महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील बऱ्याचशा भागात पाऊस अनिश्चित असल्याने तेथे जो काही पाऊस पडेल त्याचे पाणी जमिनीतच मुरू द्यावयाचे आणि पावसाळा सरता सरता सप्टेंबर महिन्यात आपल्या शेतात ज्वारी पेरावयाची अशी पद्धती अवलंबली जाते. पावसाळ्यानंतर कोरडय़ा ऋतूत तयार होत असल्याने या ज्वारीचे दाणे चमकदार आणि डागविरहित असतात आणि तिला चांगला भाव मिळतो. चार महिने मुदतीच्या या पिकाला साधारणत ७०० मिलिमीटर पाणी लागते. महाराष्ट्राच्या काळ्या जमिनीत एक मीटर मातीच्या थरात सुमारे २५० ते ३०० मिलिमीटर पाणी साठविण्याची क्षमता असते. त्यामुळे कोरडवाहू रब्बी ज्वारी पीक चांगले येण्यासाठी अगोदरच्या पावसाळ्यात ७०० ते ८०० मि.मी. पाऊस आणि आपल्या शेतात किमान अडीच मीटर खोल माती असेल तरच या पिकाला कणसे येऊन त्यात दाणे भरतात, नाहीतर कणसे येण्यापूर्वीच ते वाळून जाते आणि त्यापासून केवळ कडबा मिळतो. प्रस्तुत लेखकाने या परिस्थितीवर सुचवलेला उपाय होता ज्वारीच्या दोन ओळींमधील अंतर वाढविण्याचा. शेतकऱ्यांच्या शेतातल्या ज्वारी पिकात दोन ओळींमधील अंतर साधारणत ५० सेंटिमीटर असते आणि एका ओळीतल्या दोन रोपांमधले अंतर असते १५ सेंटिमीटर. माझ्या प्रायोगिक लागवडीत मी दोन ओळींमधले अंतर ठेवले होते १५० से.मी. या उपायामुळे या पिकातल्या रोपांची संख्या ६६ टक्क्यांनी कमी झाली. जमिनीतून पाणी काढून घेणाऱ्या घटकांची संख्या कमी झाल्यामुळे जमिनीत साठविलेले पाणी या पिकाला शेवटपर्यंत पुरले आणि या शेतातून हेक्टरी २५०० किलो एवढे धान्याचे उत्पन्न मिळाले. आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारी पिकातून केवळ कडबाच मिळाला.
कणसांची खुडणी झाल्यावर आम्ही या पिकाच्या दोन ओळींमधली माती उकरून पाहिली असता आम्हाला असे आढळले, की हा मातीचा पट्टा दोन्ही बाजूंच्या ज्वारीच्या ओळींमधून आलेल्या मुळांनी व्यापून टाकलेला होता. म्हणजे दोन ओळींमधल्या १५० सेंटिमीटर पट्टय़ात साठवलेले पाणीही या पिकाने वापरले होते.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा