मेंढपाळाला मेंढय़ांना होणाऱ्या काही सर्वसामान्य आजारांवर घरगुती उपाय माहीत असायला हवेत. हिरवा चारा जास्त खाल्ल्याने किंवा शिळे अन्न खाल्ल्याने पोटफुगी होत असते. अशा मेंढीस गोडेतेल १०० मिली व टर्पेटाइन १ चमचा यांचे मिश्रण किंवा ५० ग्रॅम सुंठ व ३० ग्रॅम खाण्याचा सोडा यांचे मिश्रण पाजावे. यामुळे पोटफुगी कमी होऊन मेंढीस आराम पडतो.
मेंढय़ांमध्ये परोपजीवी जंतूंचा संसर्ग झाल्याने किंवा दूषित पाणी पिल्याने हगवण होते. अशा वेळी बाधित मेंढय़ांना १० ग्रॅम कात, २० ग्रॅम खडूची भुकटी, ५ ग्रॅम सुंठपूड व पाणी यांचे मिश्रण पाजावे. तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी मीठ, साखर, पाणी यांचे मिश्रण दिवसातून चार-पाच वेळा पाजावे आणि चिंचेचा व िलबाचा पाला घालावा.
मेंढय़ांना सर्दी झाल्यास अथवा त्यांचे नाक वाहत असल्यास निलगिरी तेलाची वाफ द्यावी. डोके व नाक यावर तूप, काळे मिरे व लसूण यांचे मिश्रण लावावे. कापूर, मध व अडुळशाच्या पानाचा रस यांचे समभाग करून एका वेळेस १० ग्रॅम खायला द्यावे. मेंढय़ांना काही कारणाने जखम झाल्यास तंबाखू व खाण्याचा भिजलेला चुना यांचे मिश्रण जखमेवर लावून पट्टी करावी किंवा खाण्याचा चुना, हळद व फुलवलेली तुरटी यांचे मिश्रण जखमेवर लावावे.
मेंढय़ांना खरूज झाल्यास खरजेच्या खपल्या रक्त येईपर्यंत ब्लेडने खरडवून काढाव्यात. त्यावर कॉपर सल्फेट व करंजी तेल यांचे मिश्रण दर दोन दिवसांच्या अंतराने बरे होईपर्यंत लावावे.
मेंढय़ांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव आढळल्यास तंबाखूचा अर्क २५ ग्रॅम व ५ टक्के मोरचुदाचे द्रावण तयार करून प्रत्येक मेंढीस ५० मिली पाजावे. मेंढीच्या पायाचे हाड मोडल्यास मोडलेल्या जागी अंडे व विटांची पावडर यांचे मिश्रण लावावे. त्यावर मेंढीच्या लोकरीचे आवरण करून बांबूच्या पट्टय़ांनी १५ दिवस बांधून ठेवावे.
मेंढय़ांच्या शरीरावर उवा, गोचीड झाल्यास करंज तेल, मीठ यांचे समभाग व पाणी यांचे मिश्रण मेंढीच्या शरीरावर लावावे किंवा तंबाखू पाण्यात उकळून त्याचे द्रावण शरीरावर लावावे. त्यामुळे उवा, गोचीड गळून पडतात.
जे देखे रवी..- पक्ष आणि प्रतिपक्ष
या जगात दोन पक्ष आहेत. एक देवावर विश्वास ठेवणारा आणि दुसरा न ठेवणारा त्यातला दुसरा पक्ष मधून मधून ओरडतो पण बहुतांशी गप्प आहे. कारण जनमताचा प्रचंड रेटा पहिल्या पक्षाच्या बाजूचा आहे. श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय? याबद्दलही वाद आहे. अंधश्रद्धेमुळे माणूस बळी वगैरे देतो माणसांचेही देतो ते वाईट इथपर्यंत आपण आलो आहोत, पण परवडत नसताना श्रद्धेपोटी (कोठल्याही धर्मात) अवास्तव खर्च करणे आणि मग आपल्या आहार आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजांवर मर्यादा आणून निकृष्ट जीवन जगणे हे अयोग्य आहे, असे म्हणण्याची आपली अजून हिंमत नाही. एक तिसराही पक्ष आहे. तो जबाबदारी झटकतो. मला या बाबतीत काही समजत नाही, असे म्हणतो. त्यात दोन डगरीवर उभा राहण्याचा प्रयत्न असतो. याला पळपुटेपणा म्हणायचे की प्रामाणिक कबुली म्हणायचे? देवाच्या बाबतीत तीन प्रकार असतात. एकात देव व्यक्ती सदृश असतो. तो हे सगळे घडवितो त्याचा व्यवहार सांभाळतो, न्याय-निवाडा करतो, शिक्षा देतो किंवा स्वर्गात पोहोचवितो. या देवाचे सर्वत्र बारीक लक्ष असते. हा देव पृथ्वीचाच नव्हे तर विश्वाचा देव आहे आणि ग्रह-तारेही त्याच्याच राज्यात अंतर्भूत आहेत. दुसरा प्रकार आहे. एका अज्ञात शक्तीचा. या शक्तीने विश्व घडविले त्याचे नियम केले आणि हात झटकले. त्यानंतर काही विशिष्ट नियमांप्रमाणे हे जग चालत आले आहे. तिसरा प्रकार या जगाला विश्वाला किंवा निसर्गातल्या प्रत्येक चीजवस्तूला देव समजण्याचा. निसर्गपूजा किंवा ५५विश्वात्मके देवे७७ हा वाक्प्रचार या तिसऱ्या प्रकारात मोडतात. प्रकार काहीही असो त्याचा कणा देवच असतो. हे तीन देवाचे प्रकार आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून नाही, असा आग्रह अशा तऱ्हेने ही विभागणी होते. याचा अर्थ देव या संकल्पनेच्या अवतीभवती ही चर्चा सुरू राहते. देव आहे की नाही या गृहीतकांच्या पलीकडे जगणे शक्य आहे की नाही? आहे तसे निसर्गात बागडणे, सुख-दु:खाला सामोरे जाणे दुसऱ्याला त्रास होणार नाही, असे वागणे एकोप्याने राहणे, बुद्धीने निसर्गाचा शोध घेणे, त्यातून संशोधन घडत असेल तर आपले जीवन सुधारण्याचे उपाय लागू करणे. या सगळ्यात देव असणे-नसणे हे विषय जरा बाजूला ठेवले तर मधून मधून डोक्यात येतीलही, पण डोक्यात येणारा प्रत्येक विचार आपण थोडाच अमलात आणतो. असो देव हा विषयच बाजूला ठेवून विचार करण्याची प्रथा खरेतर भारतातली किंवा चीनमधली त्याबद्दल क्रमाक्रमाने.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – ब्रेन कॅन्सर-मेंदूचा कर्करोग (भाग-१०)
एक काळ मानवी जीवन गरीब व श्रीमंतांच्या तुलनेने साधे होते. सकाळी उठावे, आपला दिनक्रम करावा, दोन वा तीन वेळा जेवावे, रात्री लवकर झोपावे. अशी सर्वसाधारण दिनचर्या वीस-पंचवीस वर्षांमागे होती. आताचे फक्त मोठाल्या शहरांतल्यांचेच नव्हे तर खेडोपाडीचेही गरीबगुरिबांचे जीवन खूपच बदलले आहे. लाईफ ‘फास्ट’ झाले आहे. कोणालाच थांबायला, विश्रांतीला वेळ नाही. सगळय़ांकडे वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढत्या सुखसोयी आल्या आहेत. विलासी जीवन व अधिकाधिक सुखसोयींमागे धावणारी मनोवृत्ती यामुळे मानसिक ताणतणाव वाढत आहे. आधुनिक वैद्यकातील थोर थोर संशोधकांनी मानवी शरीराच्या कणाकणांचा अभ्यास करून, विविध अंगांनी संशोधन करून खूपच ज्ञान मिळविलेले आहे. त्यामुळे तऱ्हेतऱ्हेच्या कष्टसाध्य, असाध्य रोगांवरही मात करता येते. पण भलेभले मानवी शरीर शास्त्रज्ञांना मेंदूच्या संपूर्ण कार्याचे आकलन आजतरी शतांशानेही झालेले नाही. मेंदूचे कार्य अनाकलनीय आहे. तुम्ही हा लेख वाचत असताना तुमचा मेंदू, तुमचे मन कुठे भरकटत आहे, हे तुम्हालाच सांगता येत नाही. तुम्ही एकीकडे लेख वाचताना एक ना अनेक प्रश्नांनी मेंदूवर कमी-अधिक ताण येत असतो. छोटा मेंदू, मोठा मेंदू अशा तपशिलात न जाता तुम्ही-आम्ही खूप विचारचक्रामुळे, चिंतेमुळे, कमी निद्रा व विश्रांतीमुळे मेंदूचा काही भाग अकाली सुकवत असतो व ते फार उशिरा लक्षात येते. आपली स्मरणशक्ती कमी झाली आहे, रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे, चिडचिड वाढली आहे, आपणास चटकन राग येतोय, हातापायांना मुंग्या येत आहे, दृष्टी क्षीण होत आहे असे लक्षात आल्याबरोबर मेंदूचा एमआरआय केला जातो. या तपासणीत मेंदूची अॅट्रोपी असल्यास ब्राह्मीवटी ६ गोळय़ा, लघुसूतशेखर ३ गोळय़ा दोन वेळा, रात्री निद्राकरवटी याचा उपयोग होतो. रोग खूपच पुढे गेला असल्यास पंचगव्यघृत, सारस्वतरिष्ट दोन वेळा व अणुतेलाचे नस्य यांची मदत घ्यावी. निश्चयाने मेंदूच्या कर्करोगावर मात करता येते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – १ ऑक्टोबर
१९०१- मारवाडी असूनही मराठी साहित्याची अतोनात गोडी असणारे लेखक बुलासा मोदी यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी निधन. अर्वाचीन मराठी वाङ्मयाची समालोचन करणारी ‘मराठी भाषेची सद्यस्थिती’ ही लेखमाला त्यांनी लिहिली.
१९०२ – गणितज्ञ आणि या विषयावरील एक सिद्धहस्त लेखक नारायण हरी फडके यांचा जन्म. ‘भारतीय गणिती’ या पुस्तकातून थोर भारतीय गणितज्ञांचा परिचय. तसेच ‘लीलावती’ या संस्कृत गणिती ग्रंथाचे ‘लीलावती पुनर्दर्शन’ हे मराठी भाषांतर आणि विश्वकोशातही गणित व ज्योतिषशास्त्र या विषयावर लेखन केले.
१९०५- ख्यातनाम मराठी साहित्यिक मालतीताई बेडेकर तथा विभावरी शिरूरकर यांचा जन्म.
१९१९- महाराष्ट्राचे वाल्मीकी, गीतरामायणकार, कथाकार, उत्तम वक्ते, लेखक, अभिनेते ग. दि. माडगूळकर यांचा जन्म. चित्रपट कथा, पटकथा, संवाद, गीते आदी क्षेत्रांत अमीट ठसा उमटवला. ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’ने इतिहास घडवला. व्यक्तिचित्रे, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, बालकथा आदी साहित्याच्या सर्व दालनांत त्यांचा मुक्त वावर होता. १४ डिसेंबर १९७७ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.
१९३१ – नाटय़छटाकार आणि या वाङ्मयप्रकारचे जनक दिवाकर तथा शंकर काशिनाथ गर्गे यांचे निधन. त्यांनी एकूण ४९ नाटय़छटा लिहिल्या.
– संजय वझरेकर