स्टार्च हे ग्लुकोज या शर्करेचे बहुवारिक असल्याने त्यावर काही विशिष्ट वितंचकांची क्रिया घडवून आणून त्याचे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या शर्करांच्या मिश्रणात रूपांतर करता येते. मक्याचा उच्च फ्रुक्टोजयुक्त पाक या नावाने अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या या मिश्रणाला साखरेइतकीच गोडी असते, पण ते स्फटिकशर्करेच्या रूपात नसून ८० टक्के साखरेचे प्रमाण असणाऱ्या पाकाच्या रूपात असते. अशा प्रकारे साखर निर्माण करण्याचा कारखाना गूळ उत्पादनाप्रमाणेच कुटिरोद्योग या स्वरूपातही चालविता येईल. मानवी अन्नात आपण जेव्हा साखर वापरतो तेव्हा ती विरघळवूनच वापरतो. त्यामुळे ती स्फटिकरूपात असली काय किंवा पाकाच्या रूपात असली काय, खाणाऱ्याला त्यामुळे काहीच फरक पडत नाही. केवळ वाहतूक आणि साठवण यांसाठी स्फटिकशर्करेला पोती चालतात तर पाकासाठी टाक्या, िपपे किंवा बाटल्या वापराव्या लागतील. धान्य किंवा अन्य काही बिया आणि कंद यांच्या स्टार्चपासून साखरनिर्मितीचे अनेक फायदे आहेत. धान्यपिके कमी मुदतीत तयार होतात आणि ती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निव्वळ पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. महाराष्ट्रातील उसाखालील क्षेत्र आपल्या एकूण कृषिक्षेत्राच्या केवळ चार ते पाच टक्के आहे, पण हे एकच पीक आपल्या एकूण पाणीसाठय़ापकी सुमारे ७० ते ८० टक्के पाणी वापरते. त्यामुळे उसाखालील क्षेत्र कमी करून वाचलेले पाणी आपण कितीतरी जास्त क्षेत्राला देऊ शकू. उसाच्या मानाने धान्य अधिक टिकाऊ असल्याने त्याची साठवण करता येते. त्यामुळे आपण त्याचा बफर स्टॉक करू शकतो किंवा टंचाईच्या काळात ते आपण कोठूनही, अगदी परदेशातूनसुद्धा आणू शकतो. धान्यापासून मोटारीत जाळण्यासाठी मद्यार्क करण्यास जसा लोकांचा विरोध आहे, तसा साखर करण्यास असणार नाही, कारण साखर हाही मानवी खाद्याचाच एक घटक आहे. ऊस दीर्घकाळ साठवता येत नाही, म्हणून कारखान्यांना रोज ताजा ऊस मिळावा लागतो. त्यामुळे उस उत्पादक, तोडणीकामगार, वाहतूक कंत्राटदार, किंवा राजकीय चळवळे यांपकी कोणीही, आपणांस वाटेल तेव्हा, उसाच्या पुरवठय़ात व्यत्यय आणून साखर कारखाने बंद पाडू शकतात. याही कारणाने उसाला पर्याय शोधणे आवश्यक ठरते.
– डॉ.आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
जे देखे रवी.. शब्दांच्या मोहक माळा
अगदी थोडय़ा शब्दांत काही तरी प्रचंड अर्थधन पोहोचवणे ही मोठी कला आहे हे नक्कीच; परंतु हे सामान्य माणसांच्या मनाला फार अवघड जाते. म्हणूनच शब्दांच्या माळा करत विस्ताराने सांगण्याची प्रथा तशीच चालू राहिली. ‘हॅम्लेट’ नाटकात हॅम्लेटचा सख्खा काका त्याच्या वडिलांचा खून करतो आणि गादीवर बसतो. एवढेच नव्हे तर हॅम्लेटच्या आईला वश करून तिच्याशी लग्न लावतो आणि म्हणतो, ‘ही आमची एकेकाळची वहिनी आता आमच्या हृदयाची स्वामिनी आणि आमच्या राज्याची राणी.’ हे सगळे कळल्यावर हॅम्लेटच्या मनातल्या उद्विग्नतेचे वर्णन शेक्सपियरने केले आहे ते वाचण्याजोगे आहे. अशा शब्दांच्या माळा क्वचितच वाचायला मिळतात. हॅम्लेट म्हणतो-
ही सुंदर पृथ्वी की एक खडकाळ टेकाड। वैभवशाली सोनेरी विस्तवाने नटलेले। वर पसरलेले शोभिवंत आकाश। वातावरणाचे हे अद्भुत छत। मला का कोणास ठाऊक। यात विषारी ओंगळ धुक्याचा भास होतो। माणूस म्हणजे खरे तर एक अप्रतिम कलाकृती। अभिजात विचार अमाप निसर्गदत्त गुण। सुंदर रचना आणि डौलदार चाल। देवदूतासारखी करणी। पण मला मात्र हा मातीमोल वाटतो। कशातच स्वारस्य उरले नाही। जगावं की मरावं हा विचार सतावतो। मरण म्हणजे झोप आणखी काय। दररोजच्या कटकटी आणि जीवाला लागलेली हुरहुर जर संपणार असेल। तर त्या झोपेचे स्वागतच। पण स्वप्नांचं काय। तिथेच तर खरी गोम आहे। जर मेल्यानंतर स्वप्नं पडणार असतील तर?। या पुढच्या स्वप्नांना घाबरून। माणसं सारं काही सोसतात। राज्यकर्त्यांची दडपशाही। मगरुरांची दंडेली। अपूर्त प्रेम। साध्या साध्या न्यायासाठी जन्मभर झगडा। पावलोपावली अपमान आणि पिळवणूक। खरं तर एक खंजीर उपसून हे सगळे संपते। रेकत रेकत घाम गाळत। कोणाला ओझ्याचे जनावर व्हायचे आहे। पण मरणानंतरच्या गोष्टींची धास्ती वाटते। एक अजब अजाण प्रांत। यात्रेकरू परत न पाठवणारा। मन विकल्पांनी उतू जातं आणि म्हणते। हेच भोग परवडले। उगीचच नको जीव गोत्यात घालायला। ठावठिकाणाचा पत्ता नाही। म्हणूनच मग। मी हुषार चतुर म्हणत म्हणत। माणसं भ्याड आणि भित्री होतात। एवढा सारा निग्रह आणि ती धृती। त्यांचा तो मोहक रंग। सगळा मुळी फिका पडतो आणि विटतो। विचार करत अनुमान काढत। मनाचा गुंता करून घेतो आपण। मग सगळे संकल्प मोठमोठे। वाट चुकवतात आणि मरगळतात.
काय वाटले हे वाचून? स्वानुभाव आला?
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस : कंबर व गुडघेदुखी : भाग -२
कंबरदुखी व गुडघेदुखी या विकारात रुग्णाचे वजन, रक्ताचे प्रमाण, मलप्रवृत्ती, आहाराच्या सवयी, वेळा व दैनंदिन जीवनक्रम-कामाचे स्वरूप यांचा विचार करून उपचाराची व पथ्यपाण्याची निवड करावी लागते. शरीर वाजवीपेक्षा स्थूल असले व मलप्रवृत्ती साफ असली व रक्ताची अल्पता नसली तर सामान्यपणे लक्षादि सिंहनाद, गोक्षुरादि व त्रिफळा गुग्गुळ या चार प्रकारच्या आयुर्वेदीय औषधांनी लगेचच दिलासा मिळतो. पोटात वायू धरत असल्यास एरंडेल तेलावर परतलेली सुंठ दोन्ही जेवणानंतर अर्धा चमचा या प्रमाणात घ्यावी. पित्तप्रकृतीच्या रुग्णांनी चंदनबलालाक्षादी तेल; कफप्रकृतीच्या रुग्णांनी महानारायण तेल सकाळ-संध्याकाळ अभ्यंग तेल म्हणून कटाक्षाने वापरावे. आहारावर नियंत्रण असावे. ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण; रताळी बटाटा सोडून सर्व उकडलेल्या भाज्या व शक्यतो बिनमिठाचे जेवण जेवावे. वजन वाढू नये व रोगलक्षणात भर पडू नये म्हणून बाहेरची जेवणे, शिळे अन्न, कोल्ड्रींक, खूप थंड पदार्थ, मांसाहार; हरभरा, वाटाणा, उडीद, मटकी असे पदार्थ टाळावेत. वजन कमी होत नसल्यास गोक्षुरादि व त्रिफळा गुग्गुळ या गोळ्या प्रत्येकी सहा व इतर गोळ्या प्रत्येकी तीन या हिशोबात बारीक करून घ्याव्या. औषधांबरोबर जेवताना गरम गरम पाणी प्यावे. रुग्ण कृश असल्यास चंद्रप्रभा, लाक्षादि, गोक्षुरादि, संधिवातारी, आभादि व सुवर्णमक्षिकादि या गोळ्या प्रत्येकी तीन, दोन वेळा द्याव्यात. सकाळी किंवा रात्रौ आस्कंदचूर्ण एक चमचा दूध व सुंठ मिश्रणाबरोबर द्याव्यात. कदापि पेनकिलर देऊ नये. अशा व्यक्तींनी पूर्ण विश्रांती कठीण व उबदार अंथरुणावर उताणे झोपने व कमीत कमी श्रम करणे याचा फायदा होतो का बघा. कंबरदुखी व गुडघेदुखी या विकारात मलावरोध व वायू तुंबणे या तक्रारी असल्यास त्रिफळा चूर्ण किंवा गंधर्व हरितकी चूर्ण वा एरंडेल युक्त चपाती याचा वापर करावा. वाताचा तीव्र काळ असल्यास महानारायण तेलामध्ये गवती चहा अर्क ४:१ या प्रमाणात मिसळून तात्पुरता फायदा होतो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत १४ फेब्रुवारी
१९१६ > ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ हे भावगीत तसेच ‘राका’ (१९३२) संसार (१९४३) चित्रा (१९५७) चंद्रफूल (१९५१) आदी काव्यसंग्रह यांतून शालीन प्रेमभावनेची कविता लिहिणाऱ्या कवयित्री संजीवनी रामचंद्र मराठे यांचा जन्म. भावगीते, बालगीतसंग्रह व ‘लाडकी लेक’ ही अनुवादित कादंबरिका अशी साहित्यसेवा करून १ एप्रिल २००० रोजी त्या निवर्तल्या.
१९१८ > संस्कृत, जर्मन, पाली व अन्य भाषांचे जाणकार, प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचा जन्म. अशोकाच्या शिलालेखांवर त्यांनी १९४८ मध्ये लिहिलेले, किंवा महाभारताची सटीक सांस्कृतिक सूची (१९९७) तसेच महाभारत युद्ध-शोध (१९९५) ही इंग्रजी पुस्तके मार्गदर्शक आहेत. ‘प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती’ (२००१) हे त्यांचे पुस्तक गाजले. मराठीत वेदकाळापासूनचा ‘वरुणविचार’, ‘गाथा झरतुष्ट्राची’ ही पुस्तके, इंग्रजीत सहा संपादित पुस्तके आणि तीन बालपुस्तके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.
१९२५ > ‘सफर’ (आत्मचरित्र) ‘जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ’ (बाल) व ‘बोल अनुभवाचे’(आत्मपर) या पुस्तकांचे कर्ते, नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष व ‘वनराई’चे संस्थापक मोहन धारिया यांचा जन्म.
– संजय वझरेकर