स्टार्च हे ग्लुकोज या शर्करेचे बहुवारिक असल्याने त्यावर काही विशिष्ट वितंचकांची क्रिया घडवून आणून त्याचे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या शर्करांच्या मिश्रणात रूपांतर करता येते. मक्याचा उच्च फ्रुक्टोजयुक्त पाक या नावाने अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या या मिश्रणाला साखरेइतकीच गोडी असते, पण ते स्फटिकशर्करेच्या रूपात नसून ८० टक्के साखरेचे प्रमाण असणाऱ्या पाकाच्या रूपात असते. अशा प्रकारे साखर निर्माण करण्याचा कारखाना गूळ उत्पादनाप्रमाणेच कुटिरोद्योग या स्वरूपातही चालविता येईल. मानवी अन्नात आपण जेव्हा साखर वापरतो तेव्हा ती विरघळवूनच वापरतो. त्यामुळे ती स्फटिकरूपात असली काय किंवा पाकाच्या रूपात असली काय, खाणाऱ्याला त्यामुळे काहीच फरक पडत नाही. केवळ वाहतूक आणि साठवण यांसाठी स्फटिकशर्करेला पोती चालतात तर पाकासाठी टाक्या, िपपे किंवा बाटल्या वापराव्या लागतील. धान्य किंवा अन्य काही बिया आणि कंद यांच्या स्टार्चपासून साखरनिर्मितीचे अनेक फायदे आहेत. धान्यपिके कमी मुदतीत तयार होतात आणि ती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निव्वळ पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. महाराष्ट्रातील उसाखालील क्षेत्र आपल्या एकूण कृषिक्षेत्राच्या केवळ चार ते पाच टक्के आहे, पण हे एकच पीक आपल्या एकूण पाणीसाठय़ापकी सुमारे ७० ते ८० टक्के पाणी वापरते. त्यामुळे उसाखालील क्षेत्र कमी करून वाचलेले पाणी आपण कितीतरी जास्त क्षेत्राला देऊ शकू. उसाच्या मानाने धान्य अधिक टिकाऊ असल्याने त्याची साठवण करता येते. त्यामुळे आपण त्याचा बफर स्टॉक करू शकतो किंवा टंचाईच्या काळात ते आपण कोठूनही, अगदी परदेशातूनसुद्धा आणू शकतो. धान्यापासून मोटारीत जाळण्यासाठी मद्यार्क करण्यास जसा लोकांचा विरोध आहे, तसा साखर करण्यास असणार नाही, कारण साखर हाही मानवी खाद्याचाच एक घटक आहे. ऊस दीर्घकाळ साठवता येत नाही, म्हणून कारखान्यांना रोज ताजा ऊस मिळावा लागतो. त्यामुळे उस उत्पादक, तोडणीकामगार, वाहतूक कंत्राटदार, किंवा राजकीय चळवळे यांपकी कोणीही, आपणांस वाटेल तेव्हा, उसाच्या पुरवठय़ात व्यत्यय आणून साखर कारखाने बंद पाडू शकतात. याही कारणाने उसाला पर्याय शोधणे आवश्यक ठरते.
– डॉ.आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा