झाडांवर फळांचे पिकणे हा एक नैसर्गिक, अपरिवर्तनिय बदल आहे. वनस्पतीचे जीवनचक्र पूर्ण होताना लंगिक प्रजननानंतर फुलाचे फळात रूपांतर होते. हे रूपांतर होताना फळाच्या अंतरंगात तसेच त्याच्या बाह्यरूपात फरक पडतो. काही विशिष्ट चयापचय क्रिया फळे पक्व होण्याच्या प्रक्रियेशी निगडीत आहेत. या प्रक्रियेत पेक्टिनेजेस, सेल्युलेबेस यांसारखी विकरे सक्रीय होतात. अपरिपक्व फळांत शर्करांचे प्रमाण कमी असून आम्लांचे प्रमाण जास्त असते. फळे पिकण्याच्या क्रियेत आम्लाचे प्रमाण कमी कमी होऊन शर्करा वाढतात. त्यामुळे फळांच्या चवीत फरक जाणवतो. विकरांच्या योग्य क्रियेसाठी काही विशिष्ट तापमान, हवेतील आद्र्रता असणे गरजेचे असते. (नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी फळांना विशिष्ट मोसम आवश्यक असतो, तो यामुळे).
काही संप्रेरके (संजीवके) फळे पक्व होण्याच्या प्रक्रियेशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ, इथिलीन वायू. फळांच्या रंगातील बदलही लक्षणीय असतो. काही रंगद्रव्यांची निर्मिती उपलब्ध असणारया प्रकाशावर अवलंबून असते. काही फळांमध्ये पक्व होण्याच्या क्रियेत श्वसनाचा वेगही जाणवण्याइतपत वाढतो. घट्टपणा कमी होऊ लागतो. नैसर्गिक घटकांच्या असंतुलनाने कधीकधी रोग अथवा कीड यांचा प्रादुर्भाव जाणवतो. अशा परिस्थितीत फळांचे नुकसान होऊ शकते. यावर मात करण्यासाठी फळे कृत्रिमरित्या पिकविली जातात. त्यांना आवश्यक ऊब (तापमान) मिळण्यासाठी कृत्रिमरित्या गवताच्या पेंढय़ात अथवा कागदात गुंडाळून ठेवली जातात. काही वेळा विशिष्ठ तापमानात ओव्हन अथवा इन्क्युबेटरमध्ये ठेवली जातात. फळांना वरून काही पावडरींचा लेप लावला जातो. या पावडरीमुळे इथिलीन वायूची निर्मिती होते व पुढील बदलांना चालना मिळते. फळांवर जीवाणूजन्य रोग येऊ नयेत, म्हणून योग्य पद्धतीने त्यांचे र्निजतुकीकरण केले जाते. विशिष्ट अवस्थेत फळांची झाडावरून काढणी केली जाते. मग स्वच्छ धुऊन पुढील कृत्रिम प्रक्रिया केल्या जातात.
कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यामुळे सर्व फळे एकाच अवस्थेत राहातात. त्यांची टिकवण क्षमता वाढते. त्यांचा आकर्षकपणा वाढतो. त्यांचा श्वसनाचा वेग कमी करण्यासाठी काही वेळा वरून काही लेप लावले जातात. फळांच्या वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान कमी होऊ शकते. अशा फळांना बाजारात विक्रीसाठी जास्त दर मिळून शेतकऱ्याचाही फायदा होऊ शकतो.
-स्मिता जाधव (ठाणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा