मूल स्वत:हून आपल्या ज्ञानाची रचना करतं. आसपासच्या प्रौढ माणसांनी त्यांना तशी संधी आणि मोकळेपणा द्यायला हवा – हाच ज्ञानरचनावादाचा पाया आहे. प्रत्येकाची ज्ञानरचना वेगवेगळ्या पद्धतीने झालेली आहे.  मुलं-मुली ज्या घरातून बालवाडीत येतात, तिथली सामाजिक- आर्थिक- कौटुंबिक परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. मुलं लहान असली तरी त्यांच्या वाटय़ाला नेहमी आनंददायक अनुभवच येतील असं काही सांगता येत नाही.  यामुळे या शिक्षण प्रक्रियांना हानी पोहोचू शकते. यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

कुपोषण-  समतोल आहार न मिळणं- याचा परिणाम मेंदूवर होतो. आपला मेंदू आणि पूर्ण शरीर हे विविध रसायनांवर आधारित काम करतं. ही रसायनं मुख्यत: आहारातून मिळतात. जर आहार योग्य नसेल तर मुलाच्या शिकण्यावर परिणाम होतो. समाजातल्या सर्वाना शिक्षण मिळायला हवं, म्हणून ते सक्तीचं केलं. पण कित्येक मुलांसाठी शिक्षणाआधी आहाराचा प्रश्न सोडवायला हवा.  म्हणून पोषक आहाराची व्यवस्था करावी लागलेली आहे. आहारासाठी म्हणून शाळेत येणारे अनेकजण आहेत. योग्य आहारामुळे आकलन, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते.

अपुरा भाषाविकास-  लहान वयात मूल वस्तू हाताळतं, कितीतरी प्रश्न विचारतं. या प्रश्नांना उत्तरं द्यायला जवळ कोणीतरी मोठं असेल तर त्या मुलांच्या मेंदूला चालना मिळते. कारण या काळात जर मुलांशी भरपूर बोललं नाही तर त्यांचा भाषाविकास अपुरा राहतो. भाषाविकास आणि आर्थिक-सामाजिक वंचित कुटुंबं यांच्यावर अनेक अभ्यास व संशोधनं झाली आहेत, त्यातून हा संबंध लक्षात आलेला आहे.

भावनिक-मानसिक प्रश्न- आपण मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्न करतो. पण मुलांचे स्वत:चे काही भावनिक-मानसिक प्रश्न असतात.  मूल जन्मापासून किमान सुविधांपासून वंचित असणं. पालकांच्या आर्थिक गटाचा परिणाम त्याच्यावर होणं. कायमस्वरूपी दुर्लक्षित मुलं असतील तर त्यांच्याकडे इतरांपेक्षा अधिक लक्ष द्यायला हवं. मुलं मेंदूने तिथेच गुरफटलेली राहतात. ग्रहणशीलतेवर याचा परिणाम होतो.

निसर्गत: सर्व मेंदूंमध्ये सारखीच क्षमता असते. जन्माला येण्याआधीपासून मेंदूपूरक वातावरण मिळालेलं नसतं म्हणून फरक पडतो, हे लक्षात घ्यायला हवं.

–  श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

Story img Loader