या शतकात इटालीच्या इंड्रिआ सिसलपोनो (१५१९- १६०३), स्विस बोहीन बंधू (१५६०- १६२४), ब्रिटिश जॉन रे आणि ट्राँनफोर्ट यांचा वनस्पती वर्गीकरणात मोलाचा वाटा आहे. अठरावे शतक प्रामुख्याने कार्ल लिनिअस (१७०७-१७७८) यांचे ठरले. लिनिअस एका स्वीडिश धर्मगुरूचा मुलगा होता. लिनिअसला वर्गीकरण क्षेत्राचा जनक म्हणून संबोधले जाते. खरे तर वैद्यकशास्त्राचा अभ्यासक असूनही फार त्याने कमी काळ त्या क्षेत्रात काम केले, बाकी पुढचे संपूर्ण आयुष्य नॅचरल हिस्ट्री अभ्यासासाठी दिले. लिनिअसने सर्व प्रथम वनस्पतींच्या जननविशेषतेला परमोच्च महत्त्व दिले आणि लिंगभेदावर आधारित वर्गीकरण पद्धती सादर केली. त्यांनी फुलातील पुंकेसराची संख्या, एकत्रीकरण व उंची यावर आधारित चोवीस भागांत वनस्पतींचे वर्गीकरण केले. सर्व प्रथम लिनिअसने सातत्याने द्विमान पद्धतीचा वापर वनस्पतींच्या नामकरणासाठी केला आणि आजमितीस याच पद्धतीचा वापर वनस्पतीच्या नामकरणासाठी जगभर केला जात आहे. लिनिअसचे काम १७५३ मध्ये ‘स्पिसीज प्लॅट्म म्हणून प्रसिद्ध झाले. त्याच्या कामाची दखल आणि आठवण म्हणून ‘लिनियन सोसायटी ऑफ लंडन’ प्रस्थापित झाली आणि लिनिआ नावाची विज्ञान पत्रिका निघाली. लिनिअसचे वर्गीकरण क्षेत्रातील काम इतके मोठे आहे की, ते आजन्म विसरता येणार नाही.
नंतरच्या काळात नैसर्गिक बाबींवर आधारित वर्गीकरणाची पद्धत फ्रान्सच्या डी जेस्यू (१७४८-१८३६) आणि कुटुंबीयांनी मांडली. सारखे गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा संच एका ठिकाणी ठेवण्यात आला आणि म्हणून ही पद्धत नैसर्गिक वर्गीकरण म्हणून मान्य झाली.
डी जेस्यूचे समकालीन एक वनस्पती अभ्यासक कुटुंब म्हणजे डी केंडोल (१७४८-१८३६) यांच्याही वर्गीकरण पद्धतीने नैसर्गिक असल्याचा मान मिळविला.
सर्वात आधुनिक आणि मान्य नैसर्गिक वर्गीकरण पद्धत दोन ब्रिटिश शास्त्रज्ञांनी जॉर्ज बेंथम (१८००-१८५४) आणि जोसेफ डॉल्टन हुकर (१८१७-१९००) यांनी मांडली. त्यांनी जगभरातल्या वनस्पती संग्रहालयातील वनस्पती नमुन्यांचा आधार घेत ‘जेनेरा प्लॅटरम’ या पुस्तकात मांडली. अजूनही अनेक देशांमध्ये त्यांची वर्गीकरण पद्धत त्याच्या व्यावहारिक मूल्यांमुळे सर्वोत्तम समजली जाते.
डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा