वय १२ च्या आसपास मूल आणि आईबाबा यांचं नातं एका नव्या वळणावर येतं. आईबाबांनी काहीही सांगितलेलं लगेच ऐकणारी मुलं वयाच्या या टप्प्यावर मात्र ‘नाही’ म्हणायला शिकतात. जेवढं जास्त सांगायला जावं, तेवढी अजूनच हट्टी होतात. लहानपणचा हट्टीपणा वेगळा आणि या वयातला हट्टीपणा वेगळा जाणवतो. याचं कारण मुलांमध्ये स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची बीजं दिसायला लागलेली असतात. युवावस्थेकडे चाललेली ही वाटचाल असते.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अतिशय महत्त्वाचे बदल व्हायला लागतात. हा काळ तर महत्त्वाचा असतोच, मात्र या आधीचे सगळेच टप्पे महत्त्वाचे असतात. टीनएजच्या आसपासच्या मुलांची मानसिकता समजून घ्यायची असेल तर केवळ ‘आजचं वागणं’ लक्षात घेऊन चालणार नाही. त्यांचे यापूर्वीचे सर्व मनो-शारीरिक टप्पे लक्षात घ्यायला हवेत.
टीनएजमधल्या आपल्या मुला-मुलींना कुटुंब, शेजार-पाजार, मित्र-मैत्रिणी, समाज, शाळा यातून आजवर जे अनुभव मिळाले आहेत, त्यानुसार विविध क्षेत्रांमध्ये न्यूरॉनची जुळणी झालेली असते. हे अनुभव आनंदाचे, सहकार्याचे, प्रोत्साहनाचे असतील तर मूल तशा प्रतिक्रिया देतं. पण हे अनुभव जर भांडणांचे, भीतीचे, दडपशाहीचे, दु:खी करणारे असतील तर साहजिकच मन त्याच पद्धतीने घडलेलं असल्यामुळे प्रतिक्रिया तशा येतात. या सर्व काळात नकारात्मक अनुभव मिळालेले असतील तर मुलांच्या मनात आईबाबांसह सगळ्यांबद्दल अविश्वास निर्माण झालेला असतो. त्यामुळे मुलांकडून कधीकधी अस्वस्थतेमुळे चिडक्या किंवा नैराश्यात्मक प्रतिक्रिया येऊ शकतात. या प्रतिक्रिया आईबाबांसाठी अतिशय त्रासदायक, मनस्ताप देणाऱ्या असतात.
एकमेकांना एकमेकांपेक्षा वरचढ अशा नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या गेल्या तर प्रश्न सुटण्याऐवजी वाढतो. मुलं आणि आईबाबा दोघांमध्ये कॉर्टिसॉल हे ताण वाढवणारं रसायन निर्माण होतं. यातून राग, संताप याचीही रसायनं निर्माण होऊन ताणात भर घालतात. रागाचा प्रसंग निघून गेल्यानंतर बोललं तर त्यांच्या मनाचा पासवर्ड मिळू शकेल आणि विश्वास निर्माण करायचा प्रयत्न करता येईल.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com