ज्वारीचं मूळ आफ्रिकेत असावं असं तज्ज्ञांना वाटतं. डॉगेट आणि माजिसु (१९६८) या शास्त्रज्ञांनी रानटी ज्वारी आणि लागवडीखालील ज्वारीचे नातेसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेत जंगली ज्वारीच्या जाती लागवडीच्या ज्वारीच्या शेताभोवती सापडतात, असे त्यांना दिसले. त्यातूनच नवे संकरित वाण जन्माला आले असावेत. त्यापकी काहींची निवड पद्धतीने लागवड करीत पुढे शुद्ध सुधारित वाण हाताला लागले. निसर्गही हीच निवड पद्धत वापरतो. त्यातून नवे कणखर वाण जन्मतात.
ज्वारीच्या डय़ूरा या जाती ख्रिस्तपूर्व १००० ते ८०० वर्षांच्या काळात इथियोपियातून अरेबिया, आग्नेय आशिया, भारत येथे गेल्या असाव्यात. इटलीत त्या इसवीसन ६० ते ७० दरम्यान गेल्या असाव्यात.
भारतातील मूळ ज्वारीचा काळ कोणता? प्राचीन संस्कृत वाङ्मयात ज्वारीचा उल्लेख ‘यवनला’ असा आहे. हे धान्य सातूनंतर अस्तित्वात आलं असावं. पुरातत्त्वीय उत्खननात द्वारकेजवळच्या नागेश्वर येथे ज्वारीच्या ‘सॉर्घम हालापेन्स’ या जातीचे नमुने असलेले ४५०० वर्षांपूर्वीचे दगडाचे अवशेष सापडले. म्हणजेच ज्वारीच्या आफ्रिकेतील उगमाचा आणि भारतमाग्रे प्रवासाचा काळ काहीसा संभ्रम निर्माण करणारा ठरतो.
आफ्रिकेत ज्वारीच्या शेतांभोवती ज्वारीचे ‘सॉर्घम व्हर्टिसिंलिफॉर्म’ या जातीचे जंगली प्रकार सापडतात. त्यांची संख्या मोठी आहे. ते वरवर समानधर्मी असले तरी त्यांची जनुकीय रचना वेगवेगळी आहे. म्हणजे या जनुक संचयिकाच आहेत. पुढे त्यांचा प्रवास भारताकडे होत गेला. पण वैविध्य कमी होत शेवटी निखळ पिकाचे वाण स्थिर झाले असावेत. चीनमधील ‘सॉर्घम प्रॉपीम्कम’ या वाणाची निर्मितीही अशीच झाली असावी.
वनस्पतींचे वर्गीकरण करणाऱ्या कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने १७५३ मध्ये ज्वारीचा समावेश वनस्पतीच्या होल्कस या गटात केला. नंतर एन्डरसनने त्याला सॉर्घम हे पर्यायी नाव दिलं. १७९४ मध्ये मेंच या शास्त्रज्ञाने या दोन प्रजातींमधील फरक स्पष्ट केला आणि त्या विभक्त झाल्या. आधुनिक वर्गीकरणात सॉर्घमच्या सहा उपजातींचा समावेश होतो. स्नोडन यांनी १९३६ मध्ये वर्गीकरण करून ३१ लागवडीखालच्या आणि १७ रानटी जातींची नोंद केली. आता ज्वारीचे असंख्य वाण उपलब्ध आहेत. खाण्याबरोबर इंधनासाठी व साखरनिर्मितीसाठीही त्यांचा उपयोग होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा