माणसाने खनिज द्रव्यांपासून मेणाची निर्मिती केली आहे; पण ते मेण रासायनिक असते. तर मधमाश्यांचे मेण सेंद्रिय प्रकारात मोडते; कारण मधमाश्या त्यांच्याच शरीरातील मेणग्रंथीमधून स्रवलेल्या मेणापासून पोळे बनवतात.
१६८४ मध्ये मार्टनिी जॉन यांनी मधमाश्यांच्या मेणाची उत्पत्ती त्यांच्या उदरभागातील मेणग्रंथीतून होते, हे शोधलं. मधमाश्या मधाच्या पचनातून मेणग्रंथीतून मेण बाहेर टाकतात. मेणनिर्मितीच्या कार्यात गुंतलेल्या कामकरी मधमाश्या प्रथम खूप मध पितात व हळूहळू साधारण २४ तासांत मधापासून मेणनिर्मिती करतात. आठ- नऊ किलो मध खाल्ल्यानंतर एक किलो मेणाचे उत्सर्जन होतं. त्या वेळी ते द्रवरूपात असतं; पण हवेशी संपर्क आला की त्या मेणाच्या घट्ट अशा पापुद्रय़ासारख्या पत्री बनतात.
ताजं शुद्ध मेण रंगाने पांढरं असतं; पण पोळय़ासाठी पुन:पुन्हा वापरल्यावर ते पिवळट दिसतं. जुनी पोळी गडद होतात, कारण त्यात परागकण, मधमाश्यांची कात व अन्य पदार्थ मिसळलेले असतात. पोळ्यातून काढलेल्या मेणावर प्रक्रिया करून ते शुद्ध करतात.
भारतातील मधमाश्यांच्या चार प्रकारांनुसार चार प्रकारचे मेण मिळते. पाळीव जातीच्या मधमाश्यांच्या मेणाची मानके सोबतच्या तक्क्यातच दिली आहेत. मेणाच्या शुद्धतेची मानके भारतीय मानक संस्थेने व भारतीय वैद्यक शास्त्राने प्रमाणित केली आहेत. ही शुद्धता प्रयोगशाळेतच तपासता येते.
शुद्ध मेणाचा वापर आधुनिक मधमाशीपालन तंत्रात नव्या पोळय़ांच्या निर्मितीसाठी करतात. त्याशिवाय औषधांत, सौंदर्यप्रसाधनांत, दंतवैद्यकात, पॉलीश करण्यासाठी, मॉडेल बनवण्यासाठी अशा कित्येक उद्योगांत त्याचा वापर केला जातो.
– डॉ. क. कृ. क्षीरसागर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
‘‘एक लाख ओळी फाडून, जाळून टाकल्या.. ’’
सन १९७० चा ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात विश्वनाथ सत्यनारायण म्हणाले, ..‘‘मी माझी प्रशंसा, ही तुमच्या अंत:करणात विराजमान कवींच्या हर्षोल्हासित मनातील इच्छेची पूर्ती मानतोय. हे तुमच्या आणि माझ्यासाठी एक आनंदमय वरदानच आहे.
‘शब्द ओठावर आले आणि कविता बनून गेले’ – ही ओळ माझ्या बाबतीत लागू होऊ शकते. पाळण्यातून बाहेर पडताच मी कविता करू लागलो होतो. १९३४ मध्ये मी ‘रामायण कल्पवृक्षमु’ लिहायला सुरुवात केली आणि ठरवलं की, मी आपलं रामायण लिहीन ते केवळ माझ्याच शैलीत लिहीन. पण असं करणं सहजशक्य नव्हतं. मी एक लाख ओळी लिहिल्या; पण मी त्या फाडून जाळून टाकल्या. मग मी संस्कृतमधील काव्याचा, नाटकाचा आणि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केला. आता मी रामायण लिहिण्याच्या अवस्थेत आहे का यासाठी मी वाल्मीकीच्या रामायणात पुन्हा डोकावलो. या महानकथेच्या प्राथमिक निरीक्षणानंतर माझ्या असं लक्षात आलं की, वाल्मीकींनी रामायणाची रचना मुख्यत: सीतेची कथा सांगण्यासाठी केलीय. या गोष्टीने मी थक्क झालो. ..रामायण ही मुख्य रूपात सीताकथा आहे. म्हणून मी नागपूजक, संप्रदायातील सिद्ध अनुयायांची भेट घेतली आणि त्यांनी मला सीतामातेच्या रहस्याबाबत माहिती दिली. पण प्रत्येक टप्प्यावर मला, मी रामायण लिहिण्यासाठी आवश्यक ती योग्यता प्राप्त केलीय् असं वाटत असतानाच, त्या ध्येयाप्रत पोहोचण्याच्या रस्त्यावर अनेक अडथळे उभे असलेले मला दिसत. कला म्हणजे काय? विद्या की शिल्प? याचा उपयोग मी कसा करू? त्याच्याशी ओळख कशी करून घेऊ?..
संस्कृत आणि तेलुगु साहित्यातील शास्त्रीय रचनांचा धांडोळा घेताना मला त्याचं दर्शन झालं. त्यानंतर मी इंग्रजी लेखकांचं साहित्य वाचलं. युरोपीय साहित्य, ग्रीक नाटक आणि इतर अनेक लेखकांचं साहित्य अनुवाद रूपात वाचलं.. त्यावेळी माझ्या मनात एक विचार आला की, प्रभू श्रीरामचंद्र यांनी मला प्रेरित केलं; आता मी लिहिण्यासाठी बसावं असंच ते सांगताहेत. मी एका विशेष अनुभवातून गेलेलो नाही असं प्रभूंना वाटलं असावं, म्हणून त्यांनी माझ्या पत्नीला माझ्यापासून दूर केलं. तिचा देहान्त झाला. यातून मला विरहाचा अनुभव मिळाला. हे सगळं ठीकच घडलं आणि मी रामायणाची रचना करायला प्रारंभ केला.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com