सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com
वर्ष संपत आले असताना हे सदरही आता समाप्तीच्या मार्गावर आहे. नवदेशांचा मागोवा घेताना त्या देशाचा इतिहास, युद्धे आणि संस्कृती किंवा इतर वैशिष्टय़े यांबरोबरच सध्याची स्थिती अशा सर्व भागांची माहिती देण्याचा प्रयत्न होता. यातील अनेक देशांमध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात उलथापालथ घडून आली. असा एक देश म्हणजे इशान्य आफ्रिकेमधील सुदान. २०११ मध्ये सुदानच्या फाळणीतून अस्तित्वात आलेल्या दक्षिण सुदान या देशाची सविस्तर दखल फेब्रुवारी २०२१ मध्ये या सदराने घेतली होती. दक्षिण आणि उत्तर सुदानमध्ये वांशिक संघर्ष कसा तीव्र झाला, याचीही माहिती त्यात होती. नव्या देशाच्या निर्मितीनंतरही दोन्ही देश धुमसत राहिले. त्यात उत्तर सुदानमधील ओमर अल बशीर यांच्या एकाधिकारशाहीचे सरकार उलथवून ऑगस्ट २०१९ मध्ये लष्करी राजवट तेथे आली. खार्टूम हे शहर उत्तर सुदानची राजधानी. तेथे या लष्करी राजवटीने मुलकी प्रशासन सांभाळण्यासाठी अब्दुल्ला हमदोक यांना पंतप्रधानपदी बसविले. मात्र बशीर यांचे पाठिंबादार स्वस्थ बसले नाहीत. त्यातच सप्टेंबर २०२१ मध्ये लष्कराने हमदोक यांना हटवून सारी सूत्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लोकांनीही मोर्चे काढून प्रतिकार केला. पुन्हा ऑक्टोबर २०२१ मध्ये मात्र हमदोक यांच्यासह पाच उच्चपदस्थांना लष्कराने बंदी बनवले. यावर तोडगा म्हणून दक्षिण सुदानने मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतु सुदानमधील स्थिती दिवसेंदिवस बिकट होते आहे. तेथे प्रचंड संख्येने लोक निदर्शने करीत आहेत. लष्करी गोळीबाराचे प्रकारही झाले. सुदानची अस्वस्थता फाळणीनंतरही संपलेली नाही. निदर्शकांवर अत्याचार केल्याचे आरोप लष्करावर केले जात आहेत. त्यातच लोकशाहीवादी मोर्चामध्ये ओमर अल बशीर यांचे पाठीराखे घुसल्याचा लष्कराचा आरोप आहे.