व्हेनिसमध्ये स्थापन झालेल्या प्रजासत्ताकाचा कालखंड इ.स. ६९७ ते १७९७ असा आहे. त्या सरकारातील सर्वोच्च अधिकारी डोज हा प्राचीन रोमन काऊन्सलच्या पातळीवरून काम करीत असे. सुरुवातीच्या डोजेसपकी अग्नेलो आणि पिएट्रो यांच्या कारकीर्दीत व्हेनिस शहराचा विकास सुरू झाला. व्हेनिस राज्य अनेक लहान बेटांचे मिळून बनलेले आहे. आजचे व्हेनिस ज्या बेटावर उभे आहे त्या रियाल्टो बेटावर अग्नेलोने प्रथम वास्तव्य करून राज्याचे मुख्यालय म्हणजे डोज पॅलेस केले. अग्नेलोने या बेटामध्ये लहान लहान कालवे, ते ओलांडण्यासाठी पूल, तटबंदी, झोपडय़ांऐवजी दगडी घरे बांधून आधुनिक व्हेनिसकडे वाटचाल सुरू केली. पिएट्रो याने व्हेनिसचे सन्यदल आणि नाविकदल उभे करून स्लाव वंशाच्या समुद्री चाचांशी लढाया करून व्हेनिस सुरक्षित केले. याच सन्यदल, नाविकदलाने पुढे धर्मयुद्धांमध्ये मदत केली. या काळात व्हेनिसचा प्रसिद्ध ग्रॅण्ड कॅनॉल आणि त्याच्यावरचा पूल बांधला गेला. अकराव्या शतकात व्हेनिस प्रजासत्ताकाचे नाविक सामथ्र्य युरोपातील इतर राज्यांमध्ये सर्वश्रेष्ठ होते आणि व्यापारवृद्धीमुळे आíथक भरभराटही उत्तम झाली. या काळात दुबळ्या झालेल्या बायझन्टाइन सम्राटाने व्हेनिसचे नाविक साहाय्य घेतले आणि त्यांना व्यापारी सवलतीही दिल्या. व्हेनिसची लोकसंख्याही बरीच वाढली पण मधूनमधून लागणाऱ्या आगी आणि उद्भवणाऱ्या प्लेगमुळे लोकसंख्या परत रोडावत असे. वाढत्या नाविक सामर्थ्यांच्या जोरावर व्हेनिसने युद्धे करून ईशान्य इटालीतील आणि ग्रीक प्रदेशातील क्रोएशिया, क्रीट बेट, डाल्मेशिया, व्हेरोना, मिलान, व्हिसेंजा, तुर्कस्थानचा काही प्रदेश घेऊन मोठा राज्यविस्तार केला. पूर्ण युरोपात व्हेनिसला व्यापारामध्ये तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणता येईल असे फक्त जिनोआ हे राज्य होते. व्हेनिस आणि जिनोआच्या व्यापारी स्पध्रेतून १२५६ ते १२७० या काळात चार युद्धे झाली. या चारही युद्धांत व्हेनिसचीच प्रत्येक वेळी सरशी होऊन युरोपात व्हेनिसचे व्यापारी वर्चस्व प्रस्थापित झाले. १४९८ साली वास्को दी गामाने शोधलेल्या पूर्वेकडच्या जलमार्गामुळे मात्र व्हेनिसचा व्यापार अगदीच रोडावला.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
उद्यानकलाशास्त्र – १
निसर्ग हा विविध तऱ्हेच्या झाडांनी नटलेला आहे. ही विविधता निरनिराळ्या रंगांची पाने, फुले, फळे तसेच विविध आकारांमधून दिसून येते. परंतु तापमान वाढ, पावसाचा अनियमितपणा व किडीचा प्रादुर्भाव यामुळे झाडांवर विपरीत परिणाम होतो.
परंतु मानवाने आपल्या बुद्धीने, कौशल्याने यात प्रगती केली आहे. निरनिराळ्या झाडांवर प्रयोग करून उपयुक्ततेच्या दृष्टीने त्यात सुधारणा घडून येत आहे. हे प्रयोग उद्यानकलाशास्त्राच्या माध्यमातून सुरू आहेत. हे उद्यानकलाशात्र म्हणजे काय आहे, त्याची उपयुक्तता काय आहे? ते आपण पाहू या. उद्यानकलाशास्त्र हे ‘हॉर्टिकल्चर’ या नावाने परिचित आहे. हॉर्टिकल्चर हा शब्द दोन लॅटीन शब्दावरून तयार झाला आहे. हॉट्रस म्हणजे गार्डन किंवा उद्यान व क्लचर म्हणजे कल्टिव्हेशन अर्थात मशागत.
पूर्वीच्या काळी उद्यान म्हणजे एखाद्या मोठय़ा जागेवर कुंपण घालून तिथे औषधी वनस्पती, फळझाडे, भाजीपाला, शोभिवंत फुलांची झाडे लावणे असा होता. थोडक्यात झाडांची लागवड एखाद्या बंदिस्त व सुरक्षित जागेत करणे यालाच गार्डन असे म्हणत. पण आता औद्योगिक दृष्टिकोनातून मोठय़ा प्रमाणावर मोठय़ा जागेवर झाडांची लागवड करण्यात येत आहे.
उत्कृष्ट दर्जाची झाडे तयार होण्यासाठी शेतकी महाविद्यालय, विद्यापीठ इथे मोठय़ा प्रमाणात संशोधन होत आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या संशोधनाची माहितीपण येथे उपलब्ध आहे. त्यासाठी शेतीतज्ज्ञांच्या ज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करून उत्कृष्ट दर्जाचे व अधिक धान्य पिकवता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे झाडांची लागवड करताना त्याच्या पोषणमूल्यात सुधारणा करून त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढवता येते. झाडांवर, पिकांवर कीड, रोग यांचा प्रादुर्भाव या नवीन गोष्टी लक्षात घेतल्या तर उद्यानकलाशास्त्र हे एक शास्त्र व तंत्रज्ञान आहे हे लक्षात येईल. उद्यानकलाशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होतो.
प्रा. रंजना देव
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा