लहान मुलांना सहलीला घेऊन गेल्यावर त्यातली काही मुलं अशी असतात ज्यांचं लक्ष तिथली पानं, फुलं, बिया, फांद्या, शंख, िशपले वेचण्याकडे असतं. या मुलांना एखादा किडा सापडतो, एखादं घरटं दिसतं त्याचं निरीक्षण करण्यात ही मुलं गुंतलेली असतात. इतर सर्व मुलांपेक्षा ही मुलं वेगळी वाटतात. कुंडीत लावलेल्या बीमधून रोप कसं येतं, त्या रोपांची काळजी घेण्याकडे या मुलांचा कल असू शकतो. अत्यंत संवेदनशील मन ही या बुद्धिमत्तेच्या माणसांची पहिली ओळख. त्याच संवेदनशीलतेमुळे आणि मेंदूतल्या न्युरॉन्सच्या विशिष्ट जोडण्यांमुळे ते निसर्गाकडे ओढले जातात.
काही मुलांचा ओढा लहानपणापासूनच निसर्गाकडेच असतो. डोंगर चढायला, किल्ले पालथे घालायला, नदी-समुद्रात डुंबायला सगळ्यांनाच आवडतं. अगदी छोटय़ा मुलांना तर चिऊ, काऊ, हम्मा, भू भू यांच्याकडे बघायला फार आवडतं. पण काही जण मात्र या सगळ्यात फारच रमतात. कुत्र्यांशी खेळणं, त्याची तहानभूक ओळखून त्यांना खायला-प्यायला घालणं अशी कामं यांना खूपच जास्त आवडतात. केवळ घरातल्याच नव्हे तर कुठल्याही कुत्र्या-मांजरावर मनापासून प्रेम करणं, त्यांच्या मागे घोटाळणं. अनेकदा तर खेळायला आलेले मित्र-मत्रिणी, टी.व्ही, सिनेमे हे सगळं सोडून प्राण्यांच्या मागे घोटाळणं असं काही मुलं करतात. अशा मुलांना निसर्गात रमण्याची, निरीक्षणं करण्याची जास्तीतजास्त संधी मिळाल्यास, ही आवड मोठं होईपर्यंत टिकू शकते आणि या मुलांमधली निसर्गविषयक बुद्धिमत्ताही विकसित होऊ शकते.
निसर्गात फिरणं वेगळं आणि निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी फिरणं वेगळं, किंवा त्यात रमून, गढून जाणं वेगळं. काही माणसं शहरात यायला उत्सुक नसतात. ते जंगलझाडीत, पशुपक्ष्यांमध्येच रमतात. शेती, पाऊस, पिकं, मधमाश्या, मुंग्या, टेकडय़ा, पृथ्वीच्या हालचाली, प्राणीजीवन, ज्वालामुखी, जंगलात रमणारे, पक्ष्यांची भाषा जाणणारे, विविध प्राणी-पक्ष्यांच्या संदर्भात काम करणारे, पाणी, हवामान, पर्यावरण, माती, डोंगर, देवराई, भूगोल, खगोल या विषयातले छांदिष्ट, अभ्यासक, संशोधक, सर्पमित्र, पक्षीनिरीक्षक यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता असते.अशांपकी एखादा विषय त्यांच्या आवडीचा असतो. नुसती आवड नाही, तर ओढ असते. असे लोक मग याच विषयात अभ्यास करतात.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com