शास्त्रज्ञांना १९७७ मध्ये प्रशांत महासागराच्या तळातून विवरांवाटे गरम, वितळलेला क्षारयुक्त द्रव बाहेर पडताना प्रथमच दिसला. तळाशी सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने तेथे स्वयंपोषी सजीव नसतात, मात्र काळोखात राहणारे काही जीव आढळतात. जमिनीवर ज्याप्रमाणे गरम पाण्याचे नैसर्गिक झरे असतात, तसेच उष्णजल निर्गममार्ग (हायड्रोथर्मल व्हेन्ट) भूकंपप्रवण प्रदेशात शक्यतो समुद्र-मध्यावरच्या कडांवर आढळतात. अशा ठिकाणी पृथ्वीच्या ‘टॅक्टॉनिक प्लेट्स’ (भूविवर्तनी थर) एकमेकांपासून दूर सरकत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी शीलारस (मॅग्मा) भेगांमधून समुद्रतळापासून पृष्ठभागावर उसळू पाहतो. तेथील स्थानिक उष्ण तापमानामुळे विविध रासायनिक प्रक्रिया होऊन ऑक्सिजन, मॅग्नेशिअम, सल्फेट, इत्यादी रासायनिक घटक पाण्यातून बाहेर पडू लागतात. हायड्रोथर्मल व्हेन्टच्या ठिकाणी रासायनिक घटक अधिक तप्त आणि आम्लधर्मी होतात. त्यामुळे आजूबाजूच्या खडकातून लोह, जस्त, तांबे आणि कोबाल्ट यांसारखे धातू झिरपतात. समुद्रतळाच्या या निर्गम मार्गानी पुन्हा एकवार तप्त द्रव उसळी घेत असतात. हे फवारे काळे किंवा पांढरे अशा दोन प्रकारचे दिसतात. त्यामुळे यांना ब्लॅक किंवा व्हाइट स्मोकर्स असे म्हणतात. यांचे तापमान ४०० अंश सेल्सिअस इतके जास्त असले तरी समुद्रतळाशी असलेल्या जास्त दाबामुळे पाणी उकळत नाही. चार अब्ज वर्षांपासून कार्यरत असणारे निर्गममार्ग पृथ्वी तयार होत असतानाच्या पर्यावरणाशी साधर्म्य दाखवतात. असेच उष्णजल निर्गम ‘युरोपा’ या गुरूच्या चंद्रावर आणि ‘इंसेलाडस’ या शनीच्या चंद्रावरदेखील आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा