सुरुवातीचे प्लास्टिक – कचकडे
१९५० पर्यंत घराघरात तांब्या-पितळेची भांडी वापरली जात. पितळेच्या भांडय़ात ठेवलेल्या आंबट पदार्थाची चव बदलते त्याला कळकणे म्हणतात. त्यासाठी भांडय़ांना आतून कल्हई केली जाई. कल्हई करणे म्हणजे कथलाचा (टिन) मुलामा देणे. १९५०च्या सुमारास बाजारात स्टेनलेस स्टीलची भांडी नुकतीच डोकावू लागली होती. साधारण त्याच सुमारास बाजारात प्रथम कचकडय़ाच्या वस्तू दिसू लागल्या. या वस्तू टेबलावरून खाली जमिनीवर पडल्या तर पिचत किंवा फुटत. कचकडय़ाच्या निमित्ताने प्लास्टिकची ही पहिली ओळख भारतीय समाजाला झाली. कचकडे हे सेल्युलोज नायट्रेट व कापूर यांच्या मिश्रणापासून बनवतात. या भांडय़ांनी हळूहळू तांब्या-पितळेच्या भांडय़ांना मोडीत काढले. कचकडे व्यवहारातून बाहेर पडायला बराच काळ जावा लागला. हळूहळू १९६०च्या सुमारास, भांडीच कशाला नायलॉनचे म्हणजेच एका अर्थी प्लास्टिकचे कपडेही बाजारात दिसू लागले.
१९७०च्या सुमारास बाजारात पीव्हीसी ऊर्फ पॉलिव्हिनाइल क्लोराइडच्या वस्तू येऊ लागल्या. जमिनीखाली मिळणाऱ्या क्रूड तेलाचे शुद्धिकरण करताना नाफ्था नावाचा पदार्थ तयार होतो. तो उच्च तापमानाला व उच्च दाबाखाली उकळवल्यावर इथिलिन नावाचा पदार्थ मिळतो. या इथिलिन व क्लोरिन वायूच्या मिश्रणातून इथिलिन डायक्लोराइड मिळते. त्यातून व्हिनाइल क्लोराइड बनवतात. त्याचे बहुवारीकरण (पॉलिमरायाझेशन) करून पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराइड तयार होते. तसेच हाय डेंसिटी पॉलिथिलिन (एचडीपीई) हा पदार्थही बनवतात. या दोन तऱ्हेच्या प्लास्टिकपासून घराघरात लागणाऱ्या अनेक वस्तू तयार झाल्या आणि त्यांनी घरातील तांब्या-पितळेच्या वस्तूंना हद्दपार केले. नाही म्हणायला स्टेनलेस स्टीलने मात्र आजपर्यंत चिवटपणे प्लास्टिकच्या या हल्ल्याला तोंड दिले आहे.
जगभर वाढत चाललेल्या लोकसंख्येला पुरे पडण्यासाठी तांबे-पितळ पुरेसे उपलब्ध नसल्याने प्लास्टिकसारख्या पदार्थाची गरज होती. प्लास्टिक हे नाव एखाद्या आडनावासारखे आहे. प्लास्टिकच्या कुटुंबात पॉलिथिलिन, पॉलिस्टायरिन, पीव्हीसी, पॉलिअमाइड (नायलॉन), टेरिलिन, फोरमायका, मेलेमाइन, सनमाइका, बेकेलाइट, पॉलिप्रॉपिलिन, सेल्युलोज अॅसिटेट, सीबीए, सेल्यूलोज नायट्रेट, फिनोलिक -अमिनो, पॉलिएस्टर इपॉक्सी-व्हिनाइल सेलीकोंस, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन, पॉलिअॅक्रिलिक नायटराइट (ऑरीओन), सेल्यूलोज नायट्रेट (एरल्डाइट फेविकोल), सान, अॅसिटल, फ्लोरोप्लास्टिक, पॉलिसल्फोन, पॉलिकाबरेनेट रेझिन इत्यादी अनेक पदार्थ येतात.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
प्रबोधन पर्व
समाजविकासाची दिशा वाटोळ्या जिन्यासारखी..
‘‘समाजात एका तत्त्वावर चाललेले व्यवहार प्रमाणभेदाने भिन्न प्रकारचे बनले म्हणजे त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जुने तत्त्व सोडून नवे तत्त्व स्वीकारण्याची आवश्यकता वाटू लागते. एकदा, जो कसतो त्याचीच मालकी जमिनीवर असावी, हे तत्त्व समाजाला हितावह वाटले.. पुढे कसतो त्याची जमीन, या तत्त्वापेक्षा ज्याच्याजवळ भांडवल असेल त्याची मालकी जमिनीवर असली तर शेतीची सुधारणा होईल असे वाटू लागले व त्यास लागणारे भांडवल कसणाऱ्या शेतकऱ्यांपाशी नसते म्हणून भांडवलवाल्याची जमीन हे तत्त्व बरे वाटले.. पण या पद्धतीमुळे धनोत्पादन वाढले तरी धनाची विषम विभागणी होते असे दिसू लागले, तेव्हा शेती सामुदायिक बनवावी हे तत्त्व पुन: बरे वाटू लागले. अशा प्रकारे समाजरचनेचे एक तत्त्व एका परिस्थितीत बरे ठरते व तेच तत्त्व दुसऱ्या परिस्थितीत वाईट ठरते. नंतर त्याच्या विरुद्ध तत्त्व समाज स्वीकारतो. यावेळी समाजाची गाडी एका तत्त्वाच्या दिशेने जाऊ लागते. यावेळी विरोधी तत्त्वे व मते यांचा लढा समाजात उत्पन्न होतो व या विरोधातूनच समाजाच्या गाडीची प्रगती होत असते. अशा प्रकारे समाजाचा विकास त्यातील विरोधातून होत असतो. ’’
अशी समाजविकासाची मीमांसा करत आचार्य जावडेकर त्यातील भेद स्पष्ट करतात-‘‘.. समाजाची प्रगती वाटोळ्या जिन्यावरून वर चढणाऱ्या मनुष्यासारखी होत असते. तो पुन:पुन: त्याच त्याच तत्त्वावर आल्यासारखा दिसला, तरी तो वरच्या पातळीवर त्या तत्त्वाचा आश्रय करीत असल्याने त्याची प्रगती अथवा उन्नती होत असते. तो एकदा एक तत्त्व स्वीकारतो, पुन: त्याच्या विरुद्ध तत्त्वाचा तो अवलंब करतो व पुन: ते विरोधी तत्त्वही सोडून पहिल्या तत्त्वाकडे गेल्यासारखा भासतो. पण तसे करीत असता विरोधी तत्त्वाच्या आश्रयाने झालेली प्रगती तो सोडून देत नाही. त्यापासून जे घेण्यासारखे असते ते आत्मसात करून त्याचा त्याग करतो व म्हणूनच तो पूर्वीच्या तत्त्वाकडे जातो म्हणण्यापेक्षा दोन विरोधी तत्त्वांतील ग्राह्य़ांशांचे ग्रहण करून व त्याज्यांशांचा त्याग करून तो एक नवे समन्वय तत्त्व शोधून काढतो असे म्हणण्यास हरकत नाही.
मनमोराचा पिसारा
लोक काय म्हणतील?
‘मानसी, तुझ्याशी बोलायचंय, म्हणजे तुझ्याशी खासगीत हितगुज करायचंय. बोलू? मानस हळूच म्हणाला. ‘नको, इथे चारचौघात स्वत:शी तंद्री लावून बसलास, तर लोक काय म्हणतील?’ मानसी कुजबुजली. ‘बोललीस! पुन्हा पुन्हा तोच मुद्दा पुढे करतेस! लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? कान किटले माझे आता!’ मानस म्हणाला. ‘शूऽऽ हळू बोल!! लोक काय म्हणतील.’ मानसीनं मानसला दटावण्याचा निकराचा प्रयत्न केला.
त्याला झुगारून मानस निश्चयानं म्हणाला, ‘लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे! स्वत:शी संवाद करायची कशाला चोरी? मला आज या लोकांच्या म्हणण्याचा पर्दाफाश करायचाय. स्टिंग ऑपरेशन करायचंय!’ ‘बरं, मानस, तुला एक वेळ ठिकाय, पण तुझ्या मनातलं मानसीपण या लोकांचं म्हणणं ऐकतं. आता, तू हट्टालाच पेटलायस म्हणून ऐकते! ‘काय? लोकांचं की आपल्या मनाचं!’ मानस खोचकपणे म्हणाला. ‘एनी वे, लोकांचं न बोललेलं ऐकू येतं, पण तुझा आतला आवाज, शहाणपणाचा सूर कसा ऐकू येत नाही?’
‘म्हणजे? न बोललेलं ऐकू येतं म्हणजे भास?’ मानसीनं विचारलं किंचित कुतूहलानं.
भास नाही की आभास नाही. आपण लोक लोक म्हणतो, ते लोक बाहेर नसतात, दृष्टीस पडत नसतात. आपल्या मनातल्या आपल्यालाच बहुधा विरोध करणाऱ्या मनाच्या कप्प्याला आपण लोक असं नाव देतो, आणि हे ‘लोक’ आपल्याला सदैव धाकात ठेवतात. आपल्यावर तथाकथित ‘जनरीत’ म्हणून दादागिरी करतात! मानसी ऐकत होती.. ‘आणि लोक काय म्हणतील या गोष्टीची धास्ती बाळगून आपण आयुष्यभर भयभीतासारखे जगतो..’
‘व्वा, म्हणजे सगळी नीतीमूल्ये. झुगारून हवं तसं जगा! असा सल्लाच देतो आहेस का मला?’ मानसी उसळून म्हणाली.
‘मानसी, नीतिमूल्ये आपण पारखून स्वीकारतो ती जगण्याची मार्गदर्शक तत्त्वे म्हणून. धोक्याचे लाल दिवे म्हणून! त्यांना भ्यायचं नसतं. त्यांचा अभ्यास करायचा असतो. त्यावर चिंतन करायचं असतं. काळवेळ परिस्थिती याचं विश्लेषण करून त्यांचा अवलंब करायचा असतो. नीतीमूल्यानं वास्तवाचं भान निर्माण होतं. नीतीमूल्य घाबरवत नसतात. लोक काय म्हणतील? यामधून फक्त मताचा कमकुवतपणा जाणवतो.’ मानसी पुन्हा विचारात पडली.
‘मानसी, लोक काय म्हणतील याची आपण कधीच विचारणा करीत नाही. या तथाकथित लोकांशी कधी चर्चा करीत नाही. महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आप्तस्वकीयांशी, हितचिंतकाशी सल्लामसलत जरूर करावी. हे ‘लोक’ नि:पक्षपातीपणे आपलं मत मांडतील, याचीदेखील खात्री वाटत असेल तरच चार मोजक्या सुबुद्ध समजदार लोकांचं म्हणणं ऐकावं. उगीच ‘लोक काय म्हणतील’ याच मताशी तुणतुणं वाजवू नये.’ मानस ठामपणे म्हणाला.
मानसी विचार करून म्हणाली, ‘यू मीन, प्रत्यक्ष छाननी न करता आपण त्या लोकांचं म्हणणं गृहीत धरतो आणि त्या म्हणण्याला बिचकून राहतो, असं?’
‘अगदी बरोबर, ‘लोक काय म्हणतील?’ हे लोकांना न विचारता आपणच म्हणत असतो. लोकांना काय वाटेल? असं आपल्याला वाटतं, याचा आपण केलेला भीतीयुक्त विचार असतो. मनाला भेदरविणाऱ्या आणि सर्जनक्षमता नष्ट करणाऱ्या अशा विचारांना भीक घालायची नसते. मनातल्या शंका सोडवायच्या यावर दुमत नाही, त्यांचं निरसन करायचं, नक्कीच. पण ‘लोक काय म्हणतील?’ म्हणजे मनाला दुबळं करणाऱ्या शंकांचा आपण घातलेला घोळ!! तो आपणच थांबवायला हवा ना! त्या लोकांना आपणच गप्प करायचं!’
मानसी खुदकन हसली, ‘ये तो मैंने सोचाही नही था!’ ‘मै हूं ना!’ मानस स्वत:ला टपली मारून म्हणाला.
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com