नत्रयुक्त रासायनिक खते उदा. युरिया, अमोनियम सल्फेट, नायट्रेट बऱ्याच प्रमाणात पाण्यात विरघळून वाहून किंवा झिरपून जातात. ती पिकांना संपूर्णपणे मिळत नाहीत. हे टाळण्यासाठी नत्र खताची मात्रा पिकांना विभागून देतात. शेतकऱ्यांना यासाठी मजुरीचा खर्च करावा लागतो. हीच खते एक-दोन ग्रॅम वजनाच्या गोळीच्या रूपात (सुपर ग्रॅन्यूल) पिकाच्या मुळाजवळील क्षेत्रात रोवून दिली असता ती पिकांना चांगली लागू पडतात. त्यांचा प्रवाही गुणधर्म कमी होतो. ऱ्हासामुळे होणारे नुकसान टळते. शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या मजुरीच्या खर्चात बचत होते. भातपिकाची रोपणी झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी असे गोळी खत देता येते. गहू, ज्वारी, बाजरी पिके पेरणीनंतर १५ दिवसांची झाल्यावर त्यांना गोळी खत देता येते.
नत्र खत युरियाच्या ब्रिकेट्स अथवा गोळ्या तयार करण्याची एक विशेष प्रक्रिया आहे. यात खताच्या भुकटीवर दाब देऊन मोठी गोळी बनविली जाते. त्यासाठी विशिष्ट यंत्राची गरज भासते. युरिया खताबरोबर डी-एपी स्फुरद खत मिसळून ब्रिकेट्स बनविण्याचे ‘क्रांती ब्रिकेटर’ यंत्र डॉ. नारायण सावंत या शास्त्रज्ञाने विकसित केले. त्यात तयार होणाऱ्या गोळ्यांना ‘क्रांती ब्रिकेट्स’ नाव पडले. या यंत्राच्या साह्याने बनविलेल्या युरिया-डीएपी ब्रिकेट्सचे वजन २.५ ग्रॅम असते. ते दिल्यावर पिकांना लागणारे नत्र आणि स्फुरद अपेक्षित मात्रेत व वाढीच्या काळात पुरविले जाते.
गोळीखत पिकांना देताना पाच ते सात सेंमी खोलीवर मातीत हाताने किंवा अवजाराच्या साह्याने टोबून (रोवून) दिले जाते. पिकांच्या दोन ओळींमध्ये त्याच्या मुळाच्या जवळपास त्याची टोबनी होईल याची काळजी घेतली जाते. ब्रिकेट्स देताना खोवल्या ठिकाणी मातीत छिद्र राहिले, तर ते हाताने त्यावर माती लोटून बंद केले जाते. गोळीपद्धतीचा खत देण्यासाठी वापर केला असता खतातील नत्र ऱ्हास पावत नाही. स्फुरदाची स्थिर होण्याची क्रिया कमी होऊन ते पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे पिकांच्या वाढीच्या पूर्ण काळापर्यंत एक-दोन महिने ही अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. खताच्या मात्रेत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
– डॉ. विठ्ठल चापके
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा