मुलांना जेव्हा कमी गुण मिळतात किंवा वर्गात त्यांचा कुठल्याही प्रकारे अपमान होतो, वर्गमित्रांशी काही कारणाने भांडण होतं आणि ते भांडण, त्यातले काही शब्द जिव्हारी लागतात, त्या वेळेला मेंदूमध्ये कॉर्टसिॉल निर्माण होतं. हा अनुभव आणि त्याच्याशी जोडले गेलेले पूर्वीचे अनुभव यात वाढ करण्याचं काम करतात. उदाहरणार्थ मागच्या वेळी जेव्हा असेच वाईट मार्क मिळाले होते त्या वेळेला खाल्लेली बोलणी किंवा मार हे सर्व काही मुलांना आठवतं. आणि ताणामध्ये वाढ होते. मुलं निकालाचा कागद घेऊन घरी जातात आणि पूर्वी घडलेल्या अनुभवाप्रमाणे याही वेळेला आई-बाबा रागावणार या अपेक्षेत असतात. आई-बाबांचा रागावणं अति असेल, मुलांना झेपणारं नसेल तर काही मुलांना ते सहन करता येत नाही. यातली काही मुलं घरी परत जाण्याचा विचार करत नाहीत. कमी मार्क मिळाले, या कारणासाठी घरातून निघून जातात आणि दिशाहीन होतात. हा ताण मुळीच झेपला नाही तर मुलं स्वतच्याच अस्तित्वाच्या मुळाशी येतात आणि जीव देण्याचं अत्यंत चुकीचं पाऊल उचलतात.  काही वेळेला घरातले पालक किंवा शिक्षक हे मुलांना ताण देत नसतात तर मुलांच्याच स्वतबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. माझा पहिला नंबर आला नाही तर ही माझी प्रचंड मोठी चूक असेल असा मोठा न्यूनगंड वर्गात पहिलं- दुसरं-तिसरं येणाऱ्या मुलांनाही येऊ शकतो. आपण सतत मुलांसमोर हे स्पध्रेचं युग आहे, तुला पुढे जावं लागेल, गेला नाहीस तर अवघड होईल असं बोलत राहिलो तर तो ताण वाढत राहतो. यामुळे मुलांना योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नाही. आता परीक्षा झालेली आहे आणि मार्कही मिळालेले आहेत. आता या भूतकालीन गोष्टींच्या संदर्भात आपण काही करू शकत नाही. यापेक्षा भविष्यामध्ये नियमित मेहनत करणं हे महत्त्वाचं आहे, असा संतुलित सल्ला आणि आधार आई-बाबांनी मुलांना द्यायला हवा. आपल्यात आणि मुलांमध्ये जवळिकीचं घट्ट नातं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. अपेक्षा असतात, ते काही प्रमाणात स्वाभाविक आहे, पण  आपल्याला आपलं मूल जसं आणि जिथे हवं आहे, त्यापेक्षा ते जिथे आहे, त्या असण्याचा स्वीकार करणं आणि प्रगतीसाठी प्रयत्न करणं, हीच जवळीक. ही जवळिकीची भावना मुलांना जाणवत असेल तर कितीही ताण आला तरी मूल त्या प्रभावाखाली येऊन चुकीचं पाऊल नक्की उचलणार नाही.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

Story img Loader